Close

कामाच्या ठिकाणी मधुमेहाचे व्यवस्थापन कसे कराल? (How To Manage Diabetes Effectively At Work Place?)

चांगली कारकिर्द घडविण्याच्या महत्त्वाकांक्षेला, व्यावसायिक प्रगतीला खतपाणी घालण्यामध्ये चांगल्या आरोग्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. आरोग्यामुळे तुमच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येता कामा नये. सध्याच्या काळामध्ये एका सर्वाधिक वेगाने पसरत असलेल्या आरोग्यसमस्येची लोकांनी घरी आणि कामाच्या ठिकाणीही प्रभावीपणे काळजी घ्यायला हवी. ही समस्या म्हणजे मधुमेह अर्थात डायबेटिस. काळजीपूर्वक नियोजन केल्यास तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कामावर असताना व त्यापलीकडेही आपली सर्वोत्तम कामगिरी सातत्याने करत राहता येईल.

मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजीस्ट डॉ. श्वेता बुदियाल म्हणाल्या, “भारतामध्ये आता १०१ दशलक्षहून अधिक लोक मधुमेहासह जगत आहेत. २०१९ सालच्या संख्येहून हा आकडा ७७ दशलक्षहून अधिक आहे. मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित एक दीर्घकालीन आजार आहे व भविष्यात त्यातून इतर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्याचे नीट व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

आपला मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे ७ मार्ग पुढीलप्रमाणे:

१.    मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी आपल्या कामाच्या स्वरूपाशी मेळ साधू शकेल अशी कृतीयोजना आखा : आपला मधुमेह आणि आपली नोकरी या दोहोंची काळजी घेईल असा मार्ग काढण्याचे काम तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचण्याच्याही आधी सुरू होते. रात्री व्यवस्थित झोप घेतल्याने खूप फरक पडतो.  तसाच तो तुम्ही तुमच्या दिवसाचे नियोजन कसे करता यानेही पडतो. आपले नियमित वेळापत्रक तयार करा म्हणजे तुम्ही न्याहारी करणे विसरणार नाही.

२.    मधल्या वेळचे खाणे हुशारीने घ्या : ऑफिसात कधी तुमचे सहकारी चिप्स किंवा तळलेल्या पदार्थांवर किंवा गोळ्या-चॉकलेटांवर भलेही ताव मारत असतात किंवा कुणीतरी एखादी छान बातमी देण्यासाठी ऑफिसात सगळ्यांना मिठाई वाटत असते. या ना त्या कारणाने तुमच्या अवतीभोवती आरोग्याला अपायकारक पण आकर्षक पदार्थांची नेहमीच गर्दी झालेली असते. हे पदार्थ पूर्णपणे टाळणे खरोखरीच कठीण असू शकते, तेव्हा ते प्रमाणात खा आणि आपण काय खात आहोत याबद्दल सजग असा. काहीतरी तोंडात टाकण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हासाठी फळे, सुकामेवा, दही यांसारखे आरोग्यपूर्ण स्नॅक्स हाताशी ठेवा. तसेच तहान लागल्यावर साखरयुक्त किंवा कॅफीनयुक्त पेये पिण्याऐवजी पाण्याने तहान भागवणे योग्य हे लक्षात ठेवा.

३.    सकस आहार महत्त्वाचा : आपला डबा हुशारीने भरा म्हणजे तुम्हाला एक सकस, संतुलीत मील घेता येईल आणि तुम्हाला बाहेरच्या खाण्यावर अवलंबून रहावे लागणार नाही.

४.    आपल्या औषधांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळा: मधुमेह व्यवस्थित सांभाळण्यासाठी औषधे वेळच्यावेळी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुमचे ग्लायकेमिक नियंत्रण चांगले राहते. यातील कोणतेही औषध कामावर जाऊन घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्या फोनवर रिमाइंडर लावा किंवा आपल्या डेस्कवर वेळ सांगणारी सूचना लिहून ठेवा. 

५.    चालणे सुरु ठेवा: बऱ्याचशा कार्यालयांमध्ये बैठी जीवनपद्धती आढळून येते. शारीरिक हालचालींमुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. आपल्या डेस्कवरच थोडे स्ट्रेचिंग करून सक्रिय बना, ऑफिसमध्ये किंवा बाहेरही थोडे चाला, पायऱ्या चढा आणि उतरा.

६.    ताणतणावांचे व्यवस्थापन करायला शिका : तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमच्या ग्लुकोजच्या पातळीमध्ये बदल झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. काही वेळा तुम्ही कामामध्ये अक्षरश: बुडून जाता. अशा कठीण प्रसंगी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची तर ताणतणावांशी जुळवून घेण्याची यंत्रणा उपयुक्त ठरेल. एखाद्या शांत कोपऱ्यात ध्यानधारणा करा, मन मोकळे करण्यासाठी वेळ शोधा (एखादया सहकाऱ्याशी बोला किंवा कामातून थोडी उसंत घ्या) आणि ताण निर्माण होण्याची कारणे ओळखा व त्यांचे व्यवस्थापन करा.

Share this article