'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'ला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘वन नेशन’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज ६ वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी मिळून बनवली आहे.
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनत आहेत. वास्तविक घटनांपासून ते प्रसिद्ध व्यक्तिरेखांवर वेब सीरिज आणि डॉक्युमेंट्री बनवल्या जात आहेत. अशा वेब सीरिजना प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळत असून, सर्वत्र त्याच्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावरही चित्रपट बनवण्यात आले आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'वर एक वेब सीरिज बनणार आहे. आरएसएसला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज ६ वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी मिळून बनवली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यांनी या वेब सीरिजचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आरएसएसच्या पोशाखात दिसत आहे. या व्यक्तीचा चेहरा उघड करण्यात आलेला नसून, त्याचा फोटो पाठमोरा काढण्यात आला आहे. या सीरिजबद्दल अधिक माहिती देखील पोस्टरमध्ये शेअर करण्यात आली आहे.
पोस्टर शेअर करताना तरण आदर्श यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, '६ राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आरएसएसची १०० वर्षे साजरी करण्यासाठी एकत्र येत आहेत. ही वेब सीरिज आरएसएसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रदर्शित होणार असून, तिचे नाव 'वन नेशन' असे ठेवण्यात आले आहे. प्रियदर्शन, विवेक अग्निहोत्री, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, मंजू बोराह, जॉन मॅथ्यू माथन आणि संजय पूरणसिंह चौहान हे प्रसिद्ध दिग्दर्शक या सीरिजच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळणार आहेत.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' अर्थात 'आरएसएस'बद्दल बोलायचे तर, २७ सप्टेंबर १९२५ रोजी केशव बळीराम हेडगेवार यांनी याची स्थापना केली होती. या संस्थेचा उद्देश हिंदू आणि हिंदुत्व विचारसरणीचा प्रचार आणि संरक्षण करणे हा होता. सध्या मोहन भागवत हे आरएसएस प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या आधी केशव बळीराम हेडगेवार, एम एस गोळवलकर, मधुकर दत्तात्रेय आणि के एस सुदर्शन यांच्याकडे ही कमान होती.