सध्या अभिनेता अजय देवगण याचा भाचा आणि अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक यांच्याबद्दल चर्चा रंगत आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी, अजय देवगण याचा भाचा अमन देवगण याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी आहे. राशा आणि अमन यांच्या जोडीला ‘काय पो चे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर लॉन्च करणार आहेत. ज्यांनी अभिनेत्री सारा अली खान हिला देखील ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून मोठा ब्रेक दिला.
अभिषेक कपूर यांना राशा आणि अमन यांना हॉटेलमध्ये लंच करताना देखील स्पॉट केलं आहे. एवढंच नाही तर, राशा आणि अमन यांची ट्रेनिंग देखील पूर्ण झाली असून सिनेमाची तयारी सुरु असल्याची चर्चा रंगत आहे. दोघं देखील आगामी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यामुळे राशा आणि अमन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करतील की नाही ने पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राशा आणि अमन यांच्या सिनेमात ॲक्शन सीक्वेन्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांच्या खांद्यावर आहे. राशा थडानी सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करू शकते.. असा अंदाज दिग्दर्शकांनी वर्तवला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता अजय देवगण देखील सिनेमात मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.
रवीनाची मुलगी राशाबद्दल सांगायचं झालं तर, राशाने नुकताच तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर दुसरी कडे अमन याचा भाऊ दानिश बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. दानिश हा चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे. त्याने ‘द बिग बुल’ आणि ‘तान्हाजी’ सारख्या सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या राशा आणि अमन यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.. महत्त्वाचं म्हणजे सिनेमात राशा आणि अमन यांच्यामध्ये कोणतं कनेक्शन असेल, सिनेमाची कथा कोणत्या विषयाभोवती फिरणारी असेल शिवाय, राशा आणि अमन, अजय यांच्यासोबत सिनेमात अन्य कोणते कलाकार असतील या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत.