Close

दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या बायोपिकची घोषणा! (Namdeo Dhasal Biopic)

आपल्या जहाल कवितेतून अन् साहित्यातून समाजमन ढवळून काढणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्त्यांमध्ये नामदेव ढसाळांचे नाव घेतले जाते. समाजातील तळागाळातील लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराबाबत नेहमीच सडेतोडपणे भूमिका घेणाऱ्या नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकची निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. मेकर्सनं त्याबाबत त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे परवानगी घेतली असून दोन वर्षांच्या संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत असल्याचे मेकर्सनं म्हटले आहे.

संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संजय पांडे या भव्य चित्रपटाचे निर्माते आहेत. यानिमित्ताने संजय पांडे म्हणाले की, “पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हानही आहे.”

लेखक आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी चित्रपटाचे महत्त्व व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "काही गोष्टी ह्या सांगायलाच पाहिजे कारण त्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. ढसाळ यांचे जीवन ही अशीच एक कथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांच्या कट्टर दलित पँथर चळवळ आणि त्यांच्या बंडखोर कवितेतून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला.

ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत.’’असे दिग्दर्शकानं म्हटलं आहे.

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “१५ फेब्रुवारी हा नामदेवचा जन्मदिवस..दहा वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत होऊन. नामदेवचं समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट.”

Share this article