श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते.
श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने माणसाला सापांचं भय राहत नाही, असं म्हणतात. तसंच ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनीही या दिवशी पूजा केल्याने त्यांना फायदा होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. यंदाच्या नागपंचमीला ४ शुभ योग जुळून येणार आहे.
सुरूवातीला पाहू या नागपंचमीचे महत्त्व : नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. तसेच जर कुंडलीत राहु आणि केतू पासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात.
नाग पंचमी २०२३ पूजेचा शुभ मुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार, नागपंचमीसाठी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी १२:२१ वाजता सुरू होईल आणि ही तिथी मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी पहाटे ०२:०० वाजता समाप्त होईल. सूर्योदयाच्या तिथीनुसार यंदा नागपंचमी सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त २ तास ३६ मिनिटे आहे. त्या दिवशी पहाटे ०५:५३ पासून नागपंचमीची पूजा करू शकता. नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे.
सर्व वाचकांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!