Close

अगं, अगं भिशी (Short Story: Agg, Agg Bhishi)

  • कल्पना कोठारे
    मला कळेचना, सार्‍या जणी कुठे गेल्या ते! नऊ जणींपैकी एकही बाई माझ्यासाठी थांबली नव्हती. मला तर रडूच आलं. रागाने घरीही परत जावंसं वाटलं, पण नवरा घरी आहे म्हणून ही घरी परत गेली, असं बायकांना वाटलं असतं. बायकाच त्या! आपुलकीने एकही बाई माझ्यासाठी थांबली नाही, त्यांना ‘मैत्रिणी’ तरी कसं म्हणणार?

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एकदा भर दुपारी बेल वाजली. हातातलं मासिक बाजूला ठेवून मी दार उघडलं. समोर घामाघूम झालेली माझी मैत्रीण कुसुम होती. तिच्या हाती कसलं तरी ओझं होतं.
“सॉरी हं! अवेळी… तेही न सांगता आले.”
“अगं, सॉरी कशाला? कित्ती दिवसांनी भेटतोय आपण! आणि हे ओझं कसलं गं?”
“अगं, तुझ्याकडे इथे वांद्रयाला यायचंच होतं ना… म्हणून मग मुलाच्या शाळेतही डबा घेऊन गेले होते. अनायासे लंचची सुट्टी होती. तेवढंच बिचार्‍याला एक दिवस गरमागरम जेवण मिळालं!”
“कित्ती ऊन आहे पण बाहेर! बस निवांत. पाणी देऊ…
की सरबत आणू?”
“काही नको गं! तू इथे अशी जवळ बस. खूप खूप बोलायचंय तुझ्याशी.”
“काय म्हणतेय तुमची सोसायटी?” कुसुम नुकतीच अंधेरीला नवीन जागेत राहायला गेली होती. त्यामुळे बरेच दिवसांत आमच्यात गप्पा झाल्या नव्हत्या.
“सोसायटीचाच एक किस्सा तुला सांगायला आलेय! बघा लेखिकाबाई, कदाचित त्यातून एखादी कथा गुंफू शकाल तुम्ही!” वरकरणी विनोदाने बोलणार्‍या कुसुमच्या डोळ्यांत पाणी तरळल्यासारखं वाटलं.
“का गं? एनिथिंग सिरीअस?”
“छे! छे! सिरीअस वगैरे काही नाही. पण दुखावणारं मात्र घडलंय. अगं, इतका लांब चेहरा करू नकोस.”
“मग सांग लवकर काय घडलं ते.”


“अलके, तुला माहीत आहे नं, आमची बारा जणींची भिशी आहे ते?”
“हो! तू मागे मला विचारलं होतंस ना… भिशीत येणार का म्हणून! पण नक्की काय असते गं ही भिशी म्हणजे?”
“घ्या! आमच्या कामवालीची पण भिशी आहे… तू एवढी लेखिका… अन् तुला भिशी माहीत नाही?”
“खरंच डिटेल्स माहीत नाहीत गं.”
“खरंच ना? की फिरकी घेतेस माझी?”
“नाही गं, खरंच माहीत नाही. सांग ना?”
“अगं भिशी म्हणजे एक प्रकारची बिनव्याजी बचत. ठरावीक रक्कम प्रत्येकीने दरमहा आणून एकत्र करायची. प्रत्येकीच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करायच्या आणि त्यातली एकच चिठ्ठी उचलायची. जिचं नाव त्या चिठ्ठीत असेल, तिला त्या महिन्याची जमलेली रक्कम एकदम मिळते. मग पुढील महिन्यात तिच्या घरी सर्व जणी जमतात. या वेळी तिनेही रक्कम द्यायची, पण तिच्या नावाची चिठ्ठी यापुढे ठेवायची नाही. जमलेल्या सर्व जणींचा तिने चहा-फराळ करायचा. या वेळी कोणीही आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये म्हणून एक गोड व एक तिखट पदार्थ आणि चहा इतकाच बेत ठेवायचा. यानिमित्ताने गप्पाही होतात आणि एकमेकांकडून वेगवेगळे पदार्थही शिकून घेता येतात.”
“अगं, तुमचे बँकेत काम करणारे नवरे या बिनव्याजी खेळाला परवानगी कशी देतात?”
“आम्ही रमी-बिमी खेळून पैसे तर वाया घालवत नाही ना? हा जुगार नाही. नुसतं गेटटुगेदर असतं आमचं दरमहा! एरवी सर्वांच्या फ्लॅट्सची दारं बंदच असतात. भेटीगाठी होतातच कुठे? पूर्वीसारखी हळदीकुंकवेही होत नाहीत
नं हल्ली!”
“अच्छा! कधी जमता तुम्ही सार्‍या जणी?”
“दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही जमतो. एकदम बाराशे रुपये हाती येतात, भिशी लागली तर!”
“मघाशी किस्सा कसला सांगते म्हणालीस?”
“अरे हो. काल काय झालं… आमची भिशी होती गिरगांवात!”
“अंधेरीहून थेट गिरगांवात?”
“अगं, त्या समोरच्या जीत आजी मूळ गिरगांवातच
राहतात ना. घरदुरुस्ती सुरू होती, म्हणून चार महिने आमच्या सोसायटीतल्या मुलीच्या घरी राहायला आल्या होत्या, तेव्हा आम्ही त्यांनाही भिशीत घेतलं होतं. आणि आता त्या परत गिरगांवातल्या आपल्या घरी राहायला गेल्या आहेत. मागच्या महिन्यात त्यांना भिशी लागली, म्हणून या महिन्यात त्यांच्याकडे चहापार्टी होती.”
“धन्य आहात बाई! अकरा जणी गेल्यात तरी कशा?
बसने की ट्रेनने?”


“दहा जणीच होतो आम्ही. एकीला जरा बरं वाटत
नव्हतं, म्हणून ती आली नव्हती. मीही जाणार नव्हते गं. अगं, सुधीरला थोडा ताप होता. घरीच होता तो. त्यामुळे मी म्हणाले, की नाही जात म्हणून. तर त्याचं जीत आजींवरचं प्रेम उफाळून आलं होतं. तुला माहीत आहे ना, जीत आजी नेहमी सुधीरसाठी कोळंबीचं लोणचं-बिणचं
असं काहीबाही पाठवायच्या.”
“हो! मीही एकदा चाखलं होतं तुझ्याकडे!”
“तर सुधीर म्हणाला, आजींना वाईट वाटेल तू नाही गेलीस तर!
मी नाही तरी आता
गोळी घेऊन झोपणारच आहे. म्हणून मग मीही
तयार झाले. दुपारी दोन वाजता सर्व जणींनी एक नंबर फ्लॅटमध्ये भेटायचं ठरवलं होतं. काय झालं, सुधीर नेहमी ऑफिसला जाता-जाता नाक्यावरच्या इस्त्रीवाल्याकडे कपडे द्यायचा. तो गेला नाही, म्हणून मी ते कपडे घेऊनच खाली उतरले. एक नंबरची बेल वाजवली, तर बक्षी नावाची एक बाई आली नव्हती. ती शेजारच्या मैत्रिणीकडे मुलाला झोपवायला गेली होती. ती येईपर्यंत इस्त्रीवाल्याकडे कपडे देऊन येते, असं सर्वांना सांगून मी खाली उतरले, तर नाक्यावरचा इस्त्रीवाला लंचटाइम म्हणून बंद! मग थोडं पुढे जाऊन दुसर्‍या लॉण्ड्रीत कपडे द्यायला गेले. परतून पाहते तर काय, सार्‍या जणी गायब!”
“काय सांगतेस? मग काय केलंस तू?”
“बक्षी जिच्याकडे मुलाला ठेवून जाणार होती, तिची बेल वाजवली तर तिने सांगितलं की, बक्षी कधीच गेली!
मग मी एकटीनेच चालत हमरस्ता गाठला. मला कळेचना, सार्‍या जणी कुठे गेल्या ते! कारण आमचं घर दोन बस स्टॉप्सच्या मध्ये येतं. मी दोन्ही बस स्टॉप्स पालथे घातले, पण त्या नऊ जणींपैकी एकही बाई माझ्यासाठी थांबली नव्हती. मला तर रडूच आलं. रागाने घरीही परत जावंसं वाटलं, पण जीत आजींचा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर आला. शिवाय नवरा घरी आहे म्हणून ही घरी परत गेली, असं बायकांना वाटलं असतं. बायकाच त्या! आपुलकीने एकही बाई माझ्यासाठी थांबली नाही, त्यांना ‘मैत्रिणी’ तरी कसं म्हणणार? अखेर मी एकटीनेच बसने गिरगांव गाठलं. भिशी पार्टी पार पडली. मी खेळाडूवृत्तीने पुढच्या भिशीला जाईनही, पण…”
कुसुम पोट तिडिकीने बोलत होती. मी तिला थंडगार सरबत देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मग थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा करून ती घरी परतली. पण त्या भिशीचा ओरखडा तिच्या मनाच्या पाटीवर कायमचाच राहिला, हे निश्‍चित!
त्या काळात पु.ल. देशपांडेंच्या मिस्कील ‘अति विशाल महिला मंडळ’मधील किश्शांमुळे मी कधीच कुठलं महिला मंडळ जवळ केलं नव्हतं. कुसुमच्या भिशीचा किस्सा ऐकून तर, कधी काळी मी भिशी सभासद होईन, हे स्वप्नवतही नव्हतं. परंतु म्हणतात ना… ‘कालाय तस्मै नमः।’ पुलाखाली बरंच पाणी वाहून गेल्यानंतरची ही गोष्ट आहे…
“अलके, तुझं नाव वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये येणार, बरं का!”
एक दिवस अनंता ऑफिसमधून येताच चेष्टेने म्हणाला. छोटू अन् ताई धावतच बाबांजवळ आले.
“मुलांनो, अनेक वर्षं मुंबईत काढूनही पुणे न पाहिलेली तुमची आई प्रथमच पुणे पाहणार आहे.” बाबांचा विनोद कळण्याइतपत मुलं मोठी झालेली होतीच! अचानक पुण्याला बदली झाल्यामुळे अनंताला जणू हर्षवायूच झाला होता. पुणे दाखवा, म्हणून गेली कित्येक वर्षं मी त्याच्या मागे लागले होते. अर्थात तो आधी जाणार होता.
माझी पुण्यातली पहिलीच सकाळ मला आजही आठवते… स्वच्छ हवेत प्राणायाम करीत मी बाल्कनीत उभी होते. केवढी मोठी बाल्कनी! मुंबईतल्या घराची एक खोलीच जणू!
“तो समोर टॉवर दिसतोय ना, ते रेड चर्च आहे… लाल देऊळ. खरं तर, ते चर्च नाहीच! ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ, सिनेगॉग आहे ते!” अनंता बोलत होता, “अलके, कसं वाटलं घर? एक-दोन आणखी जागा दाखवल्या होत्या, पण हीच पसंत पडली मला!”
“काय मस्त बाल्कनी आहे हो ही! यंदा आपण इथेच कोजागिरी साजरी करू!”
“कोजागिरी? बाईसाहेब, अजून गणपती यायलाही
कित्ती वेळ आहे… अन् तुला दूध आणि भजी आठवतेय का कोजागिरीची? पुण्याचा गणेशोत्सवही पाहण्यासारखा असतो हं!”
“पुरे रे कॉमेंट्री तुझी! नाश्त्याला काय करू, ते सांग.”
“काहीही चालेल, मात्र लंच ऑफिसमध्येच असतो हं!”
छोटू जेवूनच शाळेत जाऊ लागला होता. ताई सकाळचं कॉलेज आटपून परतली की आम्ही दोघी एकदम जेवायला
बसत असू. इथे मुंबईचं घाईगर्दीचं जीवन एकदमच संथ झाल्यासारखं वाटत होतं. जवळच सोमवार पेठेत एक
मराठी वाचनालय असल्याचं कळलं आणि मला जणू खजिनाच सापडला. हे वाचनालय सावकार नावाची एक वृद्ध महिला चालवत होती. अनामत रक्कम रुपये पाच आणि दरमहा पाच रुपयांची फी भरून मी सभासद झाले.
“पुण्यात काय काय पाहिलं? प्रथमच आलात नं पुण्यात?” अशा संभाषणांनी सावकार बाई माझ्याशी ओळख वाढवीत होत्या.
एकदा “अलकाताई, तुम्ही आमच्या भिशीत का येत नाही?” हा प्रश्‍न सावकारबाईंनी विचारला.
मी मात्र अंगावर पाल पडावी, तशी दचकले. कुसुमचा भरल्या डोळ्यांचा चेहरा डोळ्यांसमोर तरळून गेला. भिशी म्हणजे भांडण, हे समीकरण डोक्यात
फिट्ट बसलं होतं.
“किती रुपयांची भिशी असते तुमची?”
“अहो, फक्त दहा रुपयांची!”
“किती जणी आहेत?”
“तशा आम्ही दहा जणी आहोत, पण एकीचं नुकतंच लग्न ठरलंय. तेव्हा तुमच्यासारखं कुणी नवीन मिळालं, तर बरंच होईल आम्हाला! पैसे महत्त्वाचे नाहीत हो! ओळखी होतील. सगळ्या जणी सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत.”
“घरी विचारून सांगते.” असं सांगून मी तात्पुरती
सुटका करून घेतली. पण नंतर ‘अगं अगं म्हशी’
म्हणत घरी परतणार्‍या गुराख्याप्रमाणे, अखेर दरमहा भिशीला जाऊ लागलेच!
बघता बघता अडीच वर्षं
झाली आणि पुण्याचं वास्तव्य संपुष्टात येणार, याची चिन्ह दिसू लागली. “कधीही बदलीची ऑर्डर येईल.”
असं अनंताने सांगितल्यामुळे, मी त्या महिन्याच्या सुरुवातीस वाचनालयाची फी न भरता, डिपॉझिटचे पाच रुपये सावकारबाईंकडून परत मागितले. थोडीशी कुरबुर करत त्यांनी ते परत केलेही. भिशीला मात्र मी पुण्यात असेपर्यंत जाणारच होते.
एकदा मला भिशी लागली आणि माझ्या घरी चहापानाचा कार्यक्रम ठरला. भिशीवाल्या नऊ जणी आणि दोघींच्या तरुण
मुली, अशा अकरा जणींसाठी मी खानपानाची तयारी करून ठेवली. मुलीलाही कॉलेजमधून लवकर घरी येण्यास सांगितलं होतं. त्या दोन मुलींना ऑकवर्ड वाटू नये आणि सर्वांशी ताईचीही भेट व्हावी, हाच हेतू होता. हसतखेळत, गप्पा मारत खानपान उरकलं. मी चहा आणायला स्वयंपाक घरात जाणार, इतक्यात सावकारबाईंनी जणू बॉम्बच टाकला!
“अलकाताई, मागच्या वेळी तुम्ही भिशीचे दहा रुपये दिलेच नाहीत.”


“अहो, मलाच नं भिशी लागली? मी मोजून दहा नोटा घरी आणल्या!”
“तेव्हा नाही हो! त्या आधी… नाडकर्णीबाईंना भिशी लागली होती नं तेव्हा! त्यांना दहाची एक नोट कमी मिळाली.”
“कसं शक्य आहे? इथे मुंबईसारखी पर्स बाळगावीच लागत नाही. भिशीच्या दिवशी फक्त दहाच रुपये घेऊन
मी आले होते.” माझं स्पष्टीकरण ऐकून घेण्यास सावकारबाई तयारच नव्हत्या. जिला कमी पैसे मिळाले होते, त्या बाईसकट इतर सर्व जणी गप्प झाल्या होत्या. त्या दोन मुली तर बाल्कनीत जाऊन उभ्या राहिल्या. त्यांना कदाचित वाटलं असेल की, आता मोठ्ठं भांडण होणार! मलाही काही सुचेना. प्रत्येक घरखर्चाचं पाकीट करून, त्यात पैसे ठेवायची अनंताची पद्धत आहे. भिशीला मी दहाची नोट नेली नसती, तर त्याच्या ते लगेच लक्षात आलं असतं. “तुझ्या पर्समध्ये पैसे ठेवतोय गं” हे त्याचं आजचं बोलणं तर अजून माझ्या कानात आहे. दहा रुपयांचाच तर प्रश्‍न! ‘खिसा कापला गेला’ असं म्हणून परत देऊ या, असं स्वतःलाच बजावीत मी आतील कपाटातून दहाची नोट काढून त्या बाईंच्या हातावर ठेवली.
“मधे एक भिशी गेली, त्या दिवशीच तुम्ही
का बोलला नाहीत?” इतकंच मी उघड बोलू शकले आणि चहा करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळले.
झाल्या प्रकाराने माझे हात थरथरत होते. त्यामुळे चहाचं पूर्ण पातेलं हातून निसटलं. सुदैवाने ताई ठरल्याप्रमाणे कॉलेजमधून लवकर परतली होती. तिला लगेच दूध आणण्यासाठी पिटाळलं. चहापान आटोपलं आणि पाहुण्या आपापल्या घरी गेल्या. थोड्या फार फरकाने मला कुसुमसारखाच अनुभव आला होता. सावकारबाई माझ्यावर आरोप करत असताना इतर सर्व जणी ‘तुमचं तुम्ही पाहून घ्या’ या भावनेने गप्प होत्या.
‘अलकाताई असं करणं शक्यच नाही… तुम्ही त्याच वेळी पैसे नीट मोजून का घेतले नाहीत?… मधे एक भिशी गेल्यानंतर, अलकाताईंनीच पैसे दिले नाही, असं तुम्ही
कसं काय म्हणू शकता?…’ असे सर्व प्रश्‍न मनाला
गांजीत राहिले. एक जणही माझ्या बाजूने बोललं नाही.
प्रत्यक्षात काय झालं होतं तर… दहा-दहाची प्रत्येक नोट टेबलवर जमा न करता, सावकारबाईंच्या हाती देण्यात आली होती. जिच्या नावे चिठ्ठी निघाली, तिला सावकारबाईंनी शंभर रुपयातली एक नोट हळूच काढून नव्वदच रुपये दिले असणार. माझ्यावर नोट न दिल्याचा आळ घेऊन, बाईंनी जणू वाचनालयाचे पाच रुपये डिपॉझिट अधिक पाच रुपये वसूल करून मला भुर्दण्डच दिला होता. भिशीवाल्या बाईला पुन्हा दहा रुपये देऊन, मी तिचं नुकसान भरून काढलं होतं. मूळ चोरी नक्की हाती नोटा जमविणार्‍या सावकारबाईंची असणार! पण माझ्या साधेपणाचा पुरावा देण्यास कुणीच पुढे आलं नाही.
त्यामुळे कुसुमसारखाच माझ्या मनाच्या पाटीवरही कायमचा ओरखडा उठला होता.
रात्री अनंताला सारं काही सांगताना माझी बहुधा रडकुंडीस आलेली कुसुमच झाली असावी. मात्र त्याने पाठीवर हात न फिरवताही, केवळ एका वाक्यानेच मला शांतचित्त केलं… “अलके, आकाशाकडे बघायची हौस नडली तुला!
गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला होतास नं बाल्कनीतून? म्हणूनच चोरीचा आळ आला तुझ्यावर!”

Share this article