ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ सारखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारे नागराज मंजुळे आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. नागराज मंजुळे यांची पहिली पहिली वेब सीरिज ‘मटका किंग’ ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने काहीही नव्या वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली. यामध्ये नागराज मंजुळे यांच्या वेब सीरिजचाही समावेश आहे. नागराज मंजुळे यांच्या या धमाकेदार वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिका साकारणार असल्याचे देखील समोर आले आहे.
नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने अनेक वेब सीरिज आणि नव्या चित्रपटांच्या रिलीजची घोषणा केली आहे. यातच मराठमोळ्या नागराज मंजुळे यांची वेब सीरिज येणार म्हटल्यावर, प्रेक्षकांचा उत्साह अगदीच वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारे नागराज मंजुळे आता ओटीटीवर किती धमाल करणार, याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे.
वेगळ्या धाटणीच्या कथा आणि दिग्दर्शन यामुळे नागराज मंजुळे यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. ‘मटका किंग’ या वेब सीरिजमधून ते ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ या वेब सीरिजची निर्मिती रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एएसएमआर प्रॉडक्शनकडून केली जाणार आहे. तसेच, सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सेजवानी आणि आशिष आर्यन हे या वेब सीरिजचे निर्माते आहेत. या वेब सीरिजचे लेखन अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी केले आहे.
बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा नागराज मंजुळे ‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील कापसाचा व्यापार करणारा एक व्यक्ती मटका आणि जुगाराचा व्यवसाय सुरू करून, त्यातून एक मोठं विश्व कसं काय तयार करतो, हे या वेब सीरिजमधून पाहायला मिळणार आहे. नागराज मंजुळे यांची ही पहिलीवहिली वेब सीरिज मुंबईतला कुप्रसिद्ध ‘मटका किंग’ रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. या वेब सीरिजमध्ये सत्तरच्या दशकातील मुंबई पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.