आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांचं हिंदी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक हिंदी सिनेमे दिले असून देश-विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ अशी ओळख त्या काळात मिळाली होती. अशा या सदाबहार अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव 'महजबी बानो' असं होतं. फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या मीनाकुमारी यांनी चित्रपट सृष्टीत मोठं नाव कमावलं. बालपणापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरवात केली. त्यानंतर ३० वर्षांच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले.
'पिया घर आजा', 'श्री गणेश महिमा', 'परिणीता' आणि 'बैजू बावरा' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले, त्या एक उत्तम नर्तिका देखील होत्या. मीना कुमारी केवळ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत होत्या.
सध्या मनोरंजन विश्वात बायोपिक बनवण्यावर अधिक भर दिला जात असल्याने आता ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर देखील बायपिक बनणार आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हा बायोपिक बनवणार असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बायोपिकमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन मीना कुमारी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग स्टेजवर असून त्यानंतर कास्टिंग केले जाईल. त्यानंतर मीना कुमारी यांच्या जीवनावरील बायोपिकचे चित्रीकरण होणार आहे. हा चित्रपट मनीष मल्होत्रा स्वतः दिग्दर्शित करणार आहे. त्याचबरोबर टी-सीरीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाद्वारे डिझायनर मनीष मल्होत्रा दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
ट्रॅजेडी क्वीन म्हटल्या जाणाऱ्या मीना कुमारी यांचे आयुष्य खुप वेदनादायी होते. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मीना यांना गरिबीमुळे अभ्यास करता आला नाही त्यामुळे त्यांनी बालपणात काम करायला सुरुवात केली. वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं. पण वैचारिक मतभेदांमुळे १९६४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
'पाकीजा' रिलीज झाल्यानंतर तीन आठवड्यांनी मीना कुमारी गंभीरपणे आजारी पडल्या होत्या. त्या आयुष्यात इतक्या एकट्या झाल्या होत्या की, त्या दारूचा आधार घेऊ लागल्या होत्या. हळूहळू त्यांना दारूची सवय लागली. मीना कुमारी या फार सुंदर आणि तेवढ्याच लोकप्रिय होत्या. त्या त्यांच्या काळात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी सिनेमात आपल्या काळात यशाचा एक इतिहास रचला होता. पण खऱ्या आयुष्यात त्या आधारासाठी झुरत राहिल्या. अखेर एकटेपणामुळे आणि दारूच्या सेवनामुळे त्यांचं निधन झालं.
आता क्रिती सेनन त्यांची भुमिका साकारणार असल्याने ती त्यांच्या पात्राला योग्य न्याय देवू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)