हिंदी सिनेसृष्टीतील हम दिल दे चुके सनम, जोधा अकबर , लगान यांसारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत मोलाची कामगिरी बजावणारे नितीन चंद्रकांत देसाई आता या जगात नाही. इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे कर्जत येथील त्यांच्यात एन डी स्टुडिओत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कर्जतमधल्या एन डी स्टुडीओत फासाला लटकलेला त्यांचा मृतदेह आढळून आला. नितीन यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कलाविश्वातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गेल्या ३ दिशकांहून अधिक काळ ते आपल्या कलेने प्रेक्षकांना भूरळ घालत होते. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नितिन देसाई यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं होतं.
याशिवाय राजकारणाशीही त्यांचे जवळचं नातं होतं. उद्धव ठाकरे यांना ते मोठा भाऊ मानायचे. त्यामुळे २०१९ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते. तेव्हा देखील नितीन देसाई यांनी मोलाची कामगिरी पार पाडलेली.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी उभारण्यात आलेला मंच हा विशेष आकर्षण ठरला होता. छत्रपती शिवरायांचा विराजमान झालेला भव्य पुतळा कार्यक्रमाचे विशिष्ट्य बजावत होता. या सर्व स्टेज डिझाइनची जबाबदारी नितीन देसाईंनीच घेतली होती. विशेष म्हणजे अवघ्या २० तासांत त्यांनी तो स्टेज उभारलेला.
लगान, देवदास, जोधा अकबर यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांचे भव्य सेट नितीन चंद्रकांत देसाई यांनी डिझाइन केले होते. नितीनला हे सेट्स डिझाइन करण्यासाठी अनेक पुरस्कारही मिळालेवे. शपथविधीच्या मंचाबाबत त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हा सेट तयार केला जाणार होता. आमची बैठक झाली. मग त्यांच्या समोर बसून मी माझ्या ऑफिसमधून पूर्ण मॉडेल तयार केले. त्यांना हे मॉडेल आवडले. मग आम्ही कामाला लागलो.
मंचावर समोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हातात घेत नितीन म्हणालेले, 'जो राज्य करतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो. त्यांचे नाव घेऊनच राज्याचे काम पुढे नेले पाहिजे. उद्धवजींना छत्रपती शिवरायांबद्दल खूप आपुलकी आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या नावाने करणे पसंत करतात. ही गोष्ट पाहून ही योजना आखण्यात आली. ते म्हणाले, 'उद्धवजींच्या आयुष्यातील हा पहिला आणि अविस्मरणीय क्षण होता. या व्यासपीठाचे सर्वांनी खूप कौतुक केले आहे. मी हा कार्यक्रम मनापासून केला आहे कारण त्यात मी अनेक लोकांशी जोडलेला आहे.