केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीला तो उतरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. जागतिक लोकप्रियतेचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपली पत्नी अंजली व मित्रांसह हा चित्रपट पाहिला.
सचिन तेंडुलकरने सोशल मिडियावर या चित्रपटाची स्तुती केली आहे. त्यात तो म्हणतो, “बाईपण भारी देवा ही सहा बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. मला हा चित्रपट पाहून खूप आनंद झाला. कधी एकदा माझी आई आणि आत्या हा चित्रपट बघतील असे मला झाले आहे… सदर चित्रपटाच्या कलाकारांना भेटणे हा सुंदर अनुभव होता.”
चित्रपटाच्या कलाकार व संपूर्ण टीमशी सचिनने गप्पा मारल्या व त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा परब-चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.