Close

माझी माय (Short Story: Mazi Maay)

  • दीप्ती मित्तल
    नोकरीत आपण खूप गढून गेलो… तिच्यासाठी वेळ देता येत नाही, म्हणून आपल्यात सुसंवाद होत नसेल, अशीही तिने मनाची समजूत करून घेतली होती. सुसंवादातील ही दरी बुजविण्यासाठी तिने सुट्टी घेऊन, मोकळ्या
    वातावरणात फिरायला जाण्याचा प्लॅन आखला अन् तो शैली पुढे मांडला. पण हा प्लॅन ऐकल्यावर आनंदून जाण्याऐवजी शैलीने जे काही वाक्ताडन केलं, त्याची अपेक्षा शीतलने कधीच केली नव्हती.

  • “शीतल मॅडम, फार काही बिघडलेलं नाही. पण तुमचं बी.पी. मात्र लो झालं आहे. तब्येतीसाठी ते चांगलं नाही. टेक केअर ऑफ धिस. तुम्ही मानसिक व शारीरिक त्रास जास्त करून घेताय, असं दिसतंय. तेव्हा आता काम जरा कमी करा अन् आराम जास्त करा. कळलं! अन् हो, खाण्यापिण्याकडेही जरा लक्ष द्या”, शीतलच्या हाताला लावलेला ब्लडप्रेशर मोजमापाचा पट्टा काढत डॉक्टर पुढे म्हणाले, “मोठ्या सुट्टीसाठी अर्ज करा आणि घरी राहून पूर्ण आराम करा.”
    “सुट्टी… मोठी सुट्टी?” शीतलने मोठा सुस्कारा टाकला. तिच्या उदास नजरेत प्रश्‍नचिन्ह तरळलं.
    “वाटलंच मला… ऑफिसात
    कामापुढे मरायला फुरसत नसते अन् तुम्ही रजेच्या गोष्टी करताय, असंच म्हणायचंय ना तुम्हाला… मॅडम, आपल्यासारख्या कष्टाळू मॅनेजरांकडून मी हेच उत्तर ऐकत आलोय… पण ‘जान है, तो जहान है…’ म्हण जुनी असली, तरी अगदी अर्थपूर्ण आहे… माहीत आहे नं…” डॉक्टर म्हणाले.
    शीतलच्या चेहर्‍यावर फिक्कट स्मित उमटलं. कारण काही दिवसांपूर्वी तिच्याही मनात असंच काही आलं होतं. वर्षानुवर्षं अखंडपणे तिनं
    स्वतःला कामाशी जुंपून घेतलं होतं… या यांत्रिक, कष्टाच्या जीवनातील थोडे दिवस वेगळे काढून ते आपली मुलगी, शैलीसाठी द्यावेत, हा विचार तिच्या मनात आला होताच…
    ‘निफ्ट’ या मान्यवर संस्थेमधून लेदर डिझायनिंगचा कोर्स पूर्ण करून शैली हल्लीच घरी परतली होती. डिझायनर बॅग व पर्स यांचं ब्युटिक सुरू करण्याचा तिचा इरादा होता. किती दिवसांपासून शैली शीतलच्या वाट्याला आलीच नव्हती. तिच्याशी पोट भरून गप्पा मारता आल्या नव्हत्या. म्हणूनच तिनं ब्युटिकच्या कामात स्वतःला झोकून घेण्याआधी दहा-पंधरा दिवस सुट्टी घेऊन मजेत केरळला जाऊन यावं, असं तिला राहून राहून वाटत होतं…
    शैली हल्ली आपल्यापासून दूर जाते आहे, असं शीतलला वाटत होतं. शैली तिच्याशी पूर्वीसारखी बोलत नव्हती. शीतल स्वतः बोलायला गेली तरी, ‘हो-नाही’ असं त्रोटक उत्तर देऊ लागली होती. शैली आपल्याला जाणून-बुजून टाळते आहे, असं शीतलला अलीकडे जाणवू लागलं होतं… तसं पाहिलं तर, शीतलने तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. कपड्यांची निवड, मित्र-मैत्रिणींचा गोतावळा, करिअर याबद्दल कधीच टोकलं नव्हतं किंवा आपली मतंही तिच्यावर कधी लादली नव्हती. शैलीने डॉक्टर व्हावं, असं तिला खूप वाटत होतं. पण तिने ‘निफ्ट’ची निवड केली, तेव्हाही शीतलने आनंदाने होकार दिला होता. तरीही का कोण जाणे, पण शैली तिच्याशी फटकून वागत होती.
    शैलीची रूक्ष वागणूक हा कदाचित आपला भ्रम असेल किंवा ती तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्यामुळे अशी मूडी वागत असेल, अशी स्वतःचीच समजूत करून घेत, शीतलने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं… तिला असंही वाटलं की, शैली सध्या आत्ममग्न असते, हा तिच्या स्वभावातील झालेला बदल असेल… पण ती ज्या पद्धतीने मित्र-मैत्रिणींसोबत हसून खेळून वागत होती, आनंदात राहत होती, ते पाहिल्यावर ही आपलीच पोर आहे का, असा संभ्रमही शीतलला पडत असे…
    नोकरीत आपण खूप गढून गेलो… तिच्यासाठी वेळ देता येत नाही, म्हणून आपल्यात सुसंवाद होत नसेल, अशीही तिने मनाची समजूत करून घेतली होती. सुसंवादातील ही दरी बुजविण्यासाठी तिने सुट्टी घेऊन, मोकळ्या वातावरणात फिरायला जाण्याचा प्लॅन आखला अन् तो शैली पुढे मांडला. पण हा प्लॅन ऐकल्यावर आनंदून जाण्याऐवजी शैलीने जे काही वाक्ताडन केलं, त्याची अपेक्षा शीतलने कधीच केली नव्हती.
    “वा…! कमालच झाली म्हणायची. कित्येक वर्षांनंतर तुला माझ्यासोबत क्षण घालवावेसे वाटताहेत! खरं की काय? एवढे उपकार कशाला करतेस गं माझ्यावर? मला तुझ्या सहवासात राहण्यामध्ये काहीही स्वारस्य नाही, मग तुझ्याबरोबर फिरायला जाणं तर दूरच. आणि स्वतःसाठी आनंद कसा मिळवायचा, ते माझं मी बघून घेईन. तेव्हा घे सुट्टी अन् तुझी तू कर मजा…” शैलीच्या वाक्यावाक्यात उपहास होता. तिचं बोलणं ऐकून शीतल अगदी सुन्न झाली. दुखावलेल्या स्वरात तिनं विचारलं, “शैली, अगं आपल्या आईचा तू एवढा दुस्वास का करतेस?”
    “आई? हे आईपण तुला शोभत नाही गं! फक्त जन्म दिला, म्हणून तू आई होत नाहीस. स्वतःला आई म्हणवून घ्यायचं, तर तिची कर्तव्यंही पार पाडावी लागतात… लहानपणापासून आजपर्यंत मला आई हवी होती, पण ती मला कधीच मिळाली नाही. लहानपणी माझं जग तुझ्यापुरतंच मर्यादित होतं, पण तेव्हा तुला
    माझ्यासाठी वेळ नव्हता. आता मात्र मी मोठी झाले आहे. इंडिपेंडन्ट आहे.
    माझा छान मित्रपरिवार आहे. त्यांच्याशी मी सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू शकते. त्यांच्यासोबत आनंदाने हिंडू-फिरू शकते. आता मला तुझ्या दयेची गरज नाही…” शैलीने आग पाखडली.
    “तुला नसेल गं, पण मला तुझ्या सोबतीची…” पुढे शीतलला बोलवेना. तिचा गळा दाटून आला होता. डोळ्यात अश्रू तरळले.
    “अगं, पण तुझी प्रायॉरिटी तर नेहमीच तुझं करिअर राहिलं आहे. मग आताच माझी आठवण कशी झाली? पैसा आणि रुबाब या पलीकडे तुझं जगच नव्हतं कधी. या गोष्टींची कास धरल्यामुळे ना तू चांगली आई झालीस, ना चांगली पत्नी… म्हणूनच तर पप्पाही तुला सोडून गेले!” शैली आक्रमक होऊ लागली होती. तिला पुढे काही बोलू न देता शीतल ओरडलीच, “बस्स… एक शब्द पुढे बोलू नकोस.”
    शैलीच्या बोलण्याचे आघात तिला सहन झाले नाहीत. ती अस्वस्थ झाली. इतकी की झोपेची गोळी घेऊनच अंथरुणात शिरली…
    आज शीतलच्या पोटच्या गोळ्यानं तिच्या जखमांवरची खपली काढली होती… या जखमा भरायला किती
    वर्षं लागली होती… शीतलच्या
    डोळ्यासमोर गतकाळ आला…
    …तिच्या बाबांना अकाली मरण आले, तेव्हा ती अवघी सतरा वर्षांची होती. शिक्षण थांबवून तिचं लग्न लावून देण्यात आलं. घरच्यांनी जणू आपलं ओझं कमी केलं. पण ती सासरी गेली आणि तिथेही त्यांना ओझंच झाली. त्या घरात प्रेम व सन्मान मिळण्याऐवजी तिच्या वाट्याला नेहमी द्वेष व अपमानच आला. प्रसंगी मारही मिळाला. आपलं जीवन म्हणजे शाप आहे, अशी तिची भावना झाली होती. तरीही प्राप्त परिस्थितीशी ती जुळवून घेत होती. पतीचे दुसर्‍या स्त्रीशी सूर जुळले अन् सर्व काही सोडून तो त्या स्त्रीसोबत चक्क पळून गेला. हजारो रुपयांचं कर्ज तिच्या डोक्यावर ठेवून, तो निर्दयपणे निघून गेला होता…
    शीतलवर जणू आभाळच कोसळलं होतं. एवढ्या मोठ्या जगात आपण एकटं असल्याची तिला जाणीव झाली होती. जीवन नकोसं झालं होतं, पण तिच्या उदरात वाढणार्‍या चिमुकल्या जिवानं तिला जगण्याची नवी उमेद दिली… आपण एकटे नाही, कुणीतरी आहे… फक्त आपलं, या भावनेनं तिच्या मनाला उभारी आली. अन् तिने कात टाकली…
    ती अधिक शिकलेली नव्हती, त्यामुळे मागेपुढे न पाहता मिळेल ते काम करत गेली. शिक्षणाअभावी चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे तिने शिक्षण पूर्ण करण्याचा निश्‍चय केला. शैलीच्या जन्मानंतर तिला अशा कंपनीत नोकरी मिळाली होती, जिथे महिला कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी पाळणाघर होतं. त्यामुळे दिवसभर तिला शैलीची काळजी नसायची. नोकरी करत असतानाच, वेगवेगळे कोर्स करून तिने उच्च शिक्षण घेतलं. यथावकाश तिला योग्यतेनुसार वरची जागाही मिळाली.
    करिअर सांभाळताना तिला सदैव आपल्या मुलीचाच विचार येत असे. पितृ सुखापासून शैली वंचित राहिली होती. याची कमतरता तिला भासू नये, म्हणून शीतल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती. शिक्षणात कमी पडू नये, म्हणून तिला सर्व सुविधा देत होती.
    मेहनतीच्या बळावर नोकरीत तिची उन्नती होत होती. जबाबदार्‍या वाढत होत्या. तेव्हा शैलीच्या संगोपनात उणीव राहू नये, म्हणून तिला सांभाळण्यासाठी तिने एक आयाही ठेवली. ती बाई खूप चांगली होती. आपलं कर्तव्य चोख बजावत तिने शैलीचा इतका छान सांभाळ केला की, तिच्या बाबतीत शीतल अगदी निश्‍चिंत झाली. शैलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने सोयीसुविधांमध्ये काहीही कमतरता पडू दिली नाही.
    शीतलच्या जीवनाची ही वाटचाल सोपी नव्हती. किती तरी कटू अनुभव तिला आले. पुरुष सहकार्‍यांचे अश्‍लील शेरे, आडून आडून तर कधी सरळ सरळही समोर ठेवलेले शरीरसुखाचे प्रस्ताव… एकटी स्त्री म्हणजे भोग्य वस्तू. हिचं शरीर सहज उपभोगायला मिळेल, अशा पुरुषी मानसिकतेचा जाच तिला सहन करावा लागला. पण तिनं कच खाल्ली नाही. पाऊल घसरू दिलं नाही. छोट्या शैलीला फुलासारखं सांभाळण्याचा तिने विडा उचलला होता. तिच्या निरागस स्मितानं तिला अधिक कणखर बनविलं होतं. शीतलनं शैलीसाठी खेळणी आणली की, ती आनंदाने टाळ्या पिटायची. गोड हसायची. तिच्या एकेक हास्याच्या बळावर जीवनातील रणक्षेत्रात विजयी वाटचाल करण्याची शक्ती तिला मिळत राहिली. पण… आज शैलीच्या या निष्ठुर वक्तव्यांनी तिची ही शक्तीच जणू हिरावून घेतली होती.
    त्या दिवसानंतर आई आणि मुलीचे संबंध एका संथ तलावातील पाण्यासारखे थबकले होते.
    दोघींमधल्या संभाषणांची जागा फक्त ‘हं’ आणि ‘हूं’ या शब्दांनी घेतली होती. शीतलच्या डोळ्यात उपेक्षा आणि वेदनेचे अश्रू दाटून येत, मात्र ते आवरण्यावाचून तिला गत्यंतर नव्हते. एकीकडे शैली आपल्या डिझायनर बॅग्ज आणि पर्सच्या नव्या ब्युटिकमध्ये गढून गेली होती, तर दुसरीकडे शीतल निराशेच्या गर्तेत डुंबत चालली होती.
    शैलीला तिच्या नव्या व्यवसायात चांगलं यश मिळत होतं. तिने ब्युटिकमध्ये मारिया नामक एका तरुणीला सेल्स गर्ल म्हणून नेमले होते. मारिया नेहमी हसतखेळत वागणारी, कामात आणि बोलण्यात चतुर मुलगी होती. कस्टमर्सना ती दुकानातील वस्तू दाखवून अशा रीतीने पटवून द्यायची की, ते रिकाम्या हाताने जातच नसत. तिच्या विक्री कौशल्याने दुकानातील खप सतत वाढत राहिला. मारिया दुकानात कुणी नसलं तर गाणं गुणगुणायची, गिर्‍हाइकांशी खुबीने बोलायची, नेहमी खुशीत असायची. हिच्याकडे असा काय ठेवा आहे की ती सदैव आनंदी असते, असं शैलीला रोजच वाटायचं. तसं पाहिलं, तर ती मारियापेक्षा सर्वच बाबतीत सरस होती. शिक्षण, पैसा, अधिकार… तरीही का कोण जाणे, पण मारियाच्या पुढ्यात तिला आपला प्रभाव फिका पडतोय, असं वाटायचं. शिवाय आईशी फटकून वागण्यानं ती उदास राहायची, तिला कमतरता जाणवायची…
    आज मारिया ब्युटिकमध्ये आली. मांडून ठेवलेल्या बॅगा ती अशा रीतीने पाहू लागली की, जणू ती सेल्स गर्ल नसून कस्टमरच होती. एक सुंदर बॅग घेऊन ती शैलीकडे आली. म्हणाली, “मॅम, ही बॅग मी घेऊ का?… म्हणजे विकत घेऊ का? हिचे पैसे माझ्या पगारातून कापून घ्या.”
    शैली तिच्याकडे पाहतच राहिली. कारण ती बॅग महाग होती. ती विकत घेण्याची मारियाची ऐपतच नव्हती. या बॅगेसाठी तिचा महिन्याचा पूर्ण पगार संपला असता. म्हणून शैली तिला म्हणाली, “हरकत नाही… पण मारिया ही बॅग बरीच महाग आहे गं. तू दुसरी एखादी, कमी किमतीची बॅग बघ ना.”
    “म्हणजे, त्याचं काय आहे मॅम… उद्या ना माझ्या मॉमचा बर्थ-डे आहे. तेव्हा ही बॅग मला तिला गिफ्ट द्यायची आहे… माझी मॉम नं, जगातली बेस्ट मॉम आहे. त्यामुळे आपल्या
    ब्युटिकमधली सर्वात बेस्ट बॅग तिला गिफ्ट द्यावी, अशी माझी इच्छा आहे. मी एक वेळ स्वतःसाठी तडजोड करेन, पण माझ्या मॉमसाठी कुठलीही तडजोड मला मंजूर नाही.”
    शैलीच्या काळजात हल्लकीशी कळ उठली. मारियाच्या मते तिची मॉम ही जगातली बेस्ट मॉम आहे. तिच्या आनंदी स्वभावाचं हेच तर गुपित नसेल ना? आपल्या जीवनात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे काय? म्हणूनच आपण मारियासारखे आनंदी जीवन जगू शकत नाही की काय?… शैलीच्या मनात प्रश्‍नांचं मोहोळ उठलं. त्या दिवशी तिचं मन कामात रमलं नाही.
    “मारिया, एक विचारू? तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते ना गं? तुझी फार काळजी पण घेत असेल ना?” शैलीनं भावुक होत विचारलं.
    “यस मॅम… मॉमनं माझ्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय. आज मी जी काही आहे नं, ती तिचा त्याग व तपस्या यांच्या बळावर. मॅम, मी किनई परिस्थितीमुळे माझ्या मॉमपासून पंधरा-सोळा वर्षं दूर राहिले. आता मी तिच्याजवळ आहे. तिची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मला आनंदाने भरून टाकायचा आहे.”
    “पंधरा-सोळा वर्षं दूर… म्हणजे काय गं?”शैलीने उत्सुकतेपोटी विचारलं.
    “काय झालं की, माझ्या जन्माआधीच माझे वडील, मॉमला देवाच्या भरवशावर सोडून निघून गेले. ते कधीच परत आले नाहीत. मॉम एकटी राहिली. शिवाय माझी जबाबदारी होतीच. ती तर्‍हेतर्‍हेची, अगदी कष्टाची कामं करून माझं भरणपोषण करू लागली. पण मी लहान असल्यामुळे ती मला एकटीला सोडून कामावर जाऊ शकत नव्हती. मला चांगलं जीवन जगता यावं, यासाठी चांगली कमाई करणं आवश्यक आहे, हे तिच्या मनानं घेतलं. म्हणूनच मला मामाच्या घरी ठेवून ती काबाडकष्ट करू लागली. माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या मॉमनं मन घट्ट करून मला दूर ठेवलं. हा निर्णय घेताना तिच्या हृदयाचं पाणी पाणी झालेलं मी पाहिलं आहे. पुढे मॉम मला जेव्हा जेव्हा भेटायला यायची, तेव्हा तेव्हा गिफ्ट म्हणून फक्त पुस्तकंच आणायची. तू शिकून-सवरून चांगली मोठी होशील, तर आपल्या दोघींचंही नशीब उजळेल… असं ती नेहमी म्हणायची. माझं भाग्य उजळावं म्हणून तिनं कष्ट करून आपला देह झिजविला. मामीकडून मला आईचं प्रेम मिळालं नाही. आईच्या प्रेमाला मी पारखी झाले होते, म्हणून माझ्या मनात कायम एकच विचार असायचा… चांगलं शिक्षण घेऊन, मोठी होईन अन् सदैव मॉमसोबत राहून तिची इतकी सेवा करेन की, ती आपला कष्टप्रद भूतकाळ विसरून जाईल. माझ्या मॉमला दुःख विसरायला लावण्याचा मला हा एकच मार्ग दिसत होता. मी गॉडकडे प्रार्थना करीत होते… शिक्षण पूर्ण करून मला तुमच्याकडे चांगली नोकरी मिळाली. माझ्या मॉमने
    माझ्यासाठी खूप काही केलं आहे. आता माझी पाळी आहे. मला नेहमी वाटतं की, असं काही करावं की, माझ्या मॉमच्या चेहर्‍यावर हास्य खेळेल… ती आनंदी राहील.” मारियानं आपलं अंतरंग उलगडून टाकलं.
    “पण काय गं मारिया, तुझ्या आईनं तुला स्वतःसोबत ठेवलं नाही… वेळ दिला नाही… माया दिली नाही, याचा तुला कधी राग आला नाही?” आपल्या मनातील प्रश्‍नांची उत्तरं शैली मारियाकडून काढून घेत होती.

  • “अहो मॅम, तिनं माझे पाश तोडले नसते, तर ती नोकरी कशी करू शकली असती? आणि नोकरी केली नसती, तर पैसे कसे मिळाले असते… आणि आम्ही कसे जगलो असतो? माझं शिक्षण कसं झालं असतं? एकमेकांच्या जवळ राहणं, सतत लाड करणं, म्हणजेच प्रेम व्यक्त करणं नसतं. मुलांचं जीवन सुखाचं व्हावं, म्हणून कधी कधी आईबाबांना त्यांचा दुरावाही सहन करावा लागतो… मला माझ्या मॉमबद्दल अजिबात तक्रार नाही. कारण तिनं असं केलं नसतं, तर आज आम्हा दोघींनाही भीक मागावी लागली असती. माझ्या वडिलांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली असती, तर आम्हा मायलेकींना संकटांचा सामनाच करावा लागला नसता. देवानं माझ्या आईवर जी परिस्थिती आणली, त्याचा सामना करीत तिनं बेस्ट काम केलं. म्हणून माझ्या हिशेबी ती जगातली बेस्ट
    मॉम आहे.”
    मारियाच्या या बोलण्याने शैलीच्या हृदयाला पाझर फुटला. तिने जणू काही शैलीसमोर आरसा धरला होता. त्या आरशात एका तद्दन स्वार्थी, कृतघ्न मुलीचं प्रतिबिंब उमटलं होतं. त्या मुलीला आपल्या आईची तपस्या आणि त्याग कधी दिसलाच नव्हता. ती आपल्या आईचं दुःख दूर करण्याऐवजी, तिला दुःखाच्या डागण्या देत होती. दैवदुर्विलासानं तिच्या आईला संसारसुख लाभलं नव्हतं. आईला पित्याची भूमिकाही पार पाडावी लागली होती. अशा परिस्थितीत आई म्हणून यदाकदाचित तिच्या कर्तव्यात कसूर झाली असेल, तर काय बिघडलं? अशी कशी वागले मी? आईकडून मी संगोपनाच्या शंभर टक्के अपेक्षा का ठेवल्या? ती पण एक माणूसच आहे, देव नाही ना? जी परिस्थिती तिच्या वाट्याला आली, त्यातून तिने स्वतःसाठी नि
    माझ्यासाठीही सगळं चांगलंच केलं. तिनं मला सन्मानानं, ताठ मानेनं जगायला शिकवलं. माझी आईपण सगळ्यात चांगली… सगळ्यात बेस्ट आहे… ती परिपूर्ण-परफेक्ट आई आहे. मला तिचा अभिमान वाटतो… मनात निर्माण झालेल्या आवर्तनात शैली गुरफटून गेली होती…
    “मॅम, काय झालं? तुम्ही अशा गप्प का?” मारियाने शैलीला त्या गुरफटलेल्या अवस्थेतून बाहेर काढलं.
    “काही नाही, ही बॅग तू घेऊन जा मारिया… आणि हो, या बॅगेचे पैसे मी तुझ्या पगारातून कापणार नाही हं. मी तुला गिफ्ट दिली आहे, असं समज.”
    “गिफ्ट? पण कशाबद्दल?” मारिया गोंधळात पडली.
    “याचं उत्तर मी तुला सवडीनं देईन. असं समज की, तू माझ्यावर इतके उपकार केले आहेस की, त्याची परतफेड मी करू शकणार नाही.” शैलीचा गळा दाटून आला. तिला पुढे बोलवेना.
    आपल्या मॅमला अचानक काय झालं, ते मारियाला कळेना. तिला तशीच संभ्रमात ठेवून शैली घाईघाईनं ब्युटिकबाहेर पडली. तिची पावलं वेगानं घराकडे धाव घेऊ लागली. तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. मन मोकळं झालं होतं. आपल्या प्रेमळ आईचं दुःख दूर करण्याचा तिनं निर्धार केला होता. तिला कसं कसं सुख द्यायचं, याच्या योजना ती आखू लागली होती…
    घरात पाऊल ठेवताक्षणी तिनं शीतलला कडकडून मिठी मारली अन् अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिच्या डोळ्यातून पश्‍चात्तापाच्या धारा वाहू लागल्या. त्या धारांमधून
    दोघींमधला तणावही वाहून जाऊ लागला. “माय मॉम… जगातली बेस्ट मॉम… माय परफेक्ट मॉम… माझी माय…” स्फुंदत आईला घट्ट धरून शैली बोलत होती… अन् शीतल… आपल्या जीवनातला हा सर्वोच्च क्षण असल्याची अनुभूती घेत होती!
  • दीप्ती मित्तल

Share this article