मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता भूषण प्रधान आणि बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची मेहुणी अभिनेत्री अनुषा दांडेकर यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून, नुकतीच भूषण प्रधान याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, याचे शूटिंग सुरू झाले आहे.
अभिनेता भूषण प्रधान याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत भूषण प्रधान याने एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘माझ्या आवडत्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळाल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता आणखी छान वाटत आहे. ते केवळ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत नाहीये, तर त्यांच्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या स्क्रिप्टमध्ये आम्ही काम करतोय. ही स्क्रिप्ट त्यांनी स्वतः लिहिली असून त्याचे दिग्दर्शनही केले आहे.’
पुढे भूषण प्रधान याने लिहिले की, ‘मला या चित्रपटात काम करताना अतिशय थ्रिल वाटत आहे आणि मी या दरम्यानचे सगळे क्षण जपून ठेवत आहे. प्रत्येक दिवशी मला त्यांच्याकडून काहीना काही नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. ते शिस्तप्रिय आहेतच, त्यासोबतच ते कौतुक करणारे, खेळकर स्वभावाचे आणि प्रत्येकाची काळजी घेणारे आहे. महेश मांजरेकर सर तुम्ही खरंच कमाल आहात.’ या पोस्टवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत.
या आधी अभिनेता भूषण प्रधान याने अनुषा दांडेकर हिच्यासोबत देखील एक फोटो शेअर केला होता. या आगामी चित्रपटाच्या सेटवरून या दोघांनी आपले फोटो शेअर केले आहेत. अनुषा दांडेकर ही अभिनेता फरहान अख्तर याची पत्नी शिबानी दांडेकर हिची बहीण आहे. अनुषासोबत फोटो शेअर करताना भूषणने लिहिले की, ‘लाईट्स, कॅमेरा आणि जादू... या चित्रपटाची शूटिंग सुरू करताना खूप आनंद होतोय. माझ्या आवडत्या आणि प्रसिद्ध अशा दिग्दर्शकाच्या चित्रपटात अनुषा दांडेकरसोबत स्क्रीन शेअर करतोय.’