दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार असून, त्यांच्या आनंदाला सीमा नाही. सध्या दीपिका बऱ्याच डिनर डेटवर जात आहे आणि तिच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवत आहे. रणवीरही गरोदर दीपिकाची विशेष काळजी घेत आहे. नुकतेच दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासोबत डिनर डेटवर गेले होते. तिथे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने रेस्टॉरंट स्टाफसोबत सेल्फी क्लिक केला, जो सध्या व्हायरल होत आहे.
'बेनीज कॅफे'ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. रणवीर सिंगने संपूर्ण स्टाफसोबत हा सेल्फी क्लिक केला. तसेच दीपिका पदुकोणही त्याच्या सोबत आहे. रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या या स्टाइलचे चाहते कौतुक करत आहेत.
रणवीर आणि दीपिका सोमवार, ३ जून रोजी डिनर डेटवर गेली होती. यावेळी दीपिकाने शर्ट ड्रेस आणि गॉगल घातला होता. रणवीर आणि दीपिका जेवणानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडले तेव्हा त्यांना चाहत्यांनी आणि पापाराझींनी घेरले होते. हे पाहून रणवीरने पत्नी दीपिकाचा हात धरला आणि तिला कारपर्यंत नेले. यावेळी रणवीरचे वडील आणि सासू उजाला पदुकोणही होते. दीपिकाची ही सलग तिसरी डिनर डेट होती. यापूर्वी ती आई आणि इतर नातेवाईकांसोबत जेवायला गेली होती.
डिनर डेटच्या एका दिवसानंतर दीपिका पदुकोण एका लक्झरी स्टोअरमध्ये खरेदी करताना दिसली. रेडिटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शॉपिंग करताना दिसत आहे. तिचा बेबी बंप लपविण्यासाठी तिने लांब कोट घातला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी अंदाज बांधला की कदाचित ती बाळासाठी कपडे खरेदी करत असावी.
काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण 14 नोव्हेंबर 2018 रोजी विवाहबद्ध झाले. फेब्रुवारी 2024 मध्ये, या जोडप्याने चाहत्यांसह गोड बातमी शेअर केली. लग्नाच्या साडेपाच वर्षानंतर दीपिका आणि रणवीर आई-वडील होणार आहेत.