सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय असा गायनाचा रियालिटी शो इंडियन आयडॉल नवीन सत्र घेऊन येत आहे. यावेळी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल परीक्षकांच्या पॅनलवर असणार आहे. हा शो सध्या आपल्या आवाजाने समस्त देशाला मोहित करण्याची क्षमता बाळगणाऱ्या, देशातील उगवत्या गायकांच्या शोधात आहे.
महान मेलडी क्वीन श्रेया घोषालने यावेळी इंडियन आयडॉलमध्ये परीक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. या नवीन जबाबदारीबद्दल उत्साहाने बोलताना ती म्हणते, “इंडियन आयडॉलच्या चमकदार विश्वात पुन्हा एकदा प्रवेश करताना मला घरी परतल्याचा आनंद होत आहे. इंडियन आयडॉल ज्युनियरमध्ये मी परीक्षक म्हणून काम केले होते आणि त्यात मला खूप आनंद मिळाला होता, पण इंडियन आयडॉलच्या या सत्रात आणखी एक विशेष आकर्षण आहे, कारण यावेळी मला पुन्हा एकदा सानू दा आणि विशाल या परीक्षकांसोबत एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. भारतातील नव्या दमाचे कलाकार शोधून त्यांना पैलू पाडण्याचा मान मला मिळाला आहे आणि भारताचा आगामी इंडियन आयडॉल बनण्याच्या त्यांच्या प्रवासात साक्षीदार बनण्याचा आनंद मला मिळणार आहे.”
ती पुढे म्हणते, “एका रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सुरुवात करण्यापासून ते आता इंडियन आयडॉलसारख्या लोकप्रिय शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्यापर्यंतचा माझा प्रवास कष्टसाध्य होता पण माझ्या कष्टाचे फळ देणारा होता. इंडियन आयडॉलसारखे शो उगवत्या कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी आणि संगीत क्षेत्रातील कार्यप्रणालीचा अनुभव घेण्यासाठी एक राष्ट्रीय मंच प्रदान करतात. हा शो मी आवडीने बघते आणि इंडियन आयडॉलच्या या सत्राकडून देखील सर्वांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. एक परीक्षक म्हणून या शोमध्ये वाटचाल सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे.”