सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आतापर्यंत सईने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. ज्याप्रमाणे सई तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते, त्याचप्रमाणे सई ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते.
२०२४ हे वर्ष तिच्यासाठी सर्वार्थाने खास ठरत आहे. सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सईची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. यावेळी अभिनेत्रीचे काही कुटुंबीय आणि आई उपस्थित होती. लेकीचा आनंद पाहून तिची आई देखील भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सई ताम्हणकरने सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत तिने आलिशान घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता अभिनेत्रीच्या घरी ही आलिशान गाडी आल्याने सध्या नेटकऱ्यांसह कलाकार मंडळी सईवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
“तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे कोणालाही सांगू नका. स्वप्न पाहा, ते साध्य करा अन् ते स्वप्न जगा!” असं कॅप्शन देत सईने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’नंतर आता येत्या काळात सई ‘डब्बा कार्टल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ अशा वैविध्यपूर्ण प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.