Close

सतेज सौंदर्यासाठी उपाय (Remedies for Glowing Skin)


ऑक्टोबर हिटमुळे अनेकांना त्वचा काळवंडण्यासारख्या एक ना अनेक सौंदर्य समस्या भेडसावत असतात. असे होऊ नये यासाठी काही साध्या-सोप्या दक्षता घेता येतील आणि त्याद्वारे सणांचा हा मौसम नक्कीच सुखकारक होईल.
ऑक्टोबर महिना विविध सणांची चाहूल घेऊन येत असतो. पण या सणांचा आनंद फिका पडतो, तो या काळातल्या कडक उन्हामुळे, अर्थात ऑक्टोबर हिटमुळे! त्वचा काळवंडणे, मुरुमे अशा अनेक सौंदर्य समस्या या काळात अनेकांना सतावतात. तुम्हाला त्या सतावू नयेत, असे वाटत असेल तर या काही दक्षता आवर्जून घ्या.
प्रखर उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि तहान जास्त लागते. म्हणूनच या मौसमातही ठरावीक कालावधीनंतर नियमितपणे पाणी प्यायला हवे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास, क्षारांचे प्रमाण वाढते आणि परिणामी, चेहर्‍यावर मुरुमे येतात.
उन्हामुळे शरीरातील तैलग्रंथी अधिक प्रमाणात तेल निर्माण करतात, त्यामुळे चेहरा तेलकट होतो. तेलकट चेहर्‍यावर धूलिकण चिकटून अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी दिवसातून 5-6 वेळा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
फळ-भाज्यांच्या रसाचाही आहारात अधिकाधिक समावेश करायला हवा.
शरीर आणि त्वचेला आवश्यक पोषणद्रव्ये मिळावी, यासाठी भरपूर प्रमाणात फळे खा आणि त्यांचा गर चेहर्‍यासही लावा.
कडक उन्हामुळे चेहरा काळवंडू नये, यासाठी नियमितपणे सनस्क्रीन लावा. त्वचेचा पोत ओळखून त्यानुसार योग्य सनस्क्रीनची निवड करा.
घरातून बाहेर पडण्याच्या 15 ते 20 मिनिटे आधी चेहर्‍यावर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन वापरल्यानंतर त्याचा परिणाम फक्त 4-5 तासच राहतो. त्यामुळे उन्हात अधिक काळ राहायचे असल्यास, पुन्हा 4 तासांनी सनस्क्रीनचा वापर करा.
सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ) 15 ते 25 पेक्षा अधिक असलेले सनस्क्रीन लोशन वापरा.
कोरड्या त्वचेला लोशन स्वरूपात, तर तेलकट त्वचेला जेल स्वरूपातले सनस्क्रीन वापरा. तसेच ज्यांना मुरुमांचा त्रास आहे, त्यांनी नॉन-कोमेडोजेनिक सनस्क्रीनचा वापर करा.
सनस्क्रीन हे केवळ त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी असते. त्यामुळे उन्हातून घरी किंवा ऑफिसध्ये गेल्यावर लगेच चेहर्‍यावरील सनस्क्रीन स्वच्छ पाण्याने धुवा व त्वचेवर मॉइश्‍चरायझर लावा.


चेहर्‍याला नियमितपणे क्लिंझिंग, टोनिंग व मॉइश्‍चरायझिंग करा.
शक्यतो ऑईल बेस क्रीम आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा.
आठवड्यातून किमान एकदा बंद डोळ्यांवर बटाटा, काकडी यांच्या पातळ चकत्या ठेवा. यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी होतात.
उन्हामुळे त्वचेची काहिली होत असल्यास, कॅलेमाइन लोशन वापरा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेच गुलाबपाणी, दही व कोरफड यांचे घरगुती उपचारही करता येतील.
उन्हामुळे चेहरा काळवंडला असल्यास, सफरचंद उकडून त्याच्या गरामध्ये 2 थेंब ग्लिसरीन आणि 1 चमचा हळद एकत्र करा. हा पॅक हात, पाय, मान, चेहरा येथे चोळा आणि 10 मिनिटांनी धुवा.
टॅनिंगवर घरगुती उपचार ः तेलकट त्वचेवर दही आणि बेसन याचं मिश्रण लावा. कोरड्या त्वचेवर पपईचा गर आणि मलई एकत्र करून लावा.
तसेच मुलतानी माती आणि चंदनाचा लेप लावल्यास त्वचेला थंडावा तर मिळतोच, सोबत चेहरा सतेजही दिसतो.

Share this article