दोन वर्षांपूर्वी 'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडमध्ये कोर्टरूमचा सीन दाखवण्यात आला होता. त्यात न्यायालयाचे कामकाज दाखवले गेले, ज्यामध्ये कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकलाकारांनी न्यायालयीन खोलीत होणारी कार्यवाही दाखवली. यामध्ये कपिल एका वकिलाच्या भूमिकेत दिसला होता आणि डबल मिनिंगने बोलत असताना त्याला दारू मागताना दाखवण्यात आले होते.
ग्वाल्हेरच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात आणि नंतर सत्र न्यायालयात वकील सुरेश धाकड यांनी शोचे निर्माते तसेच शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती आणि याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये या शोमधून न्यायालयाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले होते.
या प्रकरणासंदर्भात याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने असा युक्तिवाद केला की चॅनलवर प्रसारित होणारा कपिल शर्मा शोमध्ये डबल मिनिंगने बोलतो आणि महिलांबद्दलही भाष्य करतो. स्टेज शोमध्ये लावलेल्या कोर्टात मद्यपानही दाखवण्यात येते. हा न्यायालयाचा अवमान आहे आणि या युक्तिवादांवर त्यांनी कलम ३५६/३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने कपिल शर्माला मोठी मुदत दिली आहे. यादरम्यान न्यायालयाने संपूर्ण याचिकेवर सुनावणी घेऊन आपले म्हणणेही दिले. पोलिसांचा प्रसिद्धी स्टंटसाठी वापर करता येणार नाही, असेही न्यायालयाने वकील सुरेश धाकड यांना सुनावले.