ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये तसेच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी तब्बल २५० हून अधिक चित्रपट केले आहेत. तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. माझी धडपड कुठेतरी सार्थकी लागली असं मला वाटतं आहे. माझं काम सर्वांना आवडतं आहे याचा मला फार आंनद वाटतो आहे. काही वेळापूर्वी मला याची माहिती मिळाली. मी जे करतोय ते मला आवडेल की नाही यापेक्षा प्रेक्षकांना ते आवडतं की नाही याची काळजी मी नेहमीच घेतली. आत्तापर्यंत ज्या-ज्या माणसाने मला साथ दिली त्या सर्वांचं हे श्रेय आहे, माझी पत्नी निवेदिता ती खंबीरपणे माझ्यासोबत राहिली, सर्वांनी माझ्या कामात मला साथ दिली त्या सर्वांचं हे श्रेय आहे, असंही पुढे अशोक सराफ म्हणालेत.
अशोक मामांचं अभिनंदन!