Close

भरती ओहोटी (Short Story: Bharti Ohoti)

  • राजश्री बर्वे

”काय ग सुगंधा, हा पिवळा गुलाब असा उजाड का दिसतोय गं हल्ली? फुलंही क्वचित येतात. खतही घालतेय मी नेमानं त्याला. रोपट्यावर नजर फिरवताना मेधा म्हणाली.
”काय की बाई? रोज तर पाणी घालतोय न्हवं सर्व्या रोपट्यांना? ”
”ह्या सुगंधाचं हे नेहमीचंच. सर्व आपल्या अंगावरून झटकून टाकायचं. आपण कुठं म्हटलं होतं तू पाणी घालत नाहीस म्हणून. ” मेधा थोडी वैतागलीच. ह्या वैतागात अजून भर घातली तात्यांनी. मध्ये नाक खुपसून म्हणाले,
” मेधा, ह्या रोपट्याचा स्टॅमिना संपला आता. आज अजून एक रोपटं घेऊन येतो. आणि त्या शेजारच्या रिकाम्या कुंडीत लावून टाकतो. मध्ये वाचलं होतं कुठेतरी. झाडांनाही भावना असतात म्हणे. बाजूच्या रोपट्याचं फुलणं बघून हे गुलाबही बहरेल बघ. अगदी खूप फुलं नाही आली तरी चालतील पण रोपटं कसं हिरव्या पानांनी बहरलेलं तरी दिसायला हवं नाही?”
तात्यांनी प्रश्‍नच विचारला म्हणून मेधाला होकारार्थी उत्तर द्यावं लागलं. पण तात्यांच्या ह्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही बोलण्याच्या स्वभावाचा तिला अलीकडे राग येऊ लागला होता.
राग…! हल्ली कसला आणि कोणाचा राग येत नव्हता तिला? सुगंधाने कामं पुढं ढकलली आला राग, उदयला यायला उशीर झाला आला राग, संज्योतनं सारखं आरशात पाहिलं आला राग, तात्यांनी अगदी साधं मत जरी व्यक्त केलं तरी आला राग. काय झालंय काय आपल्याला? मेधा स्वतःलाच विचारत होती.
घाईघाईत तिनं नऊ बारा गाठली. खरं तर थंडीचेच दिवस. काही बायकांच्या अंगावर स्वेटरही होते. मेधानंही शाल पांघरलेली. पण एकदम काय झालं नि तिच्या अंगातून गरम वारे वाहू लागले. तळहात तापले. तिच्याही नकळत तिनं शाल अंगावरून दूर केली आणि पंखा लावला. बस्स! लगेच दोनतीन बायकांनी पंखा लावला म्हणून आरडाओरडा सुरू केला. मेधाच्या डोळ्यात लगेच पाणी जमून आलं. पटकन पंखा बंद करून तिला हाताला धरून उठवत प्रीतम म्हणाली. चल मेधा. दरवाजात उभं राहू. छान वारा लागेल तिथे
ट्रेनच्या दरवाजात गेल्यावर प्रीतम तिला समजावू लागली, ”काय झालंय काय तुला मेधा हल्ली? एवढी करारी बाई तू नि अशी रडतेस काय वरचेवर? परवा बॉसने डिक्टेशनला रीटाला बोलावलं तर तुझ्या डोळ्यात पाणी. अशा रडक्या मेधाला पाहायची आम्हाला सवय नाहीये मुळीच.”
”खरंय तुझं. हल्ली काय बिनसलंय काही समजत नाहीये. काही झालं की वाईट तरी वाटतंय नाहीतर चिडचिड तरी होतेय.”
”घरी पण अशीच वागतेयस का?” प्रीतमने मुद्दामच विषय काढला. मध्ये उदय भेटला तेव्हा म्हणाला होता जरा तुझ्या मैत्रिणीला समजाव म्हणून.
मेधा मग प्रीतमकडे मन मोकळं करत राहिली. दोघी बोलत बोलत ऑफिसात शिरल्या. मेधा घाईघाईने फ्रेश होण्याकरता वॉशरुममध्ये शिरली. आत रीटा होतीच.
”रीटा, प्लीज मी आधी जाऊ का आत? अकरा वाजता कॉन्फरन्स चालू होईल. मिनिट्स लिहायला जायचंय मला. ”
”ओह! सॉरी हं मेधा मॅडम. तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही जागेवर नव्हतात ना म्हणून बॉसनी कॉन्फरन्सची मिनिट्स लिहायला मलाच सांगितलंय.”
मेधा काहीच बोलली नाही पण मनोमन दुखावली. पूर्वी तर महत्त्वाच्या मिटिंग्सना, कॉन्फरन्सना बॉस आपल्यालाच बोलवायचे. हल्लीच या रीटाचं प्रस्थ वाढलंय.
मग दिवस असाच भकास गेला. सर्वच मॅनेजर कॉन्फरन्समध्ये होते. त्यामुळे डिक्टेशनचं काम नव्हतंच दिवसभर. मग तिने उगाच कुठलीतरी रिमाईंडर लेटर्स टाइप केली. आणि इथली तिथली मिसलेनियस कामं उरकली.
रोजप्रमाणे आजचाही दिवस कंटाळवाणा… उदास… तिला माहीत होतं उद्याचाही तसाच जाणार नि परवाचाही. कारण आजकाल तिला आयुष्यात काही मजा वाटत नव्हती. रस वाटत नव्हता. असलीच तर किरकिर होती, तक्रारी होत्या, रुसवे होते.
ह्या दोन दिवसांत तिच्या लक्षात आलं होतं. दोन अडीच महिने झाले पाळीच आली नव्हती. प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचीही तिला गरज वाटत नव्हती कारण तसं काही नसल्याची तिला खात्री होती. दीड महिना तर उदय कॅनडालाच होता आणि त्याआधी त्याच्या तिथल्या कॉन्फरन्सची तयारी. ती कॉन्फरन्स त्याच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. म्हणून त्याला रोज रात्री उशीरही होत होता.
उदयशी जवळीक कधी झाली होती हेही तिला आठवत नव्हतं. प्रीतमने तिला जबरदस्तीने डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्यायला लावली होती. दहा दिवसांनंतरची अपॉईंटमेंट मिळाली. डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतरच उदयशी त्याबद्दल बोलू. उगाच त्यालाही टेन्शन नको मग. तिनं ठरवलं.


अपॉईंटमेंटचा दिवस उजाडला. डॉक्टरांकडे जायचं म्हणजे परत काळजात धडधड आलीच. कुठल्या लक्षणांतून हल्ली काय निघेल सांगता येत नाही. उदय ऑफिसला निघाला तशी तिनं विचारलं, ”रात्री लवकर येशील? हॉटेलात जाऊ. किती दिवसांत गेलो नाहीये चायनीज खायला.”
”छे गं! आज मुळीच जमणार नाही. फार महत्त्वाची मिटिंग आहे उलट माझं आजचं रात्रीचं जेवण धरू नकोस असं सांगणारच होतो मी तुला. ”
बस्स! नेहमीप्रमाणे मेधाचा मूड गेला. उदयने खाली उतरल्यावर नेहमीप्रमाणे गॅलरीकडे पाहिलं. आज अनेक वर्षांची सवय होती त्याची गाडीत बसताना एक नजर वर टाकायची. मेधा असायचीच तिथे. तिचा हलणारा हात पाहायचा नि मगच गाडीत शिरायचं. आजही त्याने वर गॅलरीकडे पाहिलं पण मेधा नव्हती तिथे.
काय झालंय हल्ली हिला? उदयही विचारात पडला. आपलं काही चुकतंय का? तो परत परत विचार करू लागला. त्याच्या अचानक ठरणार्‍या मिटिंग्स, कॉन्फरन्सेस काही नवीन नव्हत्या. पण पूर्वी कधी मेधाने त्रागा केला नव्हता. मग हल्ली अचानक असा बदल का?
उदय निघून गेल्यानंतर मग मेधा गॅलरीत जाऊन उभी राहिली. तिच्या आवडत्या जांभळ्या रंगाच्या गुलमोहोराचा बहर ओसरलेला दिसला. तिचं मन परत खट्टू झालं. असं का होतंय आपल्या आयुष्यात? परवा संज्योतशीही वाजलं आपलं. परवाच का? हल्ली वारंवार होतायत आपले वादविवाद. जसजशी मोठी होतेय, आगाऊ होत चाललीय. एवढा छान टॉप आणला तिला एल्कोमधून तर आवडलाच नाही. मग बदलून दुसरा आणला तर तोही आवडला नाही. इतके दिवस तर आपल्याच चॉईसचे कपडे आवडीने घालत होती ना? आता शिंग फुटलीयत. ठीक आहे. ह्यापुढे तिच्या पसंतीनेच घ्यायचे कपडे. उगाच पैसे फुकट नकोत जायला.
मेधानं पटापट स्वतःच आवरलं. डबा भरला. नऊ बारा गाठायचीय नि ही गधडी अजून झोपलीय. हिला उठवायचं, तिचा नाश्ता, चहा म्हणजे दहा पंधरा मिनिटं तरी जाणार. तात्यांच्या दुसर्‍या चहाचीही वेळ झाली होती. खरं तर त्यांच्याशी आपलं चांगलं जमायचं. पण हल्ली त्यांच्याशीही वाजतं. कधीकधी दुसर्‍या चहाची वेळ झाली की आतबाहेर करत राहतात. आपली जायची घाई नि ह्यांना फक्त स्वतःचीच पडलेली असते. मग सटकतं कधीतरी आपलंही डोकं.
आत जाऊन तिनं संज्योतचं पांघरूण खसकन् ओढलं. ”बाईसाहेब, उठा. आता तुझी सुट्टी चालू आहे पण आमचं ऑफिस आहे म्हटलं. आणि हो, पहिली पांघरुणाची घडी घाल. नाहीतर आहे आपली हक्काची मोलकरीण.”
”मॉम, प्लीज सकाळ सकाळ इरिटेट करू नकोस गं.” कूस बदलून संज्योत परत झोपून गेली.
मेधाने चिडून तिच्याकडे पाहिलं नि, तिच्या छातीत क्षणभर धस्सं झालं. संज्योतच्या नाइट ड्रेसवर डाग पडला होता. खालची बेडशीटही खराब झाली होती. तिला हळुवार हातांनी हलवत ती म्हणाली, ”संज्योत, ज्योत, अगं उठतेस ना? प्लीज उठ, हे बघ काय झालंय ते.”
चिडलेल्या आईचा एकदम काळजीयुक्त नि शांत झालेला स्वर ऐकून संज्योत पटकन जागी झाली. ”बाळा, ऐक मी काय सांगतेय ते. तुला मी म्हटलं होतं ना मागे. मुली मोठ्या होतात, वयात येतात आणि मग…” मेधा हळूहळू तिला समजावत राहिली. तिला सगळी प्रोसिजर नीट समजावून सांगायला हवी होती. रीतीप्रमाणे काहीतरी गोड करायला हवं होतं. तिला आठवलं तिच्या वेळीही तिच्या आईने पटकन गोड शिरा ढवळला होता. एवढं सगळं करून ऑफिसला जायला उशीर होणार होता. मस्टर तर नक्कीच मिळणार नव्हतं. मग संध्याकाळचं कन्सेशनही मिळणार नव्हतं. डॉ. निशा मेहतांची अपॉईंटमेंटही चुकणार. एवढं सगळं करण्यापेक्षा चक्क सीएलच घ्यावी.
ठरवल्याप्रमाणे तिने लगेच प्रीतमला फोन लावून आजची रजा कळवून टाकली. बॉस नक्की चिडणार कारण आज सकाळी झोनल मॅनेजरची क्वालिटी कंट्रोल व्हिजिट होती. सर्व स्टाफला आज हजर राहण्याची सूचना होती. चिडू दे! काही अनअव्हॉयडेबल सरकमस्टन्सेस येतात प्रत्येकाच्या आयुष्यात आणि स्टॅटिस्टीकच काढायचंय ना? मग त्याची ती लाडकी रीटा काढेल ना! नाहीतरी हल्ली माझ्या कामात चुका शोधतच असतो.
हं. आणि आता ऑफिसचा विचार किती वर्ष आणि का करायचा? बावीस वर्ष झाली सर्व्हिसला आता जमेल तितकी वर्ष करायची नोकरी नाहीतर सोडून द्यायची. पण नोकरी सोडून करायचं काय? घरातल्या कोणालाच आपलं नोकरी सोडणं नकोय. म्हणजे आपली घरातील उपस्थिती ह्यांना नको वाटतेय? आपली गरज फक्त जेवण, चहा नाश्ता करण्यापुरती? ह्या माणसांसाठी आपण इतकी वर्ष झटतोय आणि ह्यांना आता आपण नकोसे झालोय? ह्या वर्षी उदय आपल्या लग्नाचा वाढदिवसही विसरला, त्या कॉन्फरन्सच्या गडबडीत. पुन्हा नेहमीच्या विचारचक्रात ती ओढली गेली. परत मध्ये मध्ये तो पाळी चुकण्याचा विषय होताच त्यात भर टाकायला.
सहाच्या ठोक्याला ती डॉ. मेहतांच्या केबिनमध्ये होती. चेकींग झाल्यावर डॉ. मेहता म्हणाल्या,
”काही काळजी करू नका चेकअपमध्ये तरी सर्व काही नॉर्मल वाटतंय. बहुधा मेनोपॉज असावा. आपण काही टेस्ट करून घेऊ म्हणजे नक्की काय ते सांगता येईल. डोळ्याखालची काळी वर्तुळं वाढलीयत. खूप विचार करता काय?”
डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून तिला आश्चर्य वाटलं. मेनोपॉज? एवढ्यात?
आईची तर पाळी एकोणपन्नासला गेली होती. साधारण आईवर असतं म्हणे हे…” डॉक्टरांना तसं तिने विचारल्यावर त्या म्हणाल्या, ”तुमचं बरोबर आहे. पण हल्ली हे सर्व बदलत चाललंय. मला एक सांगा तुमची आई नोकरी करत होती का? तिला तुमच्यासारखं एकच मूल होतं का? तेव्हा आत्तासारखं प्रदूषण, गर्दी, धावपळ नव्हती. ताणतणाव नव्हते. तुमच्या आईला विचारा तिचे पिरीयड्स जाताना तिला फारसं जाणवलंही नसेल. पण आता बायकांना काय काय होतं.”
”म्हणजे? नक्की काय काय होतं?”
”तुमच्या मैत्रिणींना विचारा. हॉटफ्लशेस येतात. मूड स्विंग होतात. कोणी जरा काही बोललं की मनाला फार लागतं. रडू येतं. उदास वाटतं.”


”अगदी खरंय. मलाही असंच वाटतं. कळतंच नाहीय असं कसं होतंय ते.”
”हे सर्व हार्मोनल इम्बॅलन्समुळे. सर्व मेनोपॉजचीच लक्षणं. एक काम करा. सर्व फॅमिलीबरोबर एकदा बसा. त्यांच्याकडे मन मोकळं करा. त्यांना तुमची मनःस्थिती नि तिची कारणं समजावून सांगा. शक्यतो सकारात्मक विचार करा. कोणाच्याही वागण्याचे मनाला येतील तसे अर्थ काढू नका. मुळात खूप विचार करणंच सोडून एखादा छंद जोपासा. हळूहळू तुम्ही ह्यातून बाहेर पडाल.”
क्लिनिकमधून बाहेर पडली तेव्हा मेधाच्या मनावरचं एक मोठ्ठ ओझं उतरलं होतं. म्हणजे उदय, संज्योत, तात्या कोणीच बदललेलं नव्हतं. बदलले होतो फक्त आपण. हे मेनोपॉजमुळे असेल हे लक्षातच आलं नाही आपल्या.
ती बेडरुममध्ये शिरली तेव्हा संज्योत ड्रेसिंग टेबलसमोर बसून आरशात बघत होती. मुलीचं स्त्रीत रूपांतर होण्याचा तिचा पहिलाच दिवस होता. आरशात आपलं प्रतिबिंब न्याहाळण्यात ती मग्न होती. आज प्रथमच मेधानंही तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं होतं. आज तिचा राग न येता तिला स्वतःचे ते फुलपंखी दिवस आठवून हसू येत होतं.
संज्योतला आवडते तशी जायफळ घातलेली फक्कडशी कॉफी करावी असं वाटून ती स्वयंपाक घराकडे वळली. तेवढ्यात तिला आठवलं. आज सुगंधाची रजा. अरेरे! झाडांना दिवसभरात पाणी घालायचंच राहिलंय म्हणत ती ग्रीलपाशी गेली. त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे तात्यांनी नवीन गुलाब आणून लावलाही होता. त्या नवीन रोपट्याला तर भरपूर गुलाबं आली होती पण आश्चर्य म्हणजे नवीन रोपट्याकडे पाहून जुन्या रोपट्यानंही कात टाकली होती. त्यावर फुलं नव्हती पण तरीही झाड मात्र पूर्वीसारखं मलूल दिसत नव्हतं तर छान हिरवंगार रसरशीत वाटत होतं.
मेधाला जाणवलं इतके दिवस आपलीही अवस्था ह्या जुन्या रोपट्यासारखीच होती. ह्या रोपट्याकडून खूप काही शिकायला हवंय. नवीन रोपट्याच्या आयुष्याला आलेली भरती पाहून ते आपल्या आयुष्यातील ओहोटी विसरून गेलं होतं. आणि म्हणूनच तग धरून राहिलं होतं. नव्हे उमलून आलं होतं. तिनं निश्‍चयच केला. आपल्यालाही असंच उमलायचंय. असंच उमलायचंय…

Share this article