सध्या मणिपूर येथील जातीय वादावरील भयानक वास्तव दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तेथील जमाव दोन महिलांना निर्वस्त्र करुन गावात फिरवत आहे. तसेच त्यांच्यावर बलात्कार झालेल्याचेही समोर आले. या घटनेने संपूर्ण देशभरात वातावरण चांगलेच पेटले आहे.
बॉलिवूडमधील अक्षय कुमार, जया बच्चन, कियारा अडवाणी , उर्मिला मातोंडकर यांसारख्या कलाकारांनी या घटनेविरोधात आपले मत व्यक्त करत आवाज उठवला आहे. अशातच आता दूरदेशा राहणारी प्रियांका चोप्रादेखील या घटनेवर व्यक्त झाली आहे.
प्रियांका लग्नानंतर भारतात राहत नसली तरी ती इथल्या गोष्टीवर लक्ष ठेवून असते. आणि घडणाऱ्या घटनांवर वेळोवेळी संताप व्यक्त करते. आजदेखील तिने मणिपूरमधील लाजिरवाण्या घटनेवर खेद व्यक्त करत लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सरकारकडे केली.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले, या घृणास्पद गुन्ह्याच्या 77 दिवसांनंतर, त्यावर कारवाई करण्यापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला. यामागे काय तर्क आहे? याचे कारण काय? काय आणि का, स्थिती आणि परिस्थिती विचारात न घेता, आपण कोणत्याही परिस्थितीत महिलांना कोणत्याही प्रकारच्या खेळात प्यादे बनू देऊ शकत नाही.
प्रियांकाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून त्यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.