Close

एकच प्रश्‍न (Short Story: Ekach Prashna)

  • प्रियंवदा करंडे

आजींच्या मनात नुसतं काहूर उठलं होतं. नुसता अंगार पेटला होता. हे असं होणं आता सवयीचं झालं होतं. चेहर्‍यावर स्मित आणून त्या नवर्‍याबरोबर निमूट लेकीकडे गेल्या.

“अगं ए, इकडे ये बघू!”
आजी लेकीकडे जायची तयारी करत होत्या. लेकीला आवडणारे ताजे ताजे रव्याचे लाडू डब्यात भरत होत्या. तोच आजोबांची करड्या स्वरातली हाक ऐकून त्या बावरल्या. लगबगीने दिवाणखान्यात गेल्या.
“काय झालं?” त्यांनी न कळून विचारणा केली.
“अगं तोंड वर करून ‘काय झालं’ विचारायला लाज नाही वाटत?” आजोबा करवादले.
दिवाणखान्यात काम करणारी रखमा पटकन आत स्वैपाकघरात पळाली. आजींना घुसमटल्यासारखं झालं.
“हे काय आहे?” आजोबांनी दरडावून विचारलं.
“अं… चहाचा कप!”
“ते कळतंय् पण अगं हा तुझा कप आहे, माझ्या कपातून चहा द्यायची अक्कल आहे ना शाबूत?”
“एवढंच ना! आत्ता आणते.” म्हणत आजींनी तो कप उचलला मात्र, आजोबांनी खस्सकन त्यांच्या हातून कप हिसकावून घेतला. रागाने त्यांनी तो कप जमिनीवर फेकला नि विचारलं, “अगं, एवढंच ना काय? या कपातून चहा पिऊन तुझ्यासारख्या वेंधळ्या बाईसारखी अक्कल गहाण नाही टाकायचीय् मला! रखमा, मला चहा आण दुसरा, तोही माझ्याच कपातून!”
आजींच्या मनात नुसतं काहूर उठलं होतं. नुसता अंगार पेटला होता. हे असं होणं आता सवयीचं झालं होतं. चेहर्‍यावर स्मित आणून त्या नवर्‍याबरोबर निमूट लेकीकडे गेल्या. लेक, नात, जावई यांच्याशी पोटभर गप्पा झाल्या. समाधानाने घरच्या परतीच्या प्रवासाला लागल्या. इतक्यात ठिकाण जवळ आलंच.
“अगं उतर पटकन… उतर ना… उतर… लवकर…” आजोबा ‘काय ही आपली अजागळ, भित्री बायको’ अशा भावनेने आजीशी कुत्सितपणे बोलत होते. बस स्टॉप आला नव्हता. बस सिग्नल असल्याने मध्येच थांबली होती. टुणकन् उडी मारून आजोबा बसमधून उतरले.


“अहो पण, स्टॉपवर उतरायचं ठरलं होतं ना,” म्हणत आजी लगबगीने उतरू लागल्या. बसमधून उतरण्यासाठी त्या शेवटचं पाऊल रस्त्यावर टाकणार न टाकणार तोच ग्रीन सिग्नल मिळाला म्हणून बस ड्रायव्हरने सरळ बस सुरू केली नि आजी धाडकन रस्त्यावर पडल्या. आता तरातरा पुढे जाणारे आजोबा थांबले. हळू वेगात सुरू झाल्या होत्या गाड्या, म्हणून त्याही लगेच थांबल्या, नाहीतर… आता चार सहा माणसं मदतीला धावली.
“अग ऊठ ना…” आजोबा करवादले.
“नाही उठता येत हो मला खाली बसल्यावर…”
आजी अपराधी स्वरात, थोड्या दडपणाखाली कशाबशा उद्गारल्या.
“हात द्या हो.” आजी केविलवाणेपणे म्हणाल्या. तशी आजोबांनी हात दिला… पण आता त्यांना त्यांच्या शक्तीची, कुवतीच्या मर्यादेची जाणीव झाली. मग इतरांनी त्या असाह्य वृद्ध जोडप्याला मदत केली. आजींना व्यवस्थित उठवून रस्त्यापलीकडे सोडलं. त्यानंतर कितीतरी वेळ आजी कानकोंड्यासारख्या वावरत होत्या. आजोबा चिडून गप्प गप्प बसले होते. इतक्यात फोन वाजला.
“हॅलो, सोने,” आजी म्हणाल्या.
“अगं पोचलात ना नीट तुम्ही?… बोल ना आजी?” नात काळजीनं विचारत होती. मग आजीने न राहवून आपण पडल्याचं सांगितलं. ओरडू दे आता आपली मुलगी नि नात!
“पण आजी तू उतरलीसच का आजोबांचं ऐकून?”
अचानकपणे नातीने विचारलेला प्रश्‍न ऐकून आजी आश्‍चर्यचकित झाल्या. त्या काही बोलणार तोपर्यंत नातीने फोन ठेवलाही होता. त्या एकाच प्रश्‍नाने आजींना अंतर्मुख केलं. त्यांना बळ दिलं, हिंमत दिली. मनमोकळं हसत त्या स्वतःशीच म्हणाल्या, “बरोबर आहे तुझं! मी का उतरले? चुकलेच! पण आता यापुढे मी माझ्याच बुद्धीने वागणार. माझ्या आत्मसन्मानाला जपणार. सोने, तुझ्यातल्या स्त्री शक्तीला सलाम!”

Share this article