Close

असा मी अशी मी (Short Story: Asa Me Ashi Me)

  • दीप्ती मित्तल

  • तिचे ते कुरळे केस, मॉडर्न लूक, शरीराला हेलकावे देत चालणारी सडसडीत अंगाची ती स्वाती कुठे?… अन् ही सरळ चालणारी, सरळ केसांची, अंगानं भरलेली, टिपिकल सलवार-सूट घातलेली मुलगी कुठे?… ही ती नसेलच. दोघांत फक्त एकच गोष्ट कॉमन होती… तिच्या परफ्युमचा सुगंध!

  • आज सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर, कॅन्टीनमध्ये चहा प्यायला गेलो तर अघटितच घडलं. एक तरुणी जवळून गेली… अरेच्चा, ही स्वाती तर नव्हे… माझ्या हृदयाची धडधड वाढली. माझी नजर तिच्याकडे वळली. हेअर स्टाईल तर वेगळीच दिसते. शरीरयष्टी पण जाडीच दिसतेय. मग ही स्वाती कशी असेल?
    तिचा चेहरा दिसला नव्हता, म्हणून मी मनाची समजूत घातली. तिचे ते कुरळे केस, मॉडर्न लूक, शरीराला हेलकावे देत चालणारी सडसडीत अंगाची ती स्वाती कुठे?… अन् ही सरळ चालणारी, सरळ केसांची, अंगानं भरलेली, टिपिकल सलवार-सूट घातलेली मुलगी कुठे?… छेः ही ती नसेलच. दोघांत फक्त एकच गोष्ट कॉमन होती… तिच्या परफ्युमचा सुगंध! चार वर्षांपूर्वी मी हा सुगंध भरपूर हुंगला होता. ही मुलगी जवळून जाताच आलेल्या नेमक्या त्याच सुगंधाने स्वातीच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती…
    मी जागेवर जाऊन बसलो, पण कामात लक्ष लागेना. स्वातीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तिच्या सहवासात घालविलेली चार वर्षं डोळ्यांसमोर दिसू लागली होती… कॉलेजात आम्ही दोघं एकत्र होतो. एकमेकांच्या प्रेमात होतो. आमचे विचार म्हणजे ध्रुवाची दोन टोकं होती, तरीही आमचे संबंध चार वर्षं टिकले नि मग आम्ही वेगळे झालो. तिच्यापासून वेगळा झालो, तेव्हा सुरुवातीला फार काही वाईट वाटलं नाही. उलट मोकळं मोकळं वाटलं मला. जणू न सुटणारी गाठ उकलली होती.
    काही दिवसांनी मात्र खूप वाईट वाटू लागलं. शरीराचा एखादा अवयव विलग झाल्यासारखं! इतकी वर्षं तिची सवय झाली
    होती ना!…
    न राहवून मी जागेवरून उठलो. माझी पावलं तिच्या दिशेनं निघाली. भिरभिरत्या नजरेनं ऑफिसचे कॅन्टीन, कॉरीडॉर… सर्वत्र तिला शोधू लागलो. पिवळा ड्रेस घातलेल्या त्या तरुणीला पाहून एकदाचं मनाचं समाधान करून घेऊ, म्हणजे मन शांत होईल. अखेर अकाऊंटस् डिपार्टमेंटमध्ये मला ती बसलेली दिसली. माझा संशय खरा ठरला होता. ती स्वातीच होती!… पण… तिच्यात एवढा फरक कसा काय पडला होता? माझ्या मनानं उचल खाल्ली. धावत तिच्याजवळ जावं नि चौकशी करावी, पोटभर गप्पा माराव्या, असं वाटलं. कोणे एके काळी तिची बडबड ऐकून माझे कान किटत होते. पण आज मात्र तिचा आवाज ऐकण्यासाठी हेच कान आतुर झाले होते. पण तिच्या आसपास सहकारी बसले होते. माझं असं अचानक पुढ्यात उभं ठाकणं, तिने सहजपणे स्वीकारलं नाही, तर… भलतीच ऑकवर्ड सिच्युएशन निर्माण होईल… या विचारानं मी भानावर आलो. अन् धीर धरायचं ठरवलं…
    त्या रात्री मला झोपच आली नाही. स्वातीच्या सहवासातील त्या क्षणांनी माझ्या मनात फेर धरला होता. प्रेम आणि ओढ यांनी निर्माण झालेले संबंध हळूहळू ताणले गेले… कुरबुरी सुरू झाल्या. तिच्या काही काही गोष्टी मला अजिबात आवडत नव्हत्या. माझ्या विचारसरणीप्रमाणे मी तिला बदलू पाहत होतो. तर माझ्या काही सवयी तिला चीड आणत होत्या. आठवणींच्या या आवर्तनांमध्ये बहुधा रात्रभर गुरफटत राहिलो. त्यातून कधी बाहेर पडलो नि कधी झोप लागली, ते कळलंच नाही.
    दुसर्‍या दिवशी कॅन्टीनमध्ये माझे डोळे तिला शोधू लागले. चहाच्या काउंटरवर मला ती दिसली. पण तिला तर चहा आवडत नव्हता! ती नेहमीच कॉफी प्यायची. मग तिच्यात हा बदल कसा झाला? ते राहू देत… आता आपण तिला ओळख दिलीच पाहिजे. मी तिच्याकडे निघालो.
    “हॅलो स्वाती…” मी हाक मारताच तिनं झटक्याने मान वळवून माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावरचे भाव पालटले. तिनं ओळखलं होतं. ओळखीचं हास्य तिच्या ओठांवर दिसेल, अशी माझी अपेक्षा होती. पण झालं भलतंच. तिनं तिरस्कारानं माझ्याकडे रोखून पाहिलं. आपला जुना प्रियकर प्रेमपत्र घेऊन ब्लॅकमेल करत असल्याच्या आविर्भावात ती पाहत होती. ती अस्वस्थ झाली होती.
    “जतीन, तू इथे…” हे शब्द तिच्या तोंडून अडखळत बाहेर पडले. अन् तिचा चेहरा पडला.
    “हं. मीच. अगं, मी तर इथे पाच वर्षांपासून नोकरी करतोय. कालच मी तुला पाहिलं. अन् खूप बरं वाटलं.” तिचा अस्वस्थपणा पाहून मीही औपचारिकच बोललो.
    “आय सी! मी आत्ताच जॉईन झालेय इथे. चल,
    मी निघते. उशीर होईल…” असं बोलून ती अशी गर्रकन वळली की, मी तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर नसून कुणी भूतच होतो. दोन मिनिटे माझ्याशी बोलण्याचीही माझी लायकी नव्हती का? हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी पुन्हा तिला गाठण्यासाठी तिच्या डिपार्टमेंटच्या आसपास घिरट्या घालू लागलो. कधीतरी समोर येईलच या आशेवर मी होतो.
    अन् मला यश लाभलंच. तिची वाट अडवत मी म्हटलं, “स्वाती, तू मला का टाळते आहेस? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे…”

  • “आता काय फायदा जतीन?” ती थांबायलाच तयार नव्हती.
    “अगं, फायदा-तोट्याची गणितं न मांडता, आपण जुने परिचित म्हणून एकमेकांशी बोलू शकत नाही का?”
    “हे बघ, आता माझं लग्न झालंय. अन् तुझ्याशी काही बोलण्यात मला…”
    “लग्न तर माझं पण झालंय गं. अ‍ॅण्ड फॉर युवर काइंण्ड इन्फरमेशन, मला तीन वर्षांचा मुलगाही आहे.”
    माझं लग्न झालंय म्हटल्यावर बहुधा तिची काळजी दूर झाली असावी. एखादा मोठा धोका टळल्यागत भाव तिच्या चेहर्‍यावर उमटले. तिनं दीर्घ श्‍वास घेतला.
    “आता सांग, काय बोलायचं आहे?” तिने कोरडेपणानं विचारलं.
    “असं उभ्या-उभ्याच बोलायचं? चल, कॅन्टीनमध्ये बसूया.” हो-नाही करत ती आली.
    “काय घेणार?”
    “चहा.” एकच शब्द बोलून तिची नजर सर्वत्र फिरू लागली. नजरेला नजर देण्याचं ती बहुधा टाळत होती.
    तिचा परकेपणा पाहून मी अतिशय सावधपणे बोलायला सुरुवात केली.
    “त्या दिवशी कॅन्टीनमध्ये पाहताच मला वाटू लागलं की, आपली बोलाचाली व्हायला हवी. नाही म्हटलं तरी, काही वर्षं आपण चांगले मित्र…”
    ती माझ्याकडे रोखून बघू लागली. मित्र हा शब्द तिला कदाचित खटकला असावा. म्हणून मी क्षणभर थांबून म्हटलं, “काही नाही गं, असंच तुझ्याबाबत जाणून घ्यावसं वाटलं. कशी आहेस? हल्ली तुझं काय चाललंय? आपल्या ब्रेकअपनंतर…” तिनं माझ्याकडे पुन्हा रोखून पाहिलं. म्हणून मी थांबलो. आता माझ्या लक्षात आलं की, तिला भूतकाळातील एक क्षणही आठवायला नको होता.
    तेवढ्यात चहा आला. तिनं कपाला हात घालताच मला आठवलं की, तिला तर चहा अजिबात आवडत नव्हता. अन् मला खूप आवडायचा. मला ही गोष्ट रुचत नव्हती. म्हणून तिनं माझ्याबरोबर चहा प्यावा, असा मी आग्रह धरत असे. एकदा तर मी टोकाची भूमिका घेऊन म्हटलं की, तुझं माझ्यावर प्रेम असेल, तर तुला चहा घेतलाच पाहिजे. पण तिनं मनावर घेतलं नाही. “हे बघ, तुझ्या आवडीची मला सक्ती करू नकोस. नको म्हटलं ना, तर नाहीच पिणार…” असं म्हणून ती निघून गेली होती…
    “काय गं, चहा प्यायला सुरुवात कधी केलीस?”
    “लग्नानंतर. सोमेश, म्हणजे माझ्या नवर्‍याला चहा खूप आवडतो. त्यांच्या सहवासात मलाही सवय लागली.”
    आता तिच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिचं स्मित पाहून मी ताडलं की, ती थोडीफार तणावमुक्त झाली आहे. त्यानंतर कंपनी, करिअरपासून ते शहर, शहरातील रस्ते, त्यावरील ट्रॅफिक अशा अनेक फॉर्मल गोष्टींवर
    आम्ही बोललो. आता ती नॉर्मल होऊन बोलत असल्याचा मला आनंद झाला होता.
    “तुझी बायको तर हाऊसवाईफच असेल नं?” तिने विचारलं
    एक थंड सुस्कारा सोडून मी उत्तरलो, “नाही. शी इज वर्किंग.”
    “ओह!” खटकल्यासारखं ती बोलली. पण लगेच स्वतःला सावरून घेत म्हणाली, “आय मीन, इटस् गुड.”
    मग नजर खाली झुकवून ती चहाच्या रिकाम्या कपात चमचा फिरवत राहिली. तिला काय वाटत असणार, याचा अंदाज मला आला. कारण या विषयावर पूर्वी आमचे केवढे वाद झाले होते. लग्नानंतर स्वातीने हाऊसवाईफ म्हणून घर सांभाळावं, या मताचा मी होतो. मुलींनी नोकरी करणं मला अजिबात पसंत नव्हतं. यामुळे घर, घरातली माणसं आणि विशेष करून मुलांकडे दुर्लक्ष होतं, हे माझं ठाम मत होतं. आमच्या घरात वहिनीनं करिअरपायी माझा भाऊ आणि घराची जी दुर्दशा केली होती, तिच्यामुळे माझ्या मनास हे खटकत होतं. स्वाती अतिशय महत्त्वाकांक्षी होती.
    अन् असं काही बोललं की, ती माझ्या अंगावर धावूनच यायची. माझं प्रेम स्वातीमध्ये बदल घडवून आणेल, किंवा मी अट घातली तर ती शरणागती पत्करेल, असं मला तेव्हा वाटत होतं. पण ती खमकी निघाली. ती बदलली नाही… का शरणही आली नाही.
    “तुझी बायको काय करते?” तिने प्रश्‍न केला. विचारायला नको, तोच प्रश्‍न तिनं मला विचारला होता. यामध्ये ती मला कोंडीत पकडणार होती. “ती एअरहोस्टेस आहे.”
    तिने माझ्याकडे विजयी नजरेनं पाहिलं. तिच्या चेहर्‍यावर हास्य आलं होतं. जी माझी हार होती.
    “अरे व्वा… मग तर घराबाहेर राहावं लागत असेल नं?”
    “हो… कधी कधी.”
    “मग मुलाला कोण सांभाळतं? तू?…” तिच्या स्वरात उपहास आला होता.
    “काय आहे की, तिचे आईबाबा आमच्याकडेच राहतात. माझ्या टायमिंगचा काही भरवसा नसतो. म्हणून मुलगा आजी-आजोबांकडे राहतो.”
    “गुड!” तिच्या चेहर्‍यावरील कुत्सित भाव आणि विजय मला स्पष्ट दिसत होता. तिचे डोळे जणू बोलत होते की, बघितलंस? तुला बदलावं लागलंच की नाही. तुझं सगळं चुकलंच आहे.
    “आणखी काही मागवू? स्नॅक्स की अजून एक कप चहा घेऊयात?” मी विषय बदलत तिच्या प्रश्‍नांच्या फैरींची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. पण तिनं निशाणा बरोबर साधत आणखी एक बार ओढलाच, “काय रे, मग तुझी बायको मिनीजही घालत असेल, नाही का? एअर होस्टेसचा जॉब खूपच ग्लॅमरस असतो. खूप स्टायलिश राहावं लागतं, नाही का?” उपहासात्मक हसत ती मला चिडवत होती.
    आम्ही दोघेही स्तब्ध झालो. मी माझ्यात हरवून गेलो. पूर्वीचा जतीन आता बराच बदलला होता. पण हा बदल इतका धिम्या गतीनं झाला होता की, कळलाच नाही. माझ्या स्वातीकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. तिनं मिनीज, स्लिव्हलेस घालणं मला अजिबात पसंत नव्हतं. ती सुरुवातीपासून तशीच पुढारलेली होती. महत्त्वाकांक्षी, ग्लॅमरस कपडे घालण्याचा हव्यास असलेली, उच्छृंखल.
    तिचं हेच रूप मला भावलं होतं. तरी पण पुढे जाऊन मला असं वाटायला लागलं की, माझी मैत्रीण या नात्याने, तिने कसं वागलं पाहिजे, हे मी ठरवणार. अन् ते ऐकणं तिचं कर्तव्यच आहे. हे असं का घडतं, तेच कळत नाही. आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो नि मग त्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवू पाहतो. म्हणजे त्याने आपले विचार, बुद्धी, व्यक्तिमत्त्व वेगळं ठेवून आपण देऊ त्या कमांडप्रमाणे वागलं पाहिजे. जो याप्रमाणे वागतो, तो खरा प्रेमिक, असं आपण समजतो नि जो वागत नाही, त्याला आपण प्रतारणा असं समजतो.
    “कसला विचार करतोयस?” तिने विचारलं. आता ती माझ्या विचार विश्‍वात प्रवेश करू पाहत होती.
    “हाच की, तूही किती बदलली आहेस. म्हणजे, चहा पिऊ लागली आहेस. मिनीज सोडून साडी नेसू लागली आहेस. पण साडीत मात्र छान दिसतेस हं.”

  • “काय आहे ना, सासू-सासरे आमच्याकडेच राहतात नं, म्हणून टिपिकल सुनेसारखं राहावं लागतं रे.” तिने घाईत उत्तर दिलं.
    “पण टिपिकल सुनेसारखं राहायचं तुला अडचणीचं नाही वाटत का?” आता प्रश्‍नांची सरबत्ती करण्याची माझी पाळी होती.
    “अजिबात नाही. कारण माझे सासू-सासरे खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यांनी कधी हे कर… हे करू नको, अशा
    अटी मला घातल्या नाहीत.
    पण त्यांना या रूपातलीच आपली सून आवडते, हे मला ठाऊक आहे…” असं बोलून आपली चोरी पकडली गेलीय की काय, अशा समजुतीने ती थोडी बावरली. मी बदललोय, पण तिलाही स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून बदलावं लागलं, याच्याने मी सुखावलो.
    “अगं, पण पार्टीज अटेन्ड करणं, डिस्कोजमध्ये जाणं… हा तर तुझा शौक होता. आता सासरी राहून हे सगळं कसं काय जमतं तुला?” तिच्या राहणीमानाविषयी आणखी काही जाणून घेण्याची जिज्ञासा मनात होती. कारण आमच्या मतभेदांचं तेही एक कारण होतं.
    “कसलं काय? सोमेशला मुळात हे आवडत नाही.”
    मग सारवासारव करत म्हणाली, “दिवसभर काम करून ते थकून-भागून घरी येतात आणि मीही थकलेली असते. तेव्हा आऊटिंगला जाण्याची एनर्जीच नसते बघ. घरातली आणि बाहेरची उरलेली कामं करण्यात विकएंड असाच निघून जातो. एक मात्र आम्ही करतो, फुरसतीच्या
    वेळात एकत्र खाणंपिणं करतो नि टी.व्ही. पाहतो.”
    “बस्स…?” स्वातीच्या नजरेत नजर मिळवत मी विचारलं.
    “हो! आता आणखी काय?” तिच्या तोंडून एवढेच उद्गार निघू शकले. डोळ्यांत मात्र समाधान होतं, लाचारी नव्हती.
    “तू खूपच बदलली आहेस गं!” मी हसत हसत बोललो. “आपण आधीच बदललो असतो तर…” नकळत माझ्या ओठी आलं.
    “बळजबरीने माणसाची प्रवृत्ती बदलत नाही जतीन. आपल्यासारखी माणसं मोडून पडतील, पण वाकणार
    नाहीत. शिवाय बदलण्याच्या प्रक्रियेचेही एक चक्र असतं. ते चक्र पूर्ण फिरल्याशिवाय बदलण्याची प्रक्रिया संभवत नाही. एकमेकांच्या अनुभवाने तावून सुलाखून निघाल्यावरच आपण दुसर्‍यांच्या सुखासाठी स्वतःला बदलायला शिकलो आहोत…” काही क्षण स्तब्धतेत गेले… “बराच वेळ झाला. आता निघूयात.” स्वाती उठून बोलली.
    “तुझ्याशी बोलून बरं वाटलं.”
    “मला पण.”
    हसतमुखाने तिने निरोप घेतला. जाईपर्यंत मी स्वातीला पाहत राहिलो. आपल्या माजी प्रेयसीशी झालेल्या या
    शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट भेटीत रोमँटिक असं काहीच नव्हतं.
    तरीही असं काही घडलं होतं, ज्याने मनात एक विलक्षण माधुरी भरून राहिली.

Share this article