Close

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Panchak Marathi Movie Trailer Out Now)

माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेल्या ‘पंचक’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मराठीतला आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट पंचक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्या घरामध्ये अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही. सोशल मीडियावर त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत.

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार, हे बघताना मजा येणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ''यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 'पंचक' हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट आहे. 'पंचक' खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार आहेत. कथा उत्तम आहे. प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात.”

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, “श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे.”

अभिनेत्री काजोलने नुकताच माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर शेअर करत अभिनेत्रीने माधुरीसह श्रीराम नेनेंना ‘पंचक’साठी शुभेच्छा दिल्या आहेत. या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर काजोल लिहिते, “माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने हे दोघंही आपल्या नववर्षाची दमदार सुरूवात करण्यासाठी सज्ज आहेत. हा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. तुम्हा दोघांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा!” काजोलने शेअर केलेली पोस्ट माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर करत तिचे आभार मानले आहेत. 

Share this article