Close

स्थूलता आणि मानसिक स्वास्थ्य! (Obesity and Mental Health)

अचानक एखाद्या दिवशी आपल्या लक्षात येतं की अरे, आपण स्थूल दिसायला लागले आहोत.
पण हे कसं शक्य आहे? कारण मी माझी लाइफस्टाईल बदललेली नाही, मी कोणतंही जंक फूड
वा तेलकट पदार्थ खात नाही. मग माझं वजन वाढण्याचं कारण काय असू शकेल? शिवाय वजन
कमी करण्याचा प्रयत्न करतेय, तर तेही होत नाहीये. असं तुमच्याबाबतीत घडत असेल तर तुम्ही
एकटेच नाही आहात. कारण काहीही कारणाशिवाय वजन वाढण्याची समस्या सध्या अनेकांना
भेडसावत आहे. काही वेळा केवळ शारीरिक कारणांना दोष न देता आपल्या मानसिकतेचाही विचार
करावयास हवा. भावनिकदृष्ट्याही आपण निरोगी असावयास हवे. कारण स्थूलता ही आपल्या
भावनिक स्थितीशीही संबंधित असते. स्थूलता आणि मानसिकता यांमध्ये काय संबंध आहे
याबद्दल ट्रांसफॉर्मेशन कोच हित्ती रंगनानी यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.
स्थूलता आणि मानसिक स्वास्थ्य! काय संबंध?
सतत खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढतं, असं आपल्याला वाटतं. परंतु प्रत्येक स्थूल व्यक्तीच्या
बाबतीत हेच एकमेव कारण असू शकत नाही. कारण काही वेळा विनाकारणही वजन वाढतं, जे
घातक ठरू शकतं. अशा प्रकारच्या अचानक वाढणाऱ्या वजनाचा आपल्या मानसिक स्वास्थ्याशी
अगदी जवळचा संबंध असतो, असं कोच हित्ती रंगनानी यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर
आपल्या भावनांचा आपल्या शरीरावर इतका खोल प्रभाव असतो की, त्यामुळे आपल्याला असाध्य
आजारही होऊ शकतो, असं त्या म्हणतात. तेव्हा निरोगी राहण्यासाठी केवळ शरीरच नाही तर
मनाचं आरोग्य जपणंही गरजेचं आहे. त्यासाठी काही उपचार करता येणं शक्य आहे.
स्थूलता कमी करणारे नैसर्गिक उपाय

स्थूलता कमी करण्यासाठी खालील 10 नैसर्गिक उपायांचा उपयोग करा. वजन कमी करण्यास
मदत करणारे हे अतिशय सोपे उपाय आहेत. यात तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.
१. निरोगी आहारशैलीचा पहिला मंत्र म्हणजे दिवसभर थोडं थोडं असं संपूर्ण दिवसात पाच वेळा
खा. परंतु असं करतानाही तुम्ही कोणत्या वेळेस काय खाता याकडेही लक्ष असू द्या.
२. रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या. जर तुम्हाला
कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर गरम पाण्यामध्ये दालचिनी घालू शकता, मधुमेह असेल तर
मेथीचे दाणे भिजवून ते घालू शकता, सर्दी असेल तर पाण्यात हळद घाला. या गोष्टींमुळे आपलं
आरोग्य चांगलं राहतं, वजन घटतं आणि सौंदर्य वृद्धिंगत होतं.
३. सकाळच्या न्याहारीमध्ये मोड आलेलं कडधान्य, गाईचं दूध, अंड, सुका मेवा इत्यादींचा
समावेश करा. तसेच इडली, डोसा, पोहे हे पदार्थही खाऊ शकता.
४. न्याहारी आणि दुपारचं जेवण या दरम्यान जी छोटी भूक असते, त्यावेळेस मोसमी फळ खाल्लं
पाहिजे. फळांमुळे आपल्याला ऊर्जा तसेच जीवनसत्त्वं आणि खनिजेही मिळतात. त्यामुळे आपली
रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फळांच्या नियमित सेवनामुळे आपल्याला कमी कॅलरीमध्ये सर्वच
पोषकतत्त्वं मिळतात. ही पोषकतत्वं वजन कमी करण्यास मदत करतात.
५. दुपारच्या जेवणात ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी खा. सोबत हिरव्या भाज्या आणि सर्व
प्रकारच्या डाळी खाऊ शकतो. जेवणासोबत सॅलडही हवं. कॅलरीज कमी करायच्या असतील तर
चपातीला तूप लावू नका. भाज्या व डाळींना फोडणी देताना तेल वा तुपाचा वापर कमी करा.
त्याऐवजी हळद, काळीमिरी, हिंग आदी मसाल्यांचा वापर करूनही स्वादिष्ट जेवण बनवता येतं.
या मसाल्यांमुळे शरीरातील चयापचयाची क्रियाही जलद होते आणि वजन कमी होण्यास मदत
होते.

६. संध्याकाळच्या भुकेसाठी नारळाचं पाणी, ताक किंवा दही घेऊ शकता. भाजलेले चणे, ब्राऊन
ब्रेडचं सँडविच, फळं देखील घेऊ शकता.
७. रात्री सूप, सॅलड, खिचडी यांसारखा हलका आहार घेतल्याने वजन कमी होतं. रात्रीच्या जेवणात
आणि झोपण्यात जवळजवळ तीन तासांचं अंतर हवं.
८. सडसडीत आणि बांधेसूद दिसण्यासाठी सकस आहारासोबतच व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. रोज एक तास मॉनिंग वॉक, जॉगिंग, व्यायाम, योग, ध्यान इत्यादीसाठी जरूर काढा.
९. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होईल. सकाळी
लवकर उठल्यानंतर तुम्हाला व्यायामासाठी वेळ काढता येईल.
१०. आपल्या छंदांसाठी वेळ द्या. आपल्या आवडीच्या छंदामुळे आपण आनंदी राहतो तसेच
तणावापासून दूर राहतो. त्यामुळे भावनिक कारणांमुळे येणारी स्थूलता त्रास देणार नाही.
हे उपाय अगदी सहज घरीच करता येण्याजोगे आहेत, तेव्हा आपण स्थूल आहोत याचा ताण
मनावर घेण्यापेक्षा, मनावरील ताण कमी करा मग आपोआप वजनही कमी होईल.

Share this article