भारत सरकारतर्फे विविध संगीत कला अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात मूळ भोपाळच्या व आता नागपुरात स्थायिक झालेल्या प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती प्रियंका ठाकूर यांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2023’ जाहीर झाला आहे. नागपूर व विदर्भातील नाट्य क्षेत्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रियंका ठाकूर यांच्या पारंपारिक रंगभूमीवरील त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रशंसनीय योगदानाबद्दल कलाविश्वातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
प्रियंका ठाकूर यांनी वयाच्या 14 व्या वर्षी 2006 साली भोपाळमधून आपल्या नाट्य प्रवासाला प्रारंभ केला. अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती आणि नाट्य लेखनही त्यांनी केले आहे. रंगमंच, टीव्ही आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये मागील 16 वर्षांपासून त्या कार्यरत असून राष्ट्रपुरुष अटल, पंडित दीनदयाल, झलकारीबाई, बोस, तंट्या भील ही त्यांची महानाट्ये चांगलीच गाजली आहेत.
अनुल्लेखित राहिलेल्या महापुरुषांच्या गौरवगाथा, विस्मरणात गेलेले इतिहासात नायक-नायिका आणि समाजातील उपेक्षित घटक, उपेक्षितांना आपल्या अभिनयाच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या प्रियंका शक्ती ठाकूर यांना मध्य प्रदेशच्या व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते यापूर्वी शौर्य पुरस्कार, सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संगीत नाट्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार दिला गेलेला हा सन्मान माझ्यासाठी गौरवाची बाब असून माझा आनंद कीर्ती द्विगुणित करणारा आहेत. हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या पुरस्काराचे श्रेय मी कुटुंबिय आणि सहका-यांना देते, अशी प्रतिक्रिया प्रियंका ठाकूर यांनी दिली.