Close

अजब रसायन (Short Story: Ajab Rasayan)

  • ज्योती आठल्ये
    तिला आठवतंय. आज तीसहून अधिक वर्षे झाली या घरात येऊन. पण एकदाही कौतुकाने कपभर चहा दिला नव्हता सासूबाईंनी. मात्र गोड गोड बोलून आम्हा दोन्ही सुनांकडून काम करून घेण्यात एकदम हुशार. त्यात आजीबाईंना आजोबांची साथ. मग त्यांना बोलायला आम्हा दोघा सुनांची काय बिशाद.

शारदा, अग शाऽऽरदा, करून बेडरूममधून जेव्हा सासूबाईंनी मारलेली हाक ऐकू आली, तशी शारदाच्या कपाळावर किंचित आठी पडली. कारण, आताच तर त्यांच्या रूममध्ये जाऊन, त्यांना चहा पाजून, बिस्किटांचा चुरा भरवून आली होती. शिवाय जरा वेळ त्यांना बरे वाटावे म्हणून गप्पादेखील मारल्या होत्या. मग त्या कशाला बोलवितात. अजून बाकीची पण कामे उरकायची आहेत असं मनाशी पुटपुटत परत त्यांच्या खोलीत आणि संयमी आवाजात विचारले, ‘काय झालं? काही हवं
आहे का? की बरं नाही वाटत?
का शेकायला गरम पाण्याची पिशवी हवी आहे?’
‘काही नाही ग. पण रात्रीच्या जेवणात बदामाचा शिरा कर. नाहीतर विसरशील’, असं त्या म्हणाल्यावर ती म्हणाली, ‘मी आजपर्यंत कधी काही विसरलीय का? बरं येऊ मी?कारण अजून बरीच कामं व्हायची आहेत.’ अन् तिथून बाहेर पडली. खरं तर वरकरणी ती वैतागलेली होती तरी सासूबाईंबद्दल कणव, दया, प्रेम, वाटत होतं. कारण, आजपर्यंत त्या तिच्याशी कधीही वाईट वागल्या नव्हत्या. शिवाय वर्षभरापूर्वीच सासरे गेल्याने त्यांनी अंथरूण धरले होते. अन् ते मात्र शारदाला गैर वाटत नव्हते. जोडीदारातील एकजण गेला की, राहिलेल्याला नक्कीच एकटेपण जाणवते. कदाचित उद्या आपण पण या अनुभवातून जाऊ. तेव्हा सुनेने आरडाओरडा केला तर आपल्याला पण नक्कीच वाईट वाटेल ना! पण माणसाच्या स्वभावाची गंमत असते. तशीच शारदाच्या बाबतीत घडत होती. सासूबाईंबद्दलच्या जुन्या आठवणी मनात कुठेतरी ठुसठुसत होत्या. त्यामुळे आता त्यांनी कितीही कौतुक केलं तरी ते ‘उसनं’ आहे, असं तिला वाटत होतं आणि मग त्यांना काहीतरी खरमरीत बोलावं असं वाटे. पण आईने केलेले संस्कार- त्यामुळे पटकन काही बोलायला जीभ रेटत नव्हती. शब्द घशात अडकून पडत होते.
तिला आठवतंय. आज तीसहून अधिक वर्षे झाली या घरात येऊन. पण एकदाही कौतुकाने कपभर चहा दिला नव्हता सासूबाईंनी. मात्र गोड गोड बोलून आम्हा दोन्ही सुनांकडून काम करून घेण्यात एकदम हुशार. त्यात आजीबाईंना आजोबांची साथ. मग त्यांना बोलायला आम्हा दोघा सुनांची काय बिशाद. आणि मग तिचे तिलाच हसू आले. कारण, आजपर्यंत या विषयावर आपण किती विचार केला पण उत्तर काही मिळाले नव्हते. बरं मैत्रिणीसारखे तिला जमत नव्हते की एकीकडे अध्यात्माच्या गप्पा मारायच्या, गुरू करायचे, अन् घरात मात्र सासूला त्रास द्यायचा. अगदी मोजून मापूनच खायला द्यायचे- शेजारच्या नातू वहिनींसारखे. मैत्रिणी जमल्या की, फक्त सासू सासर्‍यांच्या कागाळ्या. अर्थात त्यात हिचा सहभाग नसे. ते बघून एकदा उषाने विचारले सुद्धा- ‘काय गं, तू काहीच कसं बोलत नाहीस.’
त्यावर ती हसून म्हणत असे, ‘अग, त्या खरंच चांगल्या आहेत. तर काय सांगणार.’ या सगळ्या विचारात असताना बेल वाजली. तशी तिने झटकन दार उघडले. तर समोर मुलगा, सून व नात उभे. ते बघून ती आश्‍चर्याने म्हणाली, ‘एकदम अकस्मात, काय रे मनीष सगळं
ठीक आहे नं?’
‘अग हो आई, वाटले तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यावे. त्यातून मुंबई पुणे किती वेळ लागणार?
हो की नाही?’
‘हो गं बाई’, म्हणत शारदा नयनाला म्हणाली, ‘बसा तुमची आवडती ब्लॅक कॉफी करते.’
अन् मग कॉफी घेता घेता गप्पा रंगल्या. नात ऋचा तर आजीला सोडायला तयारच नव्हती. एवढ्यात मनीषने विचारले, ‘आजीबाई काय म्हणतात? तुझा स्वयंपाक होईपर्यंत तिला भेटून येतो.’ मग आजीच्या खोलीत गेले व शारदा स्वयंपाकघरात गेली. नंतर जेव्हा आजीशी गप्पा मारून झाल्या, तेव्हा स्वयंपाकघरात येऊन आईला म्हणाला- ‘अगं आई, आजीला म्हणे माझी आठवण येत होती. नवलच आहे. कारण तिचे खरे प्रेम शेखरवरच आहे, हे सर्वश्रुत आहे.’
तेव्हा हसत शारदाने विचारले, ‘किती वर्ष तू आजीला ओळखतोस. उसनं प्रेम करण्यात तिला कोणी हरवेल का? तुम्ही लहान असताना प्रेम केलं असतं तर तुमचं सगळं तिला करायला लागलं असतं. पण जाऊ देत तो विषय. तुझं काम कसं चाललंय अन् ऋचाचे पाळणाघराचे गणित जमले ना की रडते ती अजून. मी आजी असून तिला पाळणाघरात ठेवावे लागते याचेच वाईट वाटते बघ. बरं आता तुम्ही मस्त जेवा बरं.’
‘ते तर जेवणारच आहोत. पण ऋचाला तुझ्याजवळ ठेऊन मी व नयना दोन दिवस मस्त भटकंती करणार आहोत.’ मनीष म्हणाला तशी शारदाने आनंदाने मान डोलावली.
अन् मग दुसर्‍याच दिवशी मनीष आणि नयना, ऋचा उठायच्या आत लवकर घराबाहेर पडलेसुद्धा. नंतर ऋचा उठल्यावर तिच्या मागे मागे करता तिला एकदम आठवले की, आज सासूबाईंचे सारेच करायचे राहून गेले. तरी यांनी निदान चहा बिस्किटे दिली म्हणून. मग त्यांच्या खोलीत जाऊन स्पजिंग वगैरे करून करून आली. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. समोर मनीष-नयना नाहीत ते बघून सुरेंद्र म्हणाले- ‘गेले वाटते उनाडक्या करायला. मजा आहे बुवा.’
आणि मग रात्री दमूनभागून आलेले ते पटकन झोपलेसुद्धा. मात्र दुसर्‍याच दिवशी नयना म्हणाली, ‘आई, तुम्ही फक्त स्वयंपाकाचं बघा. कारण आमच्या ग्रुपला मी जेवायला बोलावले आहे. मस्त चिकन बिर्याणी, सॅलड असा बेत करणार आहे.’
ते ऐकून शारदाच्या अंगावर काटा आला. मनात वैतागली. कारण एकतर नॉनव्हेज करणार, मग तो भांड्यांचा प्रचंड पसारा. ते निस्तरताना नंतर आपली किती धावपळ होते. गेल्या वेळचे अजून लक्षात आहे. परंतु, दोन दिवस आलेल्या सुनेला ‘नको’ कसे म्हणणार. तिला व मनीषला नाराज कसे करणार. म्हणून बळेबळे हसत म्हणाली. ‘कर हो.’
नंतर त्यांचा ग्रुप आला. रंगलेल्या गप्पात संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. ते गेल्यावर मात्र नयना म्हणाली, ‘रात्री काही मी जेवणार नाही. खोलीत जाऊन पडते.’ तिचीच री ओढत मनीष पण तेच म्हणाला.
तेव्हा शारदा मनाशीच म्हणाली,
‘ते असं म्हणू शकतात. पण माझी सुटका नाही. पिठलं भात तरी करायलाच लागेल.’ अन् मग भराभरा आवरून सासूबाईंसाठी जेवण घेऊन गेली. तशी फिस्कारून म्हणाल्या, ‘बरोबर, आज मुलगा- सून आलेत तर या म्हातारीची कशी आठवण येईल. माझा काही उपयोग नाही ना.’ ते ऐकून ती दुखावली. पण काय बोलणार? ‘शेवटी सगळ्यांची मने मीच सांभाळायची ना.’ माझा कोण विचार करणार. अन् मग मागची झाकपाक करून झोपायला आली. कधी एकदा अंथरूणाला पाय टेकतोय असं झालं. कारण, नाही म्हटले तरी लहान मुलांचे करण्याची सवय गेली होती ना. नंतर ज्या झंझावाताप्रमाणे आले त्याचप्रमाणे मनीष आणि नयना गेले. आता परत ती व सासूबाई. आता खोलीत ती आली की, ‘मला कधी पोचवणार पेणला गणपतीसाठी?’, हा प्रश्‍न करणार.गंमत म्हणजे बाकी सारे विसरायच्या सासूबाई, पण नवरात्र, गणपती मात्र बरोबर लक्षात असावयाचे. त्यामुळेच सुरेंद्र आईला पेणला सोडून आले. अर्थात ती पण बरोबर गेलीच होती. पण यावेळी नेहमीसारखे यांचे गप्पा मारण्यात लक्ष नव्हते. कसल्यातरी विचारात आहेत, हे तिने जाणले. म्हणून तिने विचारले. ‘कसला एवढा विचार करताय?’
‘काही नाही ग, पुढच्याच आठवड्यात एका महत्त्वाच्या मिटींगसाठी दोघं येणार आहेत. त्याची तयारी करायची आहे.’ हे ऐकून ती जरा रुसल्या आवाजात म्हणाली, ‘हे तर नेहमीचे आहे तुमचे. आता जरा दुसरं काहीतरी बोलू या ना.’
‘हो, बोलू या ना. पण तू काय बोलणार किंवा म्हणणार आहेस ते मला माहीत आहे- की तुमची आई असं का वागली? कधी आम्हाला तर हौसेने चहापाणी नाहीच दिलं,
पण अण्णा आजारपणात नेहमी म्हणायचे. ‘जरा जवळ बस ग, पेपर वाचून दाखव.’ तेव्हा किती खेकसायच्या त्यांच्या अंगावर, पण आता कसं वाटतंय की कुणीतरी आपल्या शेजारी बसावं, गप्पा माराव्यात. आपण त्यांना व अण्णांना विमानाचा प्रवास घडवून आणला,
खरं तर आपणसुद्धा अजून बसलो नाही. या उलट माझ्या आई नानांनी मुला-सुनांचे सगळे केले. तीच
मुलं-सुना त्यांना विचारत नाही, हे असं का?’ हे सारे त्याने तिच्या मनातलं ओळखलं. म्हणून ती म्हणाली, ‘अगदी मनकवडे आहात.’
‘ते ठीक आहे, पण किती वेळा सांगितले की, कर्मण्ये वाधिकारस्ते’
‘हो, ते मला पटतेय. पण शेवटी मी सुद्धा माणूसच आहे ना. माझ्याही काही अपेक्षा असतील ना. मी काही कुणी संत नाही.’
‘ते सगळं खरंय. परंतु वागताना तू सगळ्यांशी किती आपलेपणाने वागतेस, तर त्यांना काय कळणार तुझ्या मनातील खळबळ. आपणहून सगळ्यांना ख्यालीखुशालीचे फोन करतेस. अन् मग त्यांचे परतीचे फोन आले नाही की, हिरमुसली होतेस. म्हणून सांगतो, मनातले सगळे विचार काढून टाक. म्हणजे सुखी होशील. अगदी मुलांचादेखील विचार करायचा नाही. त्यातून हल्ली म्हणतेस की, मला काहीतरी समाजकार्य करावेसे वाटते. पण तिथे देखील तुला मनस्ताप होईल. वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटतील. अन्
मग मलाच विचारशील, हे असं का? त्यापेक्षा घरातच मन रमव. तुझी पेटी शिकायची राहिली आहे ती शिक.
परत भरतकाम, विणकाम चालू कर. पटतंय का?’
‘हो.’ अगदी मनापासून उत्साहाने शारदा म्हणाली.
‘अगबाई, आज सीमावन्संचा वाढदिवस आहे. त्यांना फोन करते घरी गेल्यावर.’ ते ऐकून सुरेंद्र म्हणाले, ‘शारदा, यू आर सिंपली ग्रेट. अग पाचच मिनिटांपूर्वी सगळ्यांवर चिडली होतीस ना. मला तुझ्यासारखे स्वीच ऑन-ऑफ जमणार नाही बुवा. माझ्या जानी दोस्ताशी- अशोकशी आता जुळवून घेता येणार नाही. भले तो कितीही प्रयत्न करो. उगाचच जाऊ दे म्हणण्याचा स्वभाव नाही माझा.’
इतके सगळे बोलणे चालू असताना घर कधी आले ते कळलेच नाही. तिने भर्रकन उतरून दार उघडले. तर आत मनीषचे पत्र पडलेले. हस्ताक्षरावरूनच तिने ओळखले होते. म्हणून तिने घाईघाईने वाचायला सुरुवात केली.


‘प्रिय सौ. आईस,
मनीषचा स.न.
तुझ्याबद्दल अभिमान, कौतुक वाटले. म्हणून हे पत्र पाठवीत आहे. खरं तर फोनवर देखील बोलता आले असते. पण कदाचित मन भरून आलं असतं व पुढचे बोलता आले नसते, म्हणून हे पत्र!
आजीचे करायला लागूनसुद्धा तू आमचे नेहमीच प्रेमाने करतेस आणि दमतेस. तेव्हा आजी आता पेणला गेली तर तुम्ही दोघंही आठवडाभर विश्रांतीला यावे, अशी आम्हा दोघांचीही इच्छा आहे. तू असेपर्यंत सगळ्या कामाला बाई ठेवणार आहोत. तेव्हा तू फक्त ऋचाशीच खेळायचे. हे बहुतेक तुम्हाला पटेल अशी आशा करणारा.

  • तुमचा मनीष.’
    ते वाचून तिचे डोळे पाणावले व सुरेंद्रना म्हणाली की, ‘वेडाच आहे मनीष. आपल्या मुलांचे करून आई कधी दमते का? कशाला हवी बाई?’
    हे ऐकून सुरेंद्रला काय बोलावे तेच सुचेना. तासाभरापूर्वीच ‘नयना किती पसारा करते’, असं म्हणणारी ही आता तिच्याकडे जाऊन परत पसारा उचलायला तयार. खरंच बायकांचं मन कळत नाही, असे भलेभले म्हणतात ते काही खोटे नाही. तेव्हा जास्त विचार करू नये, असं म्हणत ते सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहायच्या तयारीत असतानाच शारदा म्हणाली, ‘उद्याच हे पत्र शेजारणींना दाखवून सांगते. बघा माझा मनीष किती हळवा आहेस ते. सारख्या स्वतःच्या मुलांचे कौतुक सांगत असतात ना.’ म्हणत आत निघून गेली. तिच्याकडे पाहात सुरेंद्र वर परमेश्‍वराकडे बघून म्हणाले,
    ‘देवा मानलं तुला. बायका नावाचं काय अजब रसायन घडवलं आहे बाबा. भल्याभल्यांना विचारात पाडते.’ असं म्हणत ते शांतपणे टी.व्ही. पाहत बसले.

Share this article