Close

लग्न टिकविण्याच्या संस्काराचीच खरी गरज! (Marriages Are A Lifetime Achievement)

  • प्रवीण मंत्री

  • आजकाल घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून करोना नंतरच्या देान वर्षामध्ये तीन पट वाढलेले आहे. ऐन उमेदीच्या काळात विवाहितांची पिढी डिप्रेशनमध्ये जात असून आयुष्याची वाताहत होत आहे. कुटुंबव्यवस्था मोडीत निघाली आहे. कुठलेही संयुक्तिक कारण नसताना सुखी संसार मोडायचा, शिक्षण जास्त घेतले, सुशिक्षितता आली म्हणजे घटस्फोटाचे लायसन्स मिळाले काय? विवाहसंस्था ही आयुष्यात स्थैर्य देण्यासाठी खूप गरजेची आहे. अशी पूर्वीपासून धारणा आहे. आता विवाहसंस्था ढासळू नये म्हणून लग्नाबरोबरच लग्न टिकविण्याचा संस्कार करण्याची वेळ आलेली आहे.
    आपल्या भारतामध्ये करोनाच्या साथीसह आणखीन एका भयंकर साथीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. या साथीच्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन आयुष्यात बदल होत असून सगळया क्षेत्रातील समीकरणेच बदलली आहेत. रोजच्या जीवनातील काही समस्या-प्रश्‍नही मागे पडले. नोकरी जाणे, नोकरीच्या पगारात कपात होणे यासारख्या समस्यांना सामोरे जाताना मागची दोन वर्षे खूप शिकवून गेली. 2020-22 या कालखंडामध्ये नवीन पिढीतील नवरा बायकोच्या नात्यांमध्ये होणारे बदल दुरावा निर्माण करतात. 25 ते 35 वयोगटातील विवाहितांचे वैवाहिक संबंध बिघडण्याचीच उदाहरणे कानावर ऐकू येऊ लागली. शहरी भागांमध्ये अर्धवट संसार मोडून घटस्फोट घेण्याच्या मानवी अपप्रवृत्तीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे असंख्य कुटुंबांना हतबल करून टाकले असून कुटुंबव्यवस्था मोडीत निघालेली आहे.
    ऐन उमेदीच्या- तारुण्याच्या काळात विवाहितांची पिढी डिप्रेशनमध्ये जात असून आयुष्याची वाताहत होत आहे. कुठल्याही व्यक्तीसाठी लग्न मोडणे यापेक्षा जास्त दुखःदायक काहीही असू शकत नाही. घटस्फोट झाल्यानंतर ते निराशेच्या गर्तेत जात असल्याचे पाहायला मिळते. काहीजण मूग गिळून हे दुःख पचवत आहेत. ज्यांना हे दुःख पचवता येत नाही ते कधी कधी आत्महत्येकडे वळतात. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस व्ही कोतवाल. यांनी सुध्दा नवरा बायकोच्या एका प्रकरणात छोटया मोठया भांडणावर चिंता व्यक्त केली असून संतापजनक टिप्पणी केलेली आहे. सामाजिक, नैतिक, कौटुंबिक बंधने झुगारण्याची अहमिका वाढीस लागलेली असून त्यात गैर काय हा विचार रुजताना आढळतो. कल्याण दिवाणी कोर्टातील वरिष्ठ स्तर न्यायालयामध्ये वर्षभरात 2189 घटस्फोट अर्ज दाखल झाल्याचे कळते.
    घटस्फोट हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. घटस्फोटामुळे फक्त नवरा बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त होत नाही तर दोघांची कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्या दोघांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण होतो. नाती, करिअर, अनिश्‍चितता तथा, यातून येणारे ताण, चिंता, निराशा आणि घुसमटीशी सामना करताना आत्मविश्‍वास, मनःस्वास्थ हरवून जाते.
  • अहंकाराला तिलांजली द्या
    लग्न म्हणजे कायद्यानं आणि समाजानं दिलेली मान्यता असून एक पवित्र संस्कार मानला जातो. प्रेम आणि विश्‍वासाचं ते एक सुुंदर नातं आहेच पण ते कर्तव्यनिष्ठेनं आणि समजूतदारपणे निभवावं लागतं. दोन वेगवेगळी लोकं एकत्र येऊन नवरा बायकोचं नातं स्वीकारतात व आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतात. प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपुलकीची, आदराची, नात्यांची जपणूक होते. अनेक नवीन नाती बांधली जाऊन जबाबदारी वाढते. सुरुवातीची काही वर्षे जडणघडणीमध्ये महत्त्वाची ठरून एकमेकांचा आधार बनतात. दोघांचा संसाररथ पुढे हळूहळू चालत राहतो. लग्न ही आयुष्यात तडजोड असते. सध्या ही तडजोड करण्याची वृत्ती खूपच कमी प्रमाणात आढळते. सगळेच आपल्या मनासारखे झाले पाहिजे, असा अट्टाहास करून चालत नाही. पती-पत्नीमध्ये रुसवे - फुगवे, भांडण होणे ही साधी गोष्ट आहे. कधी कधी पती-पत्नी यांच्या पुष्कळशा नात्यांमध्ये बिघाड आणणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार. दोघांपैकी कोणा एकाचा अहंकार लग्नरुपी संसाररथाचं चाक खिळखिळं करतो. तेव्हा या अहंकाराला मूठमाती दिलीच पाहिजे. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. तू माझं ऐकलंच पाहिजे. मी मी ह्या वृत्तीला तिलांजली द्यायला पाहिजे.
    शिक्षण जास्त घेतलं (पदवी-द्विपदवीधर) म्हणजे शहाणपण आलं असं नाही. उच्चशिक्षित म्हणजे जास्तीचा अहंकार असं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे अहंकाराला थारा देऊ नये हे सत्य प्रत्येकानं स्वीकारायला हवं. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अपेक्षा वाढीस लागल्या असून कमी वयात मिळणार्‍या जुन्या पिढीच्या दृष्टीने अमाप पैसा, त्यातून उद्भवणारी गुर्मी, उद्धटपणा, स्वकेंद्रित विचारसरणीचा हव्यास वाढलेला आहे. नवरा बायको दोघंही उच्चशिक्षित असल्यामुळे नोकरी करण्यावर भर दिला जातो. कंपनी-ऑफिसमध्ये टार्गेट, वेळेच्या बंधनामुळे नात्याकडे दुर्लक्ष होत आहे. नवरा बायकोच्या सुसंवादाची दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला शिक्षित झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास वाढल्यामुळे माझं जीवन मला हवं त्या पद्धतीने जगणार ही वृत्ती प्रबळ होत आहे.
  • सहमतीने घटस्फोट
    पत्नीकडून नवर्‍याला तुझ्याएवढे काम मी पण करते. मी पण कमविते. असे म्हणून त्याची खिल्ली उडविली जाते. यामुळे कौटुंबिक जीवनात ताणतणाव वाढत आहेत. गैरसमज वाढीस लागतात. हा गुुंता सोडविण्यास वेळच काढला जात नाही. प्रेमाऐवजी वैरभावना वाढते. त्याचा परिणाम कधी कधी घटस्फोटामध्ये होतो. सहमतीने घटस्फोट घेणारेही कमी नाहीत.
    गेल्या वर्षी अभिनेता अमीर खानने किरण रावशी मैत्रीपूर्ण घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तो तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चाही झाल्या. दक्षिणेतील अभिनेता धनुष आणि ऐश्‍वर्या रजनीकांत हे सुध्दा 18 वर्षाच्या सुखी संसारानंतर विभक्त झाले. तर महाभारत मालिकेतील कृष्णाच्या भूमिकेतील नितिश भारद्वाज याने पहिली पत्नी मोनिषा पाटील हिच्याशी सन 2005 मध्ये पहिला घटस्फोट घेतला. भारद्वाज यांचे दुसरे लग्न आयएएस अधिकारी स्मिता गाटे चंद्रा यांच्याशी 2008 मध्ये झाले. 12 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर भारद्वाज यांनी दुसरा घटस्फोट घेतला. नितिश भारद्वाज यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा, एक मुलगी तर दुसर्‍या पत्नीपासून दोन जुळ्या मुली आहेत. या घटस्फोटांमुळे मुलांचे मोठे नुकसान होते पण त्याची पर्वा कुणालाच नसते.
  • कुटुंब टिकले तर समाज टिकेल
    कुटुंब व्यवस्थेला बसणार्‍या या हादर्‍यांकडे कुणाचेच लक्ष नाही ? अर्धवट संसार मोडून वैवाहिक जीवनाला गांभीर्याने न घेण्याच्या युवा पिढीच्या वृत्तीला लगाम घालायला पाहिजे. भौतिक सुखाची आवड, सौंदर्य यातून निर्माण झालेले प्रेम, त्यातून लग्न ही संज्ञा समजून न घेताच झालेली लग्नं, हे घटस्फोट घेण्याचं फार मोठं कारण आहे. ही धोक्याची घंटा आहे. या प्रकाराने समाजाचा पायाच ढासळून जाणार यात शंका नाही. समाधानाने चाललेला संसार मोडून स्वतःचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायचं याला काय म्हणायचं? निवडणुका / सभांच्या निमित्तानं हजारोंचे मेळावे भरविणार्‍या नेते मंडळींनी समाजस्वास्थाकडे लक्ष देण्याची खरी आवश्यकता आहे. नाहीतर कुटुंबसंस्थांचा होणारा कडेलोट पाहण्याची वेळ देशावर येऊ शकते ! कुटुंब टिकले तर समाज टिकेल, समाज टिकला तर देश टिकेल हे लक्षात घेऊन समाजाला - तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करायला हवेत. आपल्या भारतीय संस्कृतीला मोठी परंपरा असून सहजीवनाची संस्कृती आहे. वसुधेव कुटुंबकम् पद्धती म्हणता म्हणता आपल्याला आपलेच कुटुंब, लग्न टिकविता येत नसेल तर जीवनाचा काय उपयोग ?
  • लग्न टिकविण्याचे संस्कार करण्याची गरज
    शिक्षणास सुद्धा काही अर्थ राहणार नाही. चांगल्यावाईट अनुभवाबरोबर कडू अनुभव आले तरी नात्यातला गोडवा कमी होऊ द्यायचा नाही. एकमेकांना आपण कायम आदर दिला की, प्रेम हे राहतेच. कुठल्याही मुलाने-मुलीने कितीही उच्च शिक्षण घेतले तरी आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत. उच्च विचारसरणी आणि समजूतदारपणा अंगी पाहिजे. तसेच दोघांमध्ये मॅच्युरिटीचा अभाव नको. कुटुंंबातील प्रतिमेला, सामाजिक प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य आपल्याकडून होता कामा नये. उदा. घटस्फोट आणि वेगळे होणे हा काही पर्याय नाही. ही शुद्ध पळवाट आहे.
    आपल्या समाजामध्ये 85 टक्के लग्नं ही ठरवून झालेली असल्याने लग्न हे दोघांचं असलं तरी ते अतूट बंधन आहे हे विसरता कामा नये. एकमेकांना त्यांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचं लग्न असलं तरी ते यशस्वी करण्यासाठी साहचर्य, प्रेम महत्त्वाचं आहे व हे प्रेम निर्माण करता येतं. त्यासाठी संवाद आणि तडजोड वृत्तीची आवश्यकता असून प्रत्येकानं आत्मपरीक्षण करायला हवं. आपआपसांत साधकबाधक चर्चा करून भावनांची देवाणघेवाण करायला पाहिजे. जोडीदारांमध्ये विश्‍वासाला फार महत्त्व आहे. कारण नवराबायकोचं नातं हे विश्‍वास आणि प्रेमावरच टिकून असतं. लग्नामध्ये सप्तपदी चालताना एकमेकांचे हात हातात घेऊन वचने घेतली जातात. नवर्‍याच्या उपरण्याला नवरीच्या शालीने किंवा पदराने मारलेली लग्नगाठ म्हणजे एकमेकांच्या साथीची-सहकार्याची शपथ असते. याचे भान दोघांनाही हवे. घटस्फोट ही दोन्ही कुटुंंबांना लाजिरवाणी गोष्ट आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे पण आपली भारतीय संस्कृती ध्यानात घ्यायला हवी. कारण भविष्यात ही विषवल्ली कुठली टोके गाठतील याची चिंता करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती संसार टिकविण्याची असून घटस्फोट घेऊन स्वैराचार करण्याची नाही. समाजस्वास्थासाठी या प्रश्‍नाकडे आस्थेने बघण्याची वेळ आली असून नातेसंबंधाचे पावित्र्य संपविल्यामुळे समाज विस्कळीत होऊन वेगळे सामाजिक-आर्थिक कौटुंबिक प्रश्‍न उभे राहतील. त्यासाठी याकडे पोटतिडिकीने बघण्याची आवश्यकता असून लग्न टिकविण्याचेच संस्कार करण्याची खरी गरज आहे!

Share this article