Close

बदली… (Short Story: Badali)

  • संपदा पाटगांवकर

    किती आर्ज दिले, माजी बदली करा, म्हून, पन आपल्या डिपारमेंटला बगत्योयस नं, सगळे पैशैच मागत्यात, तीन येळा माझं बदलीचं कागद रीटन आल्ये, पैशाचं वजन नाय ठीवू शकत ना आपुन,” दत्तानं जोडीदाराकडे मन मोकळं केलं.

    ”काय रं दत्त्या, गावाकडं जाऊन आलास मदीच?” अशोक साळवीनं, आपला जोडीदार दत्ताराम पालवला ड्युटीवर आल्या आल्या विचारलं.
    ”काय सांगू अशोक्या तुला, आरं माघारणीला जोराचा अटॅक आला हुता दम्याचा.”
    ”आरं द्येवा, पनोतीच हाय तुज्या मागं ”
    ”लयी प्रॉब्लेम हाईत, पोरगं बारावीला हाय, भारी टूशनबी लावलीय, पन जातच नाय तितं, लेक बी मोठी झालीया, किती आर्ज दिले, माजी बदली करा, म्हून, पन आपल्या डिपारमेंटला बगत्योयस नं, सगळे पैशैच मागत्यात, तीन येळा माझं बदलीचं कागद रीटन आल्ये, पैशाचं वजन नाय ठीवू शकत ना आपुन,” दत्तानं जोडीदाराकडे मन मोकळं केलं.
    ”हो ना! गरीबाचा कुणी वालीच नाय उरला आता जगात,” दत्ताचं शांतवन करत अशोक म्हणाला.
    ”माझं टाळकं इतकं सटकतं ना एकेकदा, आपुन नेकीनं काम करतो म्हणून आपल्या पदरात आसं आणि भ्रष्टाचार करणार्‍या…………..”
    ”चल जाऊंदे दोस्ता, हाजरी लावू, ड्यूटी सुरू झाली का सगळं दुख विसराया हुईल बग…..”
    युनिफॉर्म घालून दत्ता चौकात आला. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ड्युटीवर हजर राहून दत्तारामला चौकातली वाहतूक सांभाळायची होती.
    ”ड्यूटी सुरू झाली की दु:ख विसरायला होतं,” हे अशोक्याचं म्हणणं खरंच हाय!
    आजूबाजूला गाड्या सुसाट धावत होत्या. सिग्नल यंत्रणाही व्यवस्थित होती.
    दुपार झाली. दत्तारामचं अंग घामाने थबथबून गेलं.
    ”आता जेवून घेऊ पटदिशी,” असा विचार त्याच्या मनात आला.
    एवढ्यात… फू…फू… करत जिवाच्या आकांताने शिट्टी वाजवत दत्ता धावला. भरधाव वेगाने येणारी ती लाल दिव्याची गाडी सरळ ”प्रवेश निषिध्द”चा फलक धुडकावून गल्लीत शिरताना त्याला दिसली. गाडीला हात दाखवून थांबवण्याच्या प्रयत्नात
    दत्ता त्या गाडीखालीच आला असता आणि गाडी निघूनही गेली असती, पण ती दत्ताजवळ येऊन थांबली. खिडकीची
    काळीकुट्ट काच खाली झाली. थंडगार हवेचा झोत दत्ताच्या कपाळाला स्पर्श करून गेला.
    ”ओ साएब, नोन्ट्रीत गाडी घुसवलीत? बोर्ड नाय का वाचता येत? दन्ड भरा,” पावती पुस्तक काढत दत्ता म्हणाला.
    ”कुनाची पावती फाडायलास रं शिपुर्ड्या? ओळखलं नाय? आनंदराव पाटील म्हंत्यात मला, आरं या राज्याचा मंत्री हाय मी, दीडदमडीच्या तुझी ही हिम्मत?”
    ”ओ साएब, नो यन्ट्रीत गाडी तुमीच घुसवलीत, तुमीच कायदं करायाचं, नी तुमीच त्ये मोडायाचं, ह्ये बरं वाटतं का?” दत्ताराम समजावणीच्या सुरात म्हणाला, ”आन एवडासा दन्ड आपल्या सारक्यानला भारी हाय व्हय?”
    ”आरं तिच्या लई चुरुचुरु चालत्येय तुजी जीभ, एक आशी ठीवून दिनं ना.”
    खाटकन आवाज आला आणि दोन ठिकाणी काजवे चमकले.

    एक दत्तारामच्या डोळ्यांसमोर आणि दुसरा तिकडून जाणार्‍या वृत्तवाहिनीच्या व्हिडिओ एडिटरच्या कॅमेर्‍याचा.
    ”काय झालं काय हवालदार?” ममताळू स्वरात ती वृत्तवाहिनीची ’आँखो देखा हाल’ दाखवणारी पत्रकार मुलगी म्हणाली.
    एव्हाना दत्तारामच्या डोळ्यात आसू जमा झाले होते, तर पत्रकार मुलीच्या मनात हासू, कारण तिला जबरदस्त ब्रेकींग न्यूज मिळाली होती. गाडी केव्हाच पुढे निघून गेली.
    ”मंत्रिमहोदयांनी उगारला वाहतूक पोलिस हवालदारावर हात”
    ”वाहतूक पोलिस हवालदारावर उगारला मंत्रिमहोदयांनी हात”
    ”पहा, आत्ताच आलेली ताजी बातमी, एक्सक्लुजिवली आमच्याच चॅनेलात.”
    ”काय चाललंय आपल्या राज्यात?…..”
    ”पहा, फक्त आणि फक्त”
    ”काड…काड… काड…”
    लगेचच थोड्या वेळात, जिथे तिथे या बातमीचा कल्लोळ माजला. बिचार्‍या दत्तारामला ड्युटी संपेपर्यंत दु:खाचे कढ येत राहिले होते.
    ”नेकीनं काम करणार्‍यांवरच संकट येतात का?” त्याला वाटलं.
    कशीबशी उरलेली ड्युटी संपवून, खचलेल्या मनानं दत्ताराम चौकीवर आला.
    ”कुठे होतास इतका वेळ? गाजवलयसं नाव सार्‍या दुनियेत,”
    चौकीत आल्या आल्या साहेब ओरडले, ”अरे, त्या मिनिस्टरला अडवलंस तू? बघ …बघ…त्या ’जनतेला जवाब द्या’ कार्यक्रमात राजीनामा मागितलाय त्यांचा, विरोधी पक्ष नेत्यानं, बरंच मारलं का रे तुला त्यांनी?”
    ”माराच नाय एवडं, पन चुकी त्यांचीच होती, मी नेकीनं कायद्याचं पालन करा, सांगीत होतो.”
    ”लेका, भलतंच वाढलंय प्रकरण, मगाशी डीजीपी साहेबांचा फोन आला होता, कोण आहे तो हवालदार विचारत
    होते, प्रकरण मिटवलंच पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांची तंबी मिळाली आहे त्यांना…..”
    ”अरे बापरे! मग काय सस्पेंड करतील मला?” दत्तारामची भीतीने गाळण उडाली.
    ”अरे, नाही रे! आपल्या डिपार्टमेंटला कोण माणसं कशी आहेत, ठाऊक नाही का मला? मी सांगितलं, असा कुणी हवालदार नाहीच इथं, एक अशा नावाचा होता, पण तो दुसर्‍या भागात ट्रान्सफर झाला, गेल्याच आठवड्यात, अरे,बदली हवी होती ना तुला? एका मिनिटांत तुझ्या बदलीची आँर्डर हेड आँफिसातून पाठवायला सांगितली, गेल्या आठवड्याची तारीख टाकून, ही घे…”
    ”काय सांगता काय साहेब?…..”
    साहेबांनी दत्ताला प्रेमाने थोपटलं.
    बदलीसाठी केलेले दत्तारामचे प्रयत्न, असे फळाला आले खरे, पण…चौकीतून बाहेर पडताना, त्याचं ह्रदय मात्र रडत होतं.

Share this article