स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पिंपरी पुणे येथील सई आणि शरयू यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले जळगावचे सागर आणि दिव्येश. तृतीय क्रमांकाचा मान कल्याणच्या झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला. तर श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. महाअंतिम सोहळ्यातील विजेत्या सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या खास सोहळ्यात सई आणि शरयूला शुभविवाह मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती.
विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना सई आणि शरयू म्हणाल्या, ‘हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल आम्ही आभारी आहोत. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.’
सई आणि शरयू या दोघीही पुण्यातल्या गौरव डान्स अकादमीमधून नृत्याचं शिक्षण घेत आहेत. याच दरम्यान त्यांना मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेता हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. नृत्याची आवड आणि दोघींमधल्या घट्ट मैत्रीने सई आणि शरयूला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं. इतक्या लहान वयात मिळालेलं हे घवघवीत यश त्यांचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की.