IMDb म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेसकडून दरवर्षी टॉप १० लोकप्रिय कलाकारांची यादी जाहीर केली जाते. यंदाच्या यादीत तीन अभिनेते आणि सात अभिनेत्रींचा समावेश आहे. प्रेक्षकांकडूनच या कलाकारांसाठी वोटिंग केलं जातं. ही रँकिंग IMDb च्या व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूवर आधारित आहे.
चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी विश्वातील सर्वांत प्रसिद्ध स्रोत असलेल्या IMDb ने २०२३ या वर्षातील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची घोषणा केली. ही विशिष्ट यादी जगभरातील IMDb च्या २० कोटींहून अधिक व्हिजिटर्सच्या पेज व्ह्यूजवर आधारित आहे. टॉप १० लोकप्रिय कलाकारांच्या यादीत बॉलिवूडच्या ‘किंग खान’ने अर्थात शाहरुखने बाजी मारली आहे. पठाण आणि जवान या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे जगभरातील चाहत्यांनी त्याला सर्वाधिक पसंती दिली. तर अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. १० हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.
IMDb ची २०२३ ची टॉप १० सर्वांत लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी
१- शाहरुख खान २- आलिया भट्ट ३- दीपिका पादुकोण ४- वामिका गब्बी ५ - नयनतारा ६- तमन्ना भाटिया ७- करीना कपूर खान ८- शोभिता धुलिपाला ९ - अक्षय कुमार १०- विजय सेतुपती
IMDb ची ही अशा कलाकारांची यादी आहे ज्यांना २०२३ या वर्षभरात IMDb च्या साप्ताहिक रँकिंगमध्ये वर्षभर उच्च रँकिंग मिळालेले होते. हे रँकिंग जगभरातील IMDb च्या दर महिन्याला २० कोटींहून अधिक असलेल्या व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूवर आधारित आहे.
आलिया भट्ट या यादीत सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचसोबत तिचा पहिलावहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटांशिवाय तिने या वर्षाच्या सुरुवातीला ‘मेट गाला’मध्ये पदार्पण केलं होतं. तर तिच्या RRR या चित्रपटाला अकॅडमी पुरस्कारही मिळाला. पाचव्या क्रमांकावर असलेल्या नयनताराने शाहरुखसोबत ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दीपिका पादुकोणसुद्धा ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांमध्ये झळकली.