Close

अग्गंबाई सासूबाई (Short Story: Agaabai Sasubai)

  • रेखा नाबर
    आठ वर्षांपूर्वी सोसायटीत राहायला आलेले देशपांडे कुटुंब. मुलगा, सून आणि आई. मुलगा आणि सून कामावर जायची. आई घरात. सकाळ-संध्याकाळ कामाला बाई. हॅपी गो लकी असे कुटुंब होते. येता जाता ‘हाय हॅलो‘ व्हायचे. सोसायटीच्या मिटिंगला भेट व्हायची. वर्धापनदिनाच्या गेट टुगेदरला गप्पा, जेवण असा एकत्रित कार्यक्रम व्हायचा. तेवढाच सहवास. राधाबाई संध्याकाळी सहा ते सात सांजफेरी करायच्या. सात वर्षे चाललेल्या संथ जीवनक्रमात एका सकाळी वादळ घोंघावले.
    आता देशपांडेच्या घरात सारे शांत शांत झाले होते. घरात राधाबाईंच्या समवेत एक तरुण मुलगी राहत असल्याचे शेजारच्या दामलेंकडून कळले. सहजच दुपारी भेटायला गेले. दरवाजासमोरच्या भिंतीवर सुदेशचा मोठा फोटो लावला होता. त्याला घातलेल्या हारांतील ताज्या फुलांचा सुगंध वातावरणांत भरून राहिला होता.
    “या सुधाबाई, बरं झालं आलात. आत्ताच पोथी वाचून झाली.”
    “बर्‍या आहात ना राधाबाई तुम्ही?”
    “हो. बरीच म्हणायची. आला दिवस ढकलतेय.”
    “तुमच्या बरोबर ती मुलगी कोण असते?”
    “अहो, ती समिधा. आमच्या सुजाताच्या मैत्रिणीची बहीण. तिचं घर आहे सातार्‍याला. इथे तिला चांगली नोकरी मिळाली. तिची राहायची सोय झाली, माझी सोबतीची.”
    “मग सुजातानेच राहायचं ना इथे! दोन बेडरुम्स आहेत. जागा काही कमी पडली नसती.”
    “जागेचा प्रश्‍नच नाहीये. तिने घेतलेला निर्णय योग्यच आहे. येतेच की अधूनमधून भेटायला. समिधा गुणी आहे हो. मला काही कमी पडू देत नाही. शारदाबाई आहेच मदतीला.”
    “ म्हणजे इकडेच जेवते का?”
    “हो तर. सकाळचा नाश्ता, दुपारचा डबा. रात्रीचं जेवण सगळं इथे. रविवारी हमखास काहीतरी नवीन. छान चाललंय आमचं. सुजाता सुद्धा येते कधी कधी जेवायला.”
    “ही तुम्ही तुमच्या मनाची समजूत करून घेतलीय. पण तुम्हालाही आतून वाटत असणार की सुजाताने असं करायला नको होतं. ”
    “तिने घेतलेला निर्णय योग्यच आहे. बंडखोरी वाटत असेल तुम्हाला, पण ती अनाठायी नाही.”
    आठ वर्षांपूर्वी सोसायटीत राहायला आलेले देशपांडे कुटुंब. मुलगा, सून आणि आई. मुलगा आणि सून कामावर जायची. आई घरात. सकाळ-संध्याकाळ कामाला बाई. हॅपी गो लकी असे कुटुंब होते. येता जाता ‘हाय हॅलो‘ व्हायचे. सोसायटीच्या मिटिंगला भेट व्हायची. वर्धापनदिनाच्या गेट टुगेदरला गप्पा, जेवण असा एकत्रित कार्यक्रम व्हायचा. तेवढाच सहवास. राधाबाई संध्याकाळी सहा ते सात सांजफेरी करायच्या. सात वर्षे चाललेल्या संथ जीवनक्रमात एका सकाळी वादळ घोंघावले. घरातून रडण्याचा आवाज ऐकू आला. शेजारच्या दामल्यांनी धाव घेतली.
    “हॅलो, मी दामले बोलतोय. देशपांड्यांच्या घरात काहीतरी भयंकर प्रकार घडलाय. आम्ही दोघं जातोय. सबनीस, तुम्ही सेक्रेटरी आहात म्हणून कळवलं.”
    सबनीस दांपत्य सुद्धा हजर झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी डॉ. नाडकर्णींना फोन केला. त्यांनी आल्यावर खुर्चीत पुतळ्यासारख्या बसलेल्या सुदेशला मृत घोषित केले. चहा घेता घेताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. सुजाता व राधाबाई एकमेकींना मिठी मारून धाय मोकलून रडत होत्या. महिला त्यांच्या सांत्वनासाठी पुढे सरसावल्या. सुदेशचा अकाली मृत्यू अत्यंत हृद्यद्रावक होता. पुढील सोपस्कार उरकले. नातेवाइकांची ये जा चालू झाली. जीवनाच्या चाकांनी हळूहळू गती घेतली. पंधरा दिवसांनी सुजाता कामावर निघाली. चेहर्‍यावर मलूल भाव होते व गतीही संथ झाली होती. आश्‍चर्य म्हणजे गळ्यांतील मंगळसूत्र तसेच होते. ते पाहून सोसायटीतील महिलांच्या भुवया उंचावल्याच. राधाबाईंनी नेहेमीप्रमाणे गॅलरीतून ‘बाय’ केले. ती संध्याकाळी येईपर्यंत त्या एकट्याच. सोसायटीतील महिला विचारपूस करण्याकरिता हजेरी लावू लागल्या. काळ कोणासाठी थांबत नाही.
    “सबनीस साहेब, आमचा फ्लॅट माझ्या नावावर आहे तो मला माझ्या सासूबाईंच्या नावावर करायचा आहे.”
    “सांगतो तेवढी कागदपत्रं घेऊन या. आठवड्याभरात काम होईल.”

  • आठवड्यानंतर सोसायटीच्या फलकावर राधाबाई देशपांडे हे नाव दिसले तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटले.
    हल्ली सुजाता जरा गुमसुमच असायची. राधाबाई वारंवार विचारणा करीत. ‘काही नाही’ असे म्हणून ती वेळ मारून नेई.
    “सुजाता, तुला आता सुदेशला विसरायला हवं. माहिती आहे कठीण आहे ते. अग, मला सुद्धा येतोय ना अनुभव! तुला एकटेपणा आलाय ना? मैत्रिणींबरोबर बाहेर जात जा. नाहीतर माहेरी जातेस का? जागा बदलली की थोडाफार विसर पडेल. माझी नको काळजी करू.”
    “एकटेपणा तर आलेलाच आहे. शिवाय भोवतालचे लोक फार विचित्र वागतात.”
    “कल्पना आहे त्याची. आपणच त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे.”
    “हो…प…ण…”
    “अगं, अशी चाचरतेस कशाला? स्पष्ट बोल ना! घाबरू नको.”
    “आई, माझ्या मैत्रिणीचा भाऊ रमेश बर्वे लग्नाचा आहे. म्हणजे बिजवर असून बँकेत मॅनेजरच्या पदावर आहे. त्याची पहिली पत्नी गेल्या वर्षीच बाळंतपणात वारली. त्याचा स्वतःचा अंधेरीला फ्लॅट आहे. तुम्हाला असं तर वाटत नाही ना की मी खूप लवकर दुसर्‍या लग्नाचा विचार करतेय, किंवा तुमच्यापासून सुटका करून घेतेय.”
    “नाही गं पोरी, आपला आठ वर्षांचा सहवास आहे. मी आज ना उद्या तुला सुचवणारच होतो. तुझा निर्णय योग्य आहे. तरुण विधवा म्हणजे सगळे वासनासक्त कावळे टोचा मारायला टपलेलेच असतात. घरात मी आहे गं. अर्थात मी तरी किती पुरे पडणार? बाहेर काय? लग्न करून तुम्ही दोघं इथेच राहा ना!”
    “आई, इथे राहिले तर मला सारखी सुदेशची आठवण येणारच ना! शिवाय बर्वे अजुनही अपरिचित आहेत. त्यांना आणि तुम्हालाही अवघडल्यासारखं वाटेल. मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. शिवाय येऊन जाऊन राहीनच. दोघंही येऊ. तुमची परवानगी आहे ना?”
    “हो हो. आहे परवानगी. कधी करताय लग्न?”
    “अजून महिन्याभराने. रजिस्टर ऑफिसांतून तुम्हाला इकडे सोडून नंतर अंधेरीला जाऊ. त्या आधी बर्वे येतील तुम्हाला भेटायला.”
    बर्वेंचे येणेजाणे चालू झाले. हा नवीन तरुण कोण ह्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. सुजाताने सेक्रेटरीला लग्नाबाबत कळविले. तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. बघता बघता सुजाता गेली आणि समिधा वस्तीला आली. राधाबाईंच्या जीवनक्रमात काहीही बदल झाला नाही. पूर्वीसारखीच सांजफेरी. गॅलरीतून समिधाला टाटा करणे. सुजाता पतीसह दर रविवारी न चुकता खेप घालीत असे. त्यांच्यातील संबंध सलोख्याचे असावे असे अनुमान सोसायटीच्या रहिवाशांनी काढले. काही जणांना वाटे हा देखावा आहे. शंकानिरसन करण्यासाठी सुधाबाई राधाबाईंकडे आल्या.
    “सुधाताई, आमची सुजाता ना अगदी लाघवी पोर आहे हो. समिधाला आणून माझी सोय लावलीच आहे. शिवाय हा फ्लॅटसुद्धा माझ्या नावावर केलाय. तिच्या नावावर होता. सून म्हणून आली आणि लेक बनून राहिली.”
    “राधाबाई, अहो नंतर तो तिलाच मिळणार हे जाणून आहे ती. तोंड देखलं तुमच्या नावावर केला. पण इतक्या लवकर सुदेशला विसरली कशी? की आधीच त्या बर्वेबरोबर काही सूत जुळलं होतं?”
    “काहीतरीच काय बोलता सुधाबाई? स्वच्छ वागणुकीची मुलगी आहे ती. खरं तर मलाच दुसर्‍या लग्नाबद्दल विचारायचं होतं, पण ती दुखावली जाईल म्हणून नाही विषय काढला. आयुष्याची उमेदीची आठ वर्षं दोघांनी सुखाने संसार केलाय. जीवनाच्या प्रत्येक अंगात त्याची आठवण भरून राहिली असणार. जोडीदार अर्ध्यावर डाव सोडून गेल्यावर दुसर्‍याबरोबर डाव मांडणं कठीण आहे हो. अनायसे हा तिच्या मैत्रिणीचाच भाऊ पाहण्यात आला. उत्तमच झालं म्हणायचं. फ्लॅटचं म्हणाल तर तिने मनाचा मोठेपणाच दाखवलाय.”
    “पण मी म्हणते हे सगळं करायचंच कशासाठी?”

  • “असं कसं म्हणता? मी म्हातारी कसला आधार देणार? शिवाय समाज आहे ना? तरुण विधवा म्हणजे सगळ्यांचंच भक्ष्य. तिला संरक्षण नको? मीच तिला गळ्यातलं मंगळसूत्र काढू नको असा सल्ला दिला. एक प्रकारचं संरक्षण आहे ते.”
    “बाहेरच्या जगात वावरणार्‍या ह्या मुली तयार असतात. स्वतःच समर्थ असतात. तुम्हाला नक्की सगळं सांगितलंय ना?”
    “बारीक सारिक सगळं सांगते ती मला. काही आडपडदा नाहीये आमच्यात.”
    “पण आता तुमच्या चरितार्थाचं काय? हिचा पगार तिकडे जाणार.”
    “सुधाबाई, जरा देव्हार्‍यासमोर जाऊन पाहता का?”
    “अगंबाई, देव्हार्‍यात ही नोटांची चवड पूजेला लावलीय की काय?”
    “ते पैसे सुजाताने काल संध्याकाळी आणून दिले. सुदेशचं आणि तिचं सेव्हिंग होतं ना, त्याच्यावरचं व्याज ती आणून देते मला. शिवाय महिन्याचं सामान भरते. माझी महिन्याची औषधं आणून ठेवते. एका वर्षाचे सोसायटीचे पैसेसुद्धा भरून ठेवलेत.”
    “सुदेशचेच होते ना ते पैसे?”
    “तिचेसुद्धा होतेच की. मी तसा उल्लेख केला तर तिला भरून आलं. गुणी आहे पोर. सुधाबाई, सून म्हणून मन कलुषित करून घेऊ नये. आपण मनापासून केलेलं प्रेम सफल होऊन, ह्या ना त्या रुपाने आपल्यापर्यंत पोहोचतंच. त्याचाच अनुभव मी घेतेय. मुलगा गमावला हे माझं दुर्दैव; परंतु ती उणीव देवाने गुणी मुलगी आणि जावई देऊन भरून काढली. एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आपण तिच्या ठिकाणी असल्याची कल्पना केली पाहिजे. त्यातच मनाचा मोठेपणा आहे. आता अधिक महिना आहे ना, रमेशला वाण देईन म्हणते. लेकीला सुद्धा साडी घेईन म्हणते. उद्या जाऊ या का खरेदीला?”
    “अगदी आदर्श सासूबाई आहात हो, राधाबाई.”

Share this article