स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेचं कथानक एक वर्षांनी पुढे सरकलं आहे. अपघातात अंकुशचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं असलं, तरी अंकुश जिवंत असल्याची खात्री अबोलीला आहे. एक दिवस अंकुश नक्की परत येईल हा विश्वास अबोलीला वाटतोय. तर दुसरीकडे अंकुश सारखाच दिसणारा सचित राजेही मालिकेत दिसतोय. सचित राजे हाच अंकुश आहे की अंकुशसारखा हुबेहुब दिसणारा दुसराच कुणीतरी याचा उलगडा मालिकेच्या पुढील भागांमधून होईलच. सध्या सचित राजे या नव्या पात्राने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. सचित राजेच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वीच मालिकेत दर्शन झालं. आता त्याचा मुलगा शार्दुल राजे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुप्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरेचा मुलगा रेयान वावरे शार्दुल राजे हे पात्र साकारणार आहे. वडिलांप्रमाणेच शार्दुललाही गाण्याची आवड आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या दुसऱ्या पर्वासाठी रेयानने ऑडिशनही दिली होती. याच मंचावर त्याच्यातलं टॅलेण्ट स्टार प्रवाह वाहिनीने हेरलं आणि त्याची अबोली मालिकेतील शार्दुल या पात्रासाठी निवड झाली. या चिमुकल्या पाहुण्याच्या एण्ट्रीने अबोली मालिकेच्या सेटवर नवा उत्साह संचारला आहे. शार्दुलसोबतचे सीन मालिकेत नवी रंगत आणतीलच पण त्यासोबतच अंकुश-अबोलीची भेट होणार का हे पहाणं उत्सुकतेचं असेल.