अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या खासगी आयुष्यात गेल्या तीन वर्षांत बरीच वादळं आली. एकीकडे समंथा तिच्या पतीपासून विभक्त झाली तर दुसरीकडे तिला मायोसिटीस या ऑटो इम्युन आजाराचं निदान झालं. समंथाने दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ही सर्वांत चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक होती. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या डेटिंगचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता नाग चैतन्य आज (8 ऑगस्ट) तिच्याशी साखरपुडा करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. ही अभिनेत्री दुसरी – तिसरी कोणी नसून ‘मेड इन हेव्हन’ सीरिज फेम सोभिता धुलिपाला आहे.
हैदराबादमध्येच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडणार असून नाग चैतन्यचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन हे स्वत: मुलाच्या दुसऱ्या लग्नाची माहिती माध्यमांना लवकरच देणार असल्याचं कळतंय. साखरपुड्यानंतर नाग चैतन्य आणि सोभिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा 2022 पासूनच होत्या. लंडनमधील एका रेस्टॉरंटमधील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्या युरोपमधील व्हेकेशनचे फोटो समोर आले होते.
याआधी नाग चैतन्यने समंथाशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. गोव्यात हा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडला होता. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी चाहत्यांना घटस्फोटाची माहिती दिली. समंथा अनेकदा या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. नाग चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.