Close

गोठलेले अश्रू (Short Story: Gothlele Ashru)

  • डॉ. श्रीकृष्ण जोशी
    ही एसटी हेच आमचे जग. उद्या सकाळी याल तेव्हा पुन्हा आम्ही हसतमुखाने स्वागत करू तुमचं. आजच्या यातना विसरून. तुमचं जग आणि आमचं जग वेगळं आहे.
    एस. टी. सड्यावर येऊन थांबली.
    आणि घामाने प्रचंड भिजलेला ड्रायव्हर कसाबसा खाली उतरला. आणि रस्त्यातच मटकन बसला.
    एस. टी. च्या मागून चालत आल्याने दमल्याभागल्या कंडक्टरने, डोक्यावरचा जांभा दगड शेजारच्या झुडुपात फेकला आणि तो सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसला.
    दोघेही घामानं चिंब भिजले होते.
    दोघांचेही छातीचे भाते जोरजोरात हलत होते.
    दोघांच्याही डोळ्यात रक्त पेटलेलं दिसत होतं.
    पण दोघेही निःशब्द बसले होते.
    सगळीकडे अंधार दाटला होता.
    एसटीच्या मिणमिणत्या दिव्यात दोघांच्या सावल्या केविलवाण्या वाटत होत्या.
    गाडी वस्तीची होती.
    गाडीत मी एकटाच पॅसेंजर होतो.
    मी हातातली चार्जिंगची मोठी बॅटरी घेऊन खाली उतरलो आणि त्या दोघांकडे आलो.
    अजूनही दोघे न बोलता तसेच बसून होते .
    अंगातला घाम, मनातला संताप आणि शरीराला झालेले श्रम थंडावण्याची वाट बघत.
    एसटी वेळेवर सुटली होती.
    चाळीस पन्नास पॅसेंजर होते.
    आणि पहिल्याच चढावाला ड्रायव्हरच्या लक्षात आलं, गाडीला पिकअप नाही.
    पण तरीही गिअरशी झटापट करीत तो गाडी चालवत होता.
    त्याच्या पोटात गोळा उठला.

  • या लहानशा चढावाला ही अवस्था तर वस्तीच्या गावात शिरण्यापूर्वीच्या अवघड वळणावळणाच्या, एकावेळी जेमतेम एकच गाडी जाऊ शकेल अशा अरुंद कच्च्या रस्त्याला काय होईल?
    एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी अशी भयानक स्थिती असणार्‍या रस्त्यात गाडीने स्पीड घेतलाच नाही तर काय होईल?
    या चाळीस पन्नास पॅसेंजर्सचं काय होईल?
    जेमतेम दुसर्‍या दिवशी पोहोचता येईल इतकंच डिझेल मिळालेलं असताना ऐनवेळी डिझेल संपलं तर काय होईल?
    पिकअप न घेतल्यानं गाडी पाठीपाठी जायला लागली तर पॅसेंजर्स किती बोंबलतील?
    त्याने हळूच खूण करून कंडक्टरला जवळ बोलावून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली.
    “एक काम करशील काय?“
    “करतो हजार कामं, बोल.”
    “राईचा घाट सुरू झाला की मी गाडी थांबवतो, सगळ्यांना कल्पना देतो आणि तू खाली उतरून एक मोठा दगड घेऊन गाडीबरोबर चाल. गाडी थांबली आणि पाठीपाठी यायला लागली तर तो दगड टायरखाली घाल. इतकंच आपल्या हातात आहे.”
    कंडक्टर विचारात पडला आणि होकार दिला.
    “आज आपला शिव्या खायचा दिवस आहे, चिडू नकोस.”
    “अरे पण साडेतीन मैलांचा घाटरस्ता आहे.”
    “मग मी तरी काय करू?”
    त्या दोघांचं बोलणं हळूहळू सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि एकच कालवा सुरू झाला .
    आरडाओरडा, आयमाय वरून शिव्या, सगळ्यांचा उद्धार आणि पैसे परत मागण्यासाठी कडाक्याची भांडणं सुरू झाली.
    त्यातले काही सूज्ञ होते. त्यांनी घाट लागण्यापूर्वी गाडी थांबवायला सांगितली आणि निमूटपणे चालायला लागले.
    भांडण करून, शिव्या देऊन गाडी चालणार नाही हे लक्षात आल्यावर उरलेले खाली उतरले आणि चालू लागले.
    शेवटी मी सुद्धा उठलो आणि दारापर्यंत आलो.
    इतक्यात पाठून हाक आली.
    “सर , तुमच्याजवळ चार्जिंगची बॅटरी असते ना, मग किमान तुम्ही तरी गाडीत थांबा. समजा गाडी बंद पडली, चालू झालीच नाही किंवा लाईट काम देईनासे झाले तर तुमच्या बॅटरीचा उपयोग होईल. उपकार होतील आमच्यावर.”
    त्याचा केविलवाणा, हृदयद्रावक स्वर ऐकल्यावर माझ्या मनात गलबलून आले.
    मी ड्रायव्हरजवळ आलो.
    “थांबतो मी.”
    त्या दोघांचे डोळे आनंदाने लकाकले.
    आणि मला एकदम शॉक बसला.
    ड्रायव्हर ज्या सीटवर बसतो, तिथे केवळ चौकोनी लोखंडी पट्या होत्या आणि त्यावर जांभ्या दगडाचा चिरा ठेवून ड्रायव्हर गाडी चालवत होता.
    पाठ टेकण्याच्या जागी अनेक चिंध्या एकाला एक जोडून तात्पुरती सीट बनवली होती.
    मी पाहतोय हे ड्रायव्हरच्या लक्षात आलं.
    तो कसनुसा हसला.
    कंडक्टरसुद्धा ओशाळला.
    आणि तो खाली उतरला.
    एक दगड डोक्यावर घेतला आणि चालू लागला.
    गाडी रडत रखडत, मागं पुढं जात कशीबशी पुढं जात होती.
    बरोबरीचे सगळे पॅसेंजर एव्हाना पुढे गेले होते.
    अंधार पडायला सुरुवात झाली होती.
    सुदैवाने गाडीचे दिवे सुरू होते.
    आणि कसाबसा घाट संपला.
    मी त्या दोघांजवळ गेलो.
    “निघायचं?”
    मी त्या दोघांना विचारलं.
    “आणि जेवणाचं काय? डबा आणला असेल ना?”
    उत्तर देण्याऐवजी दोघे उठले आणि केबिनमधले डबे घेऊन आले. माझ्यासमोरच उघडले.
    दोघांच्याही डब्यात भाकरी होती, लसणीची चटणी होती आणि दोनचार लहानसे कांदे होते.
    “कालपासून पुरवून पुरवून खातोय डबे.”
    “म्हणजे?”
    “सर , तुमच्यासारखं जेवण नाही परवडत आम्हाला. घराबाहेर पडताना बायको चार दिवसांच्या भाकर्‍या भाजून देते. पण पोरांकडे बघितल्यावर त्यातल्या दोन भाकर्‍या काढून ठेवतो आम्ही आणि उरलेल्या पुरवून खातो.”
    त्यांनी मान खाली घालून सांगितलं.
    मला कसंतरीच झालं.
    मी घरी फोन केला.
    “दोघे पाहुणे येत आहेत माझ्याबरोबर, जास्तीचा स्वयंपाक करून ठेव.”
    मी घरी सांगितलं.
    “आज माझ्या घरी तुम्ही जेवायला यायचं आहे.”
  • त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
    “तुम्हाला कशाला त्रास?”
    “असू दे, माझ्या गावात तुम्ही येताय, इतकं तर केलंच पाहिजे आम्ही. मला कल्पना नव्हती, तुमच्या परिस्थितीची.”
    दोघेही हसले.
    मला चमत्कारिक वाटलं.
    “काय झालं? मी काही चुकीचं बोललो का?”
    “नाही सर, तुमचं काहीच चुकलं नाही. आमच्या परिस्थितीची तुम्हाला कल्पना कशी असेल? काही तासांकरता पॅसेंजर्स आणि आम्ही एकत्र असतो. पॅसेंजरचं गाव आलं की तो उतरून निघून जातो. गरजेपुरता संवाद होतो. ओळख विसरली जाते. आम्हीसुद्धा ड्युटी लागेल तशी, मिळेल ती गाडी घेऊन सांगतील त्या गावाला जातो. आरामगाडी आहे की खटारा आहे हे आम्हालाही माहीत नसतं. मिळेल ती गाडी, मिळेल तेवढं डिझेल, भेटतील ते पॅसेंजर्स आणि येईल तो प्रसंग, यांना सामोरं जात नोकरी करतो. हां, आता पगार विचारू नका, संसार कसा चालतो ते विचारू नका, सणसमारंभात आम्ही कुटुंबाबरोबर असतो का ते विचारू नका, कर्जबाजारी किती आहोत ते विचारू नका, नोकरी टिकवण्यासाठी कुणाकुणाची बोलणी खातो, चूक नसताना शिव्या खातो ते काही विचारू नका. रस्ते कसे आहेत, आम्ही त्यातून गाडी कशी चालवतो , बंद पडली तर वरिष्ठांची बोलणी कशी खातो, ते विचारू नका. वस्तीच्या गाडीला आम्हाला तीन रुपये भत्ता मिळत होता, त्याचं काय झालं ते विचारू नका, आम्ही व्यसनाधीन का होतो, आत्महत्या का करतो ते विचारु नका. मुलामुलींची शिक्षण, लग्नकार्य यातलं काही विचारू नका. आला दिवस कसा घालवतो हे विचारू नका. पगार वेळेवर होतो का हे विचारू नका. आमच्या शारीरिक आणि मानसिक यातना कधी संपतील हे विचारू नका. आमचं भविष्य कसं असेल, मृत्यू कसा असेल, लाल परीचं भवितव्य काय यातलं काही काही विचारू नका.

  • आजचा क्षण आमचा इतकंच आम्हाला ठाऊक. आम्ही घरी जातो तो दिवस आमचा सणसमारंभाचा असतो, इतकंच माहीत आहे. आणि आता तर डोळ्यासमोर भयंकर अंधार आहे . ही एसटी हेच आमचे जग . उद्या सकाळी याल तेव्हा पुन्हा आम्ही हसतमुखाने स्वागत करू तुमचं. आजच्या यातना विसरून. तुमचं जग आणि आमचं जग वेगळं आहे. आम्हाला डिझेलच्या वासाशिवाय, गंजलेल्या फाटलेल्या सीटशिवाय झोपच येत नाही. तुमच्या शिव्या, वरिष्ठांची बोलणी खाल्याशिवाय पोट भरत नाही. टोचणार्‍या सीटशिवाय सुख लाभत नाही. जरा वाईट बोललोय पण विषय निघाला म्हणून बोललो. हो आणखी एक आहे सर, आमची बाजू कुणी ऐकून घेत नाही. आमच्याबद्दल गैरसमजच भरपूर आहेत, त्यामुळं मोकळेपणानं बोललो.”
    दोघेही उठले.
    “चला, उशीर झाला.”
    कंडक्टरने घंटा वाजवली आणि तेवढ्यात घंटेची दोरीच तुटली.
    “असंच आमचं आयुष्य आहे.”
    तो म्हणाला अन पुन्हा कसनुसा हसला. ड्रायव्हरने गिअर बदलला.
    गाडी सुरू झाली.
    माझं लक्ष त्या तुटलेल्या, घंटेच्या दोरीकडे वारंवार जात होतं.
    आणि डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
    अविरत !
    (हा कथालेख सर्व एस . टी . कर्मचारी बांधवांना समर्पित!)

Share this article