आता माझे वय 50 वर्षांचे आहे. चांगली नोकरी आहे. संसार सुखाचा चालला आहे. पण गेल्या 3 महिन्यांपासून आमच्या बिल्डींगमध्ये नव्यानेच राहायला आलेल्या, साधारण माझ्याच वयाच्या, शेजारणीवर माझे मन बसले आहे. आपण तिला शलाका म्हणू!
शलाका देखील विवाहित आहे. माझी बायको गृहिणी आहे, तर शलाका नोकरी करते. त्यामुळे ती मोकळ्या स्वभावाची आहे. पण गंमत अशी की, ती संपूर्ण बिल्डींगमध्ये फक्त माझ्याशीच बोलते. दिसायला अतिशय सुंदर आहे, म्हणून मी तिच्याकडे आकर्षित झालो आहे; असं म्हणता येणार नाही. पण तिची फिगर, टापटीप राहणं, जाता-येता विश् करणं, तिचा ड्रेस सेन्स, अन् तिचं लाघवी हास्य या गोष्टी पाहत मी हळूहळू तिच्या प्रेमात पडलो आहे. नाही म्हणायला, एकदा तिनं घातलेली तंग जिन्स आणि स्लीवलेस टॉप या ड्रेसमध्ये तिचं रुप मला भलतंच मोहक वाटलं होतं. जे सदैव डोळ्यापुढे दिसतं. मी सतत ती दिसण्याची वाट पाहत असतो. तिचा विचार करत राहतो. तिची स्वप्नंही पाहतो. कधी कधी वाटतं, तिच्या घरी जावं तसं तिनं मला स्वतःहून या ना कधीतरी चहाला, असं आमंत्रण दिलं आहे. पण गेलो तर, कोणी पाहिलं तर, लोक काय म्हणतील या विचारांनी माझं पाऊल मागे पडतं. कधी कधी वाटतं, आय लव्ह यू म्हणून सरळ आपलं प्रेम व्यक्त करावं. पण ती प्रतिसाद देईल का, याचीही भिती वाटते. शिवाय तिच्या एकूण वागण्याने तीही माझ्या प्रेमात पडली असेल, हे गृहित धरून, जर हे प्रेम जुळलं तर काय माझ्या अर्धांगीला कळलं तर काय? हेही प्रश्न सतावतात. काय करू ते कळत नाही. आपण काही मार्ग सुचवू शकाल का?
- अशोक, ठाणे
अशोकराव, तुमचे वय पाहता, तुमचे प्रेम शलाकावर जडलेले नसून तुमचे मन भरकटलेले आहे. ज्यांचे अॅरेंज मॅरेज झालेले असते, व ज्यांच्या संसारात काहीतरी कमतरता असते; त्यांच्या मनात प्रेमभावना- अर्थात् परस्त्रीबाबत निर्माण होते. शिवाय तुम्ही शलाकाचे जे वर्णन करताय् किंवा तिचे तंग ड्रेसमध्ये पाहिलेले रुप पाहून तुमच्या मनाला पडलेला मोह पाहता; प्रेमापेक्षा वासना हीच भावना तुमच्या मनात निर्माण झालेली दिसते आहे. तुमची शेजारीण शलाका, ही रुपानं देखणी नाही; हे तुम्हीच सांगताय्. म्हणजे जर तिच्याकडे रुप नाही, तिचे गुणदोष तुम्हाला पुरते माहीत नाहीत, तरी तुमचे प्रेम जडले म्हणताय्, हे पटण्यासारखे नाही. म्हणतात ना, माणूस खरं प्रेम कधी करतच नाही. आपण प्रेम करतोय् या भावनेवरच तो जगतो. तसेच नेमके तुमच्या बाबतीत झालेले दिसते आहे. शलाकाला बघून, ती तुम्हाला आवडू लागली किंवा तुम्ही तिच्या प्रेमात पडलाय्, हे नैसर्गिक आहे. पण तिला ’आय लव्ह यू’ म्हणून प्रेम व्यक्त करण्याचे धाडस करणे, शिष्टसंमत नाही. समाजमान्य नाही. अन् तुमच्या बायकोशी प्रतारणा करणेही योग्य नाही. धाडस करून शलाकाकडे प्रेम व्यक्त केलंच, तर ती प्रतिसाद देईल की नाही, याचीही तुम्हाला खात्री नाही. अन् लोकलज्जेचं भय देखील तुमच्या मनात आहे. तेव्हा शलाकाच्या प्रेमात पाऊल पुढे टाका, असा सल्ला मी मुळीच देणार नाही. तुमच्या अर्धांगीची भिती तुमच्या मनात आहेच. तेव्हा शेजारणीला प्रेमाची वाटेकरी बनविण्यापेक्षा सगळं प्रेम तुमच्या पतिव्रता बायकोच्याच वाट्याला येऊ द्या. शलाकाचा विचार डोक्यातून काढून टाका.