Close

भेटी लागे जीवा (Short Story: Bheti Lage Jeeva)

  • विनायक शिंदे
    हजारात एक अशी देखणी मुलगी एकाएकी या जगातून गेल्यामुळे जो-तो हळहळत होता. तर कोणी परमेश्वर एवढा कसा निर्दयी झाला म्हणून त्याच्या नावाने खडे फोडीत होता. तर कोणी खालच्या आवाजात म्हणत होते, ’सदाच्या हातून एखादा नाग मारला गेला असेल - म्हणून नागाचा कोप त्याच्या मुलीच्या वाटेला आला असेल.’
  • या वर्षाला पाऊस अगदी मनासारखा पडला होता. श्रावण महिन्यात सारे शिवार हिरवा शालू घातलेल्या नव्या नवरीसारखे टवटवीत दिसत होते. जिकडे नजर फिरावी तिकडे चराचरात आनंदी आनंद भरभरून राहिला होता. पण आपल्या टोलेजंग घरात सदाशिव ढळाढळा अश्रू ढाळून लहान मुलासारखा धाय मोकलून रडत होता, कारण त्याची एकुलती एक लाडकी मुलगी सज्जला दोन दिवसांपूर्वी सर्प दंशाने मरण पावली होती. तालुक्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी गाडीतच तोंडाला फेस येऊन तिने प्राण सोडले होते. ती नुकतीच वयात आली होती. सोळावं सरून तिला सतरावं लागलं होतं. तिचा वर्ण लिंबासारखा पिवळा धमक होता. चेहरा अत्यंत आकर्षक होता. तिचा शेलाटा बांधा तिच्या सौंदर्यात भर घालीत होता. तिचा स्वभाव अत्यंत लाघवी होता. त्यामुळे ती सर्वांना नेहमीच हवीहवीशी वाटत असे. तिची आई शारदा तर तिला नजरेआड होऊ देत नसे. आल्या गेल्याची कुणा मेल्याची वाईट नजर तिला लागू नये म्हणून रोज संध्याकाळी न चुकता तिच्यावरून मीठ-मोहरी ओवाळून टाकी. सदाशिव तर रोज तिचे नको तेवढे कौतुक करायचा आणि लाड पुरवायचा. गावातले टोळभैरव अशा सुंदर मुलींच्या मागावर असायचे; पण सज्जलाची छेड काढण्याची कुणाची हिंमत नव्हती. तिचा बाप सदाशिव हा अतिशय बलदंड शरीरयष्टी व नजरेत भरेल अशी उंची असलेला धिप्पाड गडी होता. तो पेशाने काळ्या आईची सेवा करून मातीतून सोने पिकवणारा शेतकरी असला तरी त्याच्या आजोबांच्या जमान्यापासून मारुती मंदिराच्या शेजारी असलेल्या तालमीत घाम गाळून देह भारी-भक्कम केला होता. एखादा माणूस गैर वागलेला त्याला अजिबात खपत नसे. त्यामुळे गावातले टगे त्याला कायम टरकून असत.
    घरात त्याच्या सांत्वनासाठी आलेल्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. हातातोंडाशी आलेली हजारात एक अशी देखणी मुलगी एकाएकी या जगातून गेल्यामुळे जो-तो हळहळत होता. तर कोणी परमेश्वर एवढा कसा निर्दयी झाला म्हणून त्याच्या नावाने खडे फोडीत होता. तर कोणी खालच्या आवाजात म्हणत होते, ’सदाच्या हातून एखादा नाग मारला गेला असेल - म्हणून नागाचा कोप त्याच्या मुलीच्या वाटेला आला असेल.’
    सज्जला आता या जगात नाही ही जाणीवच सदाला पोखरून खात होती. पोर शनिवारची मारुतीला रुईची माळ घालायला जाते काय आणि झुडुपाआडून नाग येऊन तिला दंश करतो काय! सगळेच तर्कवितर्कापलीकडले! नाग सहसा माणसाच्या वाट्याला जात नाही पण माणसाने काय किंवा इतर कोणीही त्याच्या शेपटीवर पाय दिला की तो उलट फिरून डंख मारतो. आपल्या सोन्यासारख्या लेकीला दंश करून त्याने तिला या जगातून कायमचे नेले. आपल्याला या जगात दुःख भोगीत राहायला ठेवून गेला. आपल्याला दुःखी करून त्याला काय मिळाले? आपण त्याचे काय घोडे मारले होते? आणि अचानक लख्खकन् त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला काहीतरी आठवले. तो त्यावेळी सातवीत होता. शाळा सुटल्यावर नदीवर जाऊन तासन्तास पाण्यात डुंबत बसणे हा त्याचा त्यावेळी आवडता छंद होता. असाच एकदा शाळा चुकवून तो नदीवर गेला होता. आदल्या दिवशी त्याची सर्व गणिते चुकली म्हणून मास्तरानी त्याची यथेच्छ धुलाई केली होती. तो राग त्याच्या मनात चांगलाच खदखदत होता. नंतर घरी येताना त्याला पांदीतून अचानक उंदराच्या आर्त किंचाळण्याचा चमत्कारी आवाज ऐकू आला. त्याने चमकून त्या दिशेला पाहिले, तर एक काळाकभिन्न साप उंदराला तोंडात पकडून गिळण्याचा प्रयत्न करीत होता. तर तो उंदीर त्या काळ सर्पाच्या तोंडातून सुटण्याची केविलवाणी धडपड करीत होता. सदाशिवला त्या सापाची मुळीच भीती वाटली नाही, तर त्याचा भयंकर राग आला. त्याने क्षणाचीही उसंत न घेता पायाजवळ पडलेली काठी उचलली आणि त्या सापाच्या शरीरावर जोराचा प्रहार केला. त्या वेदना सहन न होऊन सापाने तोंड उघडले. त्या संधीचा फायदा घेऊन तो उंदीर सापाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झाला होता. आपल्या तोंडची शिकार अशी एकाएकी पळाली याचा सापाला भयंकर राग आला होता. त्याने ’फुस्स’ असा आवाज करून आपला मोर्चा सदाशिवकडे वळवला. त्याला हे सर्व अपेक्षित होते म्हणून त्याने अगोदरच एक मोठा दगड दोन हातांनी उचलून घेतला होता. तो त्याने साप जवळ येताच बरोबर त्याच्या डोक्यावर मारला. सापाच्या डोक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या होत्या. तेवढ्यात समोरच्या बिळातून एक साप त्वरेने बाहेर आला. त्याने सरळ सदाशिवच्या अंगावर चढाई केली. तो सावध असल्यामुळे बचावला. कारण त्या सापाने चक्क त्याच्या पायावर उडी मारली होती. ती त्याने चुकवली व धावत धावत घराच्या दिशेने धापा टाकीत पळाला. ही गोष्ट त्याने घरातल्या सर्वांपासून मुद्दामच लपवून ठेवली होती. नाहीतर त्याला वडिलांच्या हातचा खरपूस मार खावा लागला असता.

  • अनेक वर्षे झाल्यामुळे सदाशिव ती घटना पुरती विसरून गेला होता. आता मुलीच्या मृत्युनंतर त्याला ती एकदम आठवली. तो सापाचा छिन्न-विछिन्न देह उंदराच्या चेहर्‍यावर पडलेले ते मृत्यूचे सावट, हे सारे काही त्याला अगदी काल घडलेल्या घटनेसारखे स्पष्टपणे आठवले. नंतर त्याला हेही आठवले की, नाग व नागीणीची जोडी असते. त्यातल्या नागाला कोणी ठार मारले तर ती नागीण त्याचा हमखास सूड घेते. म्हणजे त्या वेळी पळालेला तो साप म्हणजे ती नागीणच असली पाहिजे. तिला त्या वेळी जरी माझा बळी मिळाला नसला तरी नंतर मात्र माझ्या मुलीला डंख मारून तिने आपल्या सुडाची पूर्तता केली होती.
    कसेबसे तेराव्याचे कार्य उरकून सगेसोयरे आपल्या मार्गी लागले. सदाशिव मात्र प्रयत्न करूनही आपल्या लेकीला विसरु शकला नाही. तो भ्रमिष्टासारखा वागायला लागला. त्याचे कशातच चित्त लागेना. पूर्वी तो मारुतीच्या मंदिरात चाललेलं भजन मोठ्या तन्मयतेने ऐकायचा. पण आता त्याने मंदिरात जायचेच सोडून दिले. त्याचा देवावरचा विश्वासच उडाला. जो भेटेल त्याला तो सांगायचा, ’या जगात देव नाही. असलाच तर तो कुंभकर्णासारखा झोपलेला असेल! तो निर्दयी आहे!! त्याला काळीज नाही. खर्‍या खोट्याची चाड नाही.’
    टेकडीवर असलेल्या मारुती मंदिराकडे पाहून तो चक्क थुंकायचा. लोक म्हणायचे, ”पोरीच्या दुःखाने सदाशिव होत्याचा नव्हता झाला. पार कामातून गेला. ठार वेडा झाला. त्याच्या लेकीला अर्ध्या वाटेवरून ओढून न्यायची होती, तर तिला जन्माला का घातले? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नेहमीच मिळते असे नाही.” आता तर सदाशिव नदीच्या काठावर असलेल्या उंबराच्या झाडाजवळ मोठ्या कातळावर बसून राही. तिथे खाली एक भुयार आहे. त्या भुयारात सापांची वस्ती आहे, असे गावातले जुने जाणते लोक सांगत. त्या भीतीने गावातले सहसा कोणी त्या बाजूला फिरकत नसे. त्या जागी सदाशिव हातात एक मोठा सोटा घेऊन बसलेला असे. तो म्हणे, ”समूळ नाग जातीचा नाश करीन तेव्हाच सुखाने मरेन. नाहीतर काय मी असून-नसून सारखा! खरे तर माझी सज्जला या जगातून गेली तेव्हा मी पण मेलो! आता लोकांना दिसतेय ते माझे चालते बोलते मढे.”
    शारदाने-त्याच्या पत्नीने त्याची लाख समजूत काढली, ”आपली सज्जला गेली. ती देवाला प्रिय झाली. ती काय आता परत येणार नाही. तुम्ही अशी डोक्यात राख घालून घेतलीत आणि तुमचे काही बरे वाईट झाले तर तुमच्या पाठीमागे मी एकटीने हा संसाराचा गाडा कसा काय रेटायचा?”
    त्यावर तो वाचा बसल्यासारखा तिच्याकडे एकटक पाहात राहायचा; जणू काय तो या जगात राहत नाही. मग एकदम ताळ्यावर आल्यासारखा करून वरती बोट दाखवायचा. पोरीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू बाहेर पडायचे; ते पाहून शारदाही मग अवसान सुटल्यासारखी मोठमोठ्याने रडायला लागायची.
    पौर्णिमेची रात्र होती. आकाशात चंद्र पूर्ण तेजाने तळपत होता. सदाशिव आपल्या घरात खिडकीसमोर बसला होता. घरासमोर एक मोठे आंब्याचे झाड होते. त्याच्या फांद्यातून येणारी चंद्रकिरणे त्याच्या तोंडावर झिरपत होती. बाजूला पलंगावर शारदा आडवी झाली होती. आतापर्यंत तिने सदाशिवला हज्जारदा तरी सांगितले असेल, बरीच रात्र झाली आहे. झोपून जा. त्यावर त्याचे ठरलेले उत्तर -’तू झोपून घे, मला अजिबात झोप येत नाही.’
    चंद्रबिंब न्याहाळताना सदाशिवला काहीतरी जाणवले. आंब्याच्या झाडाखाली धुंदील प्रकाशात त्याला कुणाची तरी सावली उभी असलेली दिसली. त्याने डोळे चोळून पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने त्या सावलीला बरोबर ओळखले. ती त्याची लाडकी लेक सज्जला होती. ती त्याला खुणा करून बोलवत होती. त्याला अत्यानंद झाला. कधी नव्हे ते हास्य त्याच्या चेहर्‍यावर तरळले. अचानक त्याने झोपलेल्या शारदाला गदा गदा हलवले. हर्षाची उर्मी सहन न होऊन तो म्हणाला, ’अगं शारदा, उठ! हिला कसले सोयर सुतक नाही. झोपली आहे डाराडूर वेड्यासारखी.’
    धडपडून उठलेली शारदा काही न सुचून त्याच्याकडे पाहतच राहिली. ’आता मात्र हद्द झाली तुमच्या या वेडेपणाची! चांगली झोप लागली होती मला!’
    ”अगं, झोप कसली काळ झोप लागली असेल तुला! उठ आणि बाहेर बघ कोण आले आहे ते खरोखर वेडी होशील! बाहेर आपली सज्जला आली आहे आहेस कुठे?”
    शारदा क्षणभर त्याच्याकडे संशयीत नजरेने पाहायला लागली. पुढे काय बोलावे तेच तिला सूचेना, एक अनामिक भीतीची लहर तिच्या डोक्यातून सळसळत पायापर्यंत गेली. तिने डोळे फाडफाडून बाहेर पाहिले. तिला झाडाव्यतिरिक्त बाहेर काहीच दिसले नाही.
    ’आता रात्रीचे सुद्धा तुम्हाला भास व्हायला लागले?.. ’मी म्हणते, वेळीच स्वतःवर ताबा ठेवा.
    ”नाही गं मी खरेच सांगतो आहे. आता मला बाहेर सज्जला दिसली. ती मला बोलावीत होती. मी जातो. पोरीला भेटले पाहिजे.” असे म्हणून तो उठला. तेव्हा शारदाने जोर लावून त्याला खाली बसवले. त्याला बरे वाटावे म्हणून बाहेर बघायला लागली. पत्नीचा आपल्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, याचेच सदाशिवला अतीव दुःख झाले. दुसर्‍या दिवशी त्याने तिच्याशी संभाषण केले नाही. जेवणही धड केले नाही. सज्जला एक वर्षाची असताना जत्रेत तिचा काढलेला फोटो त्याने कुठल्या तरी पुस्तकातून काढला आणि वेड्यासारखा तासन्तास तो फोटो निरखीत राहिला. जवळच राहणार्‍या त्याच्या चुलत्यांना पुतण्यांना त्याची काळजी वाटायला लागली. शारदाला तर तशी गाढ झोप लागतच नव्हती. चुकून डोळा लागला तर तिला भयंकर स्वप्ने पडत. स्वप्नात तिला महाभयंकर अजगर दिसत असे. तो अजगर घरात शिरून सदाशिवला गिळंकृत करताना दिसत असे. मरताना त्याने जोरजोराने हलवलेले पाय दिसत. धनी म्हणून ती झोपेतून किंचाळून उठे. सगळेच विचित्र, गूढ व अतर्क्य होते.

  • तो त्या दिवशी दुपारी मंदिरात जाऊन येतो असे सांगून गेला तो करकरीत तिन्ही सांजा झाल्या तरी घरी परतलेला नव्हता. तेव्हा शारदाच्या जीवाची घालमेल झाली. तिने लगेचच आपल्या दोन पुतण्यांना टेकडीवरल्या मारुती मंदिराकडे धाडले; परंतु बर्‍याच उशीराने ते रिकाम्या हाताने परत आलेले पाहून तिचे काळीज धडधडायला लागले.
    काकाचा कुठेच पत्ता लागला नाही. ते दोघे हतबद्ध होत म्हणाले. शारदाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या मनात भलते सलते वाईट विचार यायला लागले. वेडाच्या भरात याने कदाचित आत्महत्या तर केली नसेल? ती गोंधळली या पुढे काय करावे हेच तिला सुधरेना. क्षणात तिथले वातावरण गढूळ झाले.
    रात्रीचे अकरा वाजून गेले तरी सदाशिवचा पत्ता नव्हता. घरात सर्वत्र त्याच्या विषयी चिंतेचे वातावरण! खिडकीजवळ काळोखात शारदा उदासपणे सदाशिवची वाट पाहत होती. सारखे सारखे तेच तेच विचार करून तिला ग्लानी आली होती. क्षणात तिचे डोळे मिटले तेव्हा मध्यरात्र झाली होती. नाईलाजाने घरातले सर्वजण झोपेच्या आधीन झाले होते. तेवढ्यात काळोखातून सदाशिव एखाद्या चोरासारखा चोरपावलांनी खिडकीच्या बाहेर आला. त्याने खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिले.
    शारदा पलंगावर निवांत झोपलेली होती. बाहेर स्मशान शांतता पसरली होती. त्यामुळेच की काय आतमध्ये चाललेला शारदाचा मंद श्वासोच्छवास बाहेर त्याला स्पष्ट ऐकू येत होता. अचानक काही अंतरावर गावठी कुत्र्यांची ओरड त्याला ऐकू आली. तो भयंकर दचकला व आंब्याच्या विशाल बुंध्याआड दडून बसला. जिच्यासाठी गायब होण्याचा बनाव त्याने घडवून आणला होता, ती सज्जला एकदम त्याच्या समोर प्रकट झाली. तो भारल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. ती म्हणाली, ”बाबा मला माहिताय तुमचा जीव जसा माझ्यासाठी तीळतीळ तुटतोय ना, तशीच माझीही अवस्था तुमच्यासाठी झाली आहे.”
    ”पोरी तू आम्हाला सोडून गेलीस आणि माझ्या आयुष्याची रया गेली. आमचे जिणे मातीमोल झाले.”
    ”चला, या माझ्यासोबत आता आपली कधीच ताटातूट होणार नाही.”
    तो भारल्यासारखा तिच्या पाठोपाठ जायला लागला. त्याच्या सर्व जाणिवा ठप्प झाल्या. आपण काय करतो आहोत? का तिच्या पाठी जात आहोत? तेच त्याला कळेनासे झाले. चालत चालत सज्जला त्याला टेकडीवर घेऊन गेली. नंतर तिने आकाशाच्या दिशेने झेप घेतली. पुढे काय झाले ते सदाशिवला कळले नाही.
    सकाळी सकाळी देवळातला पुजारी तात्या गुरव ठो ठो बोंब मारीत सदाशिवच्या घरी आला. तो म्हणाला, ”मंदिरापाठच्या खोल दरीत उडी मारून सदाशिवने आत्महत्या केली. दगडावर डोके आपटून त्याच्या डोक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या आहेत. लवकर चला नाहीतर जंगली प्राणी त्याच्या देहाचे लचके तोडतील.”

Share this article