सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित 'जर्नी' चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सचिन दाभाडे यांची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला हे ‘जर्नी’ चे सहनिर्माते आहेत.
थरारक अशा या ट्रेलरमधून एक मुलगा बेपत्ता झाल्याचे दिसत असून त्याचे पालक त्याला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता हा मुलगा खरोखरच बेपत्ता झाला आहे की तो त्याच्या पालकांवर रूसून निघून गेला आहे? हा बेपत्ता मुलगा नक्की कुठे आहे, अवघड वाटेवर त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आणि हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना १३ ऑक्टोबरला मिळणार आहे.
दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " 'जर्नी' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष्याशी, नात्यांशी आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष यानिमित्ताने उलगडणार आहे. ही ‘जर्नी’ प्रेक्षकांना बरंच काही देणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी मागे सुटत आहेत आणि त्याच पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न ‘जर्नी’मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.’’