निर्माता अमित अग्रवाल यांनी आदर्श टेलिमीडिया प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत ‘राहगीर - द वेफरर्स’या चित्रपटाची घोषणा केली आहे. याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गौतम घोष यांनी केले असून हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रविवारी या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले आदिल हुसैन, तिलोत्तमा शोम, नीरज काबी आणि ओंकारदास मानिकपुरी हे यावेळी उपस्थित होते. निर्माता अमित अग्रवाल यांनी यापूर्वी आदर्श टेलिमीडिया प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत ‘एमएस धोनी, द अनटोल्ड स्टोरी’ तसेच कंगना रणौतच्या ‘सिमरन’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
‘राहगीर – द वेफेरर्स’ या चित्रपटात गरिबीने त्रस्त असलेल्या लोकांमधील भावनिक नातेसंबंधांचे चित्रण सादर करण्यात आले आहे. ज्यांना नवीन आर्थिक संधींच्या शोधात भारतासारख्या विशाल देशात पायी भटकायला भाग पाडले जाते. हा चित्रपट संकटकाळात मानवी सहानुभूतीची कथा सांगतो. ज्यात कलाकार उदरनिर्वाहाच्या शोधात प्रवास करत असताना एकमेकांशी निर्माण झालेल्या नात्याभोवती फिरतात. "राहगीर - द वेफेरर्स" चे चित्रीकरण झारखंड राज्यात झाले असून या चित्रपटाचा मोठा भाग रांची आणि नेतरहाटमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.
निर्माते अमित अग्रवाल याबाबत सांगतात की, “पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असा उदंड प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मला असे वाटते की अशा प्रकारच्या आयोजनामुळे इथे येणार्या चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपट प्रेमींना एक मोठा आणि खुला व्यासपीठ मिळतो. चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांनी 'राहगीर' चित्रपटाचा आनंद तर घेतलाच, त्याशिवाय चित्रपटाशी संबंधित प्रश्नांवर आपापसात चर्चाही केली. यावरून त्यांचे चित्रपटाशी असलेले नाते अस्सल असल्याचे दिसून येते. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सादर करण्याचा आमचा विचार आहे.
याप्रसंगी दिग्दर्शक गौतम घोष म्हणाले की, या चित्रपटाद्वारे भारतात राहणाऱ्या गरीब वर्गातील लोकांची कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.जे जंगलात राहतात आणि कठीण परिस्थितीत जगतात.त्यांची स्वतःची अशी स्वप्ने आणि इच्छा मर्यादित आहेत. मोठ्या शहरांमध्ये आणि गरीब आदिवासी गावात भारतीय वास्तव कसे वेगळे आहे हे चित्रपटातून बघायला मिळणार आहे. गरीबातल्या गरीब लोकांमध्येही जिवंत असलेल्या माणुसकीची ही एक सुंदर कथा आहे.
'राहगीर: द वेफेरर्स' याआधी अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. यात बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एमएएमआय - मुंबई चित्रपट महोत्सव, शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सिनेमा एशिया चित्रपट महोत्सव (अॅमस्टरडॅम), केआयएफएफ - कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, आयएफएफके - केरळचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे.