येत्या सोमवारपासून, म्हणजे १८ जुलैपासून ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही नवी मालिका सुरू होत आहे. ती स्टार प्रवाह चॅनलवर सायं. ७ वा. प्रक्षेपित होणार आहे. या मालिकेत गावरान गुंजा आणि शहरी कबीर ही प्रमुख जोडी असून त्यांच्यासोबत मृण्मयी हे एक महत्त्वाचं पात्र दिसणार आहे. ही मृण्मयी, कबीरवर निस्सीम प्रेम करणारी मराठीची प्रोफेसर आहे. कुणावरही विश्वास न टाकणारी, पण एखाद्यावर विश्वास जडला की अखेरपर्यंत निभावणारी अशी ही व्यक्तीरेखा, सुप्रसिद्ध अभिनेत्री पूर्णिमा डे साकारत आहे.
मृण्मयी या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना पौर्णिमा म्हणाली, ‘मी खूप दिवस ज्या भूमिकेच्या शोधात होते ती भूमिका मला मृण्मयीच्या रुपात भेटली. मनाने हळवी मात्र मनस्वी असं हे पात्र आहे. या पात्राला खूप शेड्स आहेत. तिच्या सधन असण्याचा तिला अजिबात अहंकार नाही. मात्र कबीरने तिच्यापासून कधी काही लपवू नये इतकीच तिची भाबडी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृण्मयी दुष्ट नाही. नावाप्रमाणेच ती मृदू स्वभावाची आहे. मराठीची प्रोफेसर असल्यामुळे समजून घेणं आणि समजावून सांगणं तिला उत्तम जमतं. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. स्टार प्रवाह वाहिनी, आमच्या निर्मात्या स्मृती शिंदे आणि डिझायनर वैशाली देशमुख यांनी खूप उत्तमरित्या माझा लूक डिझाईन केला आहे. मला हे पात्र साकारताना अतिशय आनंद मिळतोय. प्रेक्षकांनाही हे पात्र आणि ही मालिका नक्कीच आवडेल.’