Close

मी बाई हुशार! (Short Story: Me Bai Hushar)

  • वि.रा. अत्रे
    हे मेलं घोटाळे नाव मला बिलकूल आवडत नाही. पण काय करू? लग्नानंतर नाव बदलतं ना? पूर्वीचं नाव चांगलं होतं,
    शहाणे! जाऊ द्या, नावात काय आहे? तसं आमच्या यांना मात्र घोटाळे हे नाव शोभतं बरं का? सतत काहीतरी घोटाळे करीत असतात. पण मी बाई हुशार!


सकाळची वेळ म्हणजे अगदी लगीन घाईच असते. पण मी बाई हुशार! माझी कधीच धावपळ होत नाही. सकाळी काय काय लागेल, याची तयारी मी रात्रीच करून ठेवते. हो म्हणजे,
हे नाही, ते संपलं असं काही होत नाही.
सकाळी माधव… म्हणजे माझा नवरा लवकरच ऑफिसला जायला निघतो. त्याचा डबा वेळेवर तयार नसला, तर तो डबा न घेताच जातो. तेवढाच ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये हादडायचा चान्स! पण मी बाई हुशार! असं बाहेरचं खाणं चांगलं नसतं. मी त्याला असला भलतासलता चान्स कसा घेऊ देईन? तो जात नाही, तर बंटीची शाळेत जायची गडबड सुरू होते. त्याची अंघोळ, कपडे, वह्या-पुस्तकं… एक ना अनेक गोष्टी असतात. त्याचा नाश्ता म्हणजे एक संकटच असतं. रोज काय नवनवीन करणार? पण मी बाई हुशार! म्हणून जमवते हो. त्याचं आवरून त्याला एकदा शाळेच्या बसमध्ये बसवून दिले की मगच मी मोकळी होते.
त्या दोघांना वाटेला लावून मी स्वयंपाकघर आवरलं. ओटा साफ केला. मग सगळं जिथल्यातिथे नीटनेटकं लावून टाकलं. मला सगळं कसं जिथल्यातिथे लागतं बाई. वेंधळेपणा मला मुळीच खपत नाही.
तर काय सांगत होते मी? हां, सगळं आवरून मी बाहेर पडायच्या तयारीत
होते. तर शेजारच्या काळेवहिनी टपकल्या! मुलखाची वेंधळी बाई! आता नेमकं माझ्या निघायच्या वेळीच हे काळं मांजर कशाला आडवं आलं? तरी मी बाई हुशार! किती राग आला, तरी बाहेर थोडाच दाखवीन? मी हसून म्हणाले, “या या काळेवहिनी! सकाळी सकाळी?”
“अहो घोटाळेकाकू…”
हे मेलं घोटाळे नाव मला बिलकूल आवडत नाही. पण काय करू? लग्नानंतर नाव बदलतं ना? पूर्वीचं नाव चांगलं होतं, शहाणे! आता लग्नानंतर पूर्वीचं नाव लावायचीही फॅशन आहे ना?
तसं लावायचं म्हटलं तर, घोटाळे-शहाणे असं लावावं लागेल. ते फार विचित्र होणार नाही का? बरं उलटं शहाणे-घोटाळे लावावं तर, ते जास्तच चमत्कारिक! एकूण काय, नाव बदलायची सोय नाही. जाऊ द्या, नावात काय आहे? तसं आमच्या यांना मात्र घोटाळे हे नाव शोभतं बरं का? सतत काहीतरी घोटाळे करीत असतात. पण मी बाई हुशार! म्हणून यांचं ठीक चाललंय बरं का, नाहीतर काय ब्रह्म घोटाळा करतील त्याचा नेम नाही!
तर काय, या घोटाळे नावावरून एवढं रामायण सांगावं लागलं. तर काय सांगत होते? हां काळेवहिनी म्हणाल्या, “अहो घोटाळेकाकू, माझ्याकडे ना थोडा घोटाळा झालाय!”
“असं? कसला घोटाळा?” मनात म्हटलं, मेली ही काळे सतत काहीतरी घोटाळे करीत असते. हिलाच खरं तर घोटाळे नाव शोभून दिसेल!
“अहो, सकाळी चहा करायला घेतला ना,
तर मेलं सगळं दूधच नासलं!”
“दूध नासलं? ते कसं?”
“रात्री गरम करून ठेवायचंच विसरले हो.”


“असं कसं हो विसरता काळेवहिनी? मी बाई दोनदा का, चांगलं चार-चारदा गरम करते.
अहो, सकाळी मेलं बुड खाजवायलाही वेळ मिळत नाही. तिथं हे असले घोटाळे झाले म्हणजे बघायलाच नको.”
“खरंच घोटाळेकाकू तुमच्या हुशारीचं कौतुक
वाटतं हां.”
“बरं मग, मी काय करू?” माझ्या हुशारीच्या कौतुकामुळे मला फारच बरं वाटलं.
“घोटाळेकाकू, तुम्ही कायम एक अर्धा लीटरची पिशवी ठेवता म्हणे फ्रीजमध्ये? स्टॅण्डबाय म्हणून?”
“हो. ठेवते ना. तुम्हाला कुणी सांगितलं?”

“त्या प्रधानांच्या काकू सांगत होत्या. त्यांना भारी कौतुक हो तुमच्या हुशारीचं. त्या म्हणतात, अख्ख्या सोसायटीत घोटाळेकाकूंसारखी दुसरी हुशार बाई नाही!”
अख्ख्या सोसायटीत माझ्या हुशारीचं कौतुक होत आहे, हे ऐकून मला खूपच बरं वाटलं.
मी म्हणाले, “काळेवहिनी ती पिशवी देऊ
का तुम्हाला?”
“हो. त्यासाठीच आले होते. अहो, सकाळचा चहा नाही मिळाला ना, तर आमचे हे घर डोक्यावर घेतील. घोटाळेकाकू मी थोड्या
वेळाने बाहेर जाईन, तेव्हा तुम्हाला नवीन पिशवी आणून देईन.”
मी तत्परतेनं पिशवी दिली. त्यांना म्हणाले, “काळेवहिनी एक लक्षात ठेवा. गृहिणीने कसं कोणत्याही प्रसंगाची आधीच कल्पना करून ठेवली पाहिजे, म्हणजे ही असली अडचण येत नाही. मी तर अख्ख्या महिन्याचं वेळापत्रक आधीच तयार करून ठेवते. काय बिशाद काही अडचण येईल? तुम्हाला सांगते काळेवहिनी…”
“घोटाळे काकू मी येते आता. तिकडे आमचे हे, चहासाठी ‘आ’ करून बसले असतील! मी येते पुन्हा तुमचे मार्गदर्शन ऐकायला. काळेवहिनी घाईघाईत सटकल्या!”
काळेकाकू मधेच टपकल्यामुळे मला थोडा उशीर झाला. मी सकाळीच भाजीपाला आणून ठेवते. सकाळी ताजी ताजी भाजी मिळते ना! त्यातही माझा भाजीवाला ठरलेला आहे. अगदी निवडक भाजी माझ्यासाठी काढून ठेवतो. हे म्हणतात, “तो तुला फसवतो. ताजी म्हणून कालची शिळी
भाजी, पाणी मारून मारतो तुझ्या गळ्यात.
तसं तर आमच्या यांना मुळात भाजीतलं काही कळत नाही. अळू आणि पालक यातला साधा फरकही कळत नाही.”
मी म्हणाले, “घोटाळे हे भाजीचं मला नका सांगू. राहू द्या. ये तुम्हारे बस की बात नही। तेथे पाहिजे जातीचे! म्हणजे माझ्या सारखे हुशार!”
तर सांगायचा मुद्दा पटकन आवरून बाहेर पडले आणि बाजाराजवळ आले, तर समोरूनच गोरेकाकू येताना दिसल्या! मला पाहून न पाहिल्यासारखं करून त्या रस्ता ओलांडायच्या बेतात होत्या. पण मी चांगली खमकी.
त्यांचा बेत ओळखून, मी त्यांना हटकलंच, “काय गोरेकाकू? फार घाईत दिसता?”
“छे, छे, कसली घाई?”
“नाही म्हणजे, मला पाहूनही रस्ता बदलत होता?”
“नाही हो. अहो, मला त्या गॅसची आठवण झाली. गॅसची ऑर्डर द्यायची आहे ना? ते
दुकान या बाजूलाच आहे, म्हणून रस्ता क्रॉस करत होते. अहो, दोन दिवस झाले ऑर्डर
देऊन, अजून आला नाही सिलिंडर.”
“आमच्याकडे नाही बाई अशी वेळ येत. मी
गॅस संपायच्या चांगल्या पंधरा दिवसाआधी ऑर्डर देते.”
“अहो पण, सिलिंडर आला आणि पहिला संपलाच नसेल, तर गॅस फुकट नाही का जायचा?”
“कशाला फुकट जाईल? मी बाई दोन
सिलिंडर घेऊन ठेवलेत.”
“ते कसे मिळाले तुम्हाला?”
“अहो, जागा बदलली तेव्हा जुना सिलिंडर आणला पत्ता बदलून आणि नव्या जागेच्या पत्त्यावर नवा सिलिंडर घेतला.”
“असं चालतं? फसवणूक नाही का ती?”
“गोरेकाकू, अहो थोडी हुशारी केली की
जमतं सगळं!”
“तुम्ही खरंच हुशार हो घोटाळेकाकू. आम्हाला नाही जमत बाई असली हुशारी! अगंबाई! घोटाळाच झाला!”
“काय हो? कसला घोटाळा?”
“अहो घोटाळेकाकू, अहो सगळं मुसळ केरात!”
“मुसळ केरात? काय बोलताय?”
“अहो, घाईघाईने निघाले आणि गॅसची शेगडी बंद करायची विसरले बहुतेक. पळते आता!” त्या सटकल्या.
माझ्या मनातही शंकेची पाल चुकचुकली! त्या काळेवहिनी आल्या त्या गडबडीत बोलायच्या नादात मीही विसरले की काय गॅसची शेगडी बंद करायला? तरी मला वाटलंच होतं की काळी मांजर आडवी आली, म्हणजे काहीतरी घोटाळा ठरलेलाच!
समोरच भाजीवाल्याचं दुकान होतं. मी घाईघाईने गेले आणि त्याला म्हणाले, “रामशरण, जरा पटकन दे रे एक छोटी मेथीची पुडी आणि दे बांधून एक मोठी मसाल्याची जुडी!” तो ‘आ’ करून पाहायला लागला. तशी मी खेकसले, “अरे पाहतोस काय वेंधळ्यासारखा? काय सांगितलं ऐकलं नाही का?” त्याने पण पटकन मी सांगितल्याप्रमाणे भाजी दिली. मी ती तशीच पिशवीत कोंबली आणि घराकडे धूम ठोकली.
आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहतो. लिफ्टसमोर आले, तर ती वर गेली होती. थेट सातव्या मजल्यावर! आवाज येत होता, ‘कृपया दरवाजा बंद करा, प्लीज क्लोज द डोअर!’ पण दरवाजा बंद करायचं काही लक्षण दिसेना! टेप पुन्हा पुन्हा वाजत होती! मी चरफडले! हा वॉचमन कुठे जातो? आणि हे लोक तरी कसे? खुशाल दरवाजा नीट बंद न करताच कशी लिफ्ट वापरतात? शिस्त नाही अजिबात! तेवढ्यात लिफ्ट खाली आली. आतून सातव्या मजल्यावरचे देशपांडे आजोबा हळूहळू काठी टेकत, थरथर कापत बाहेर पडले! त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी होती.
“घोटाळेकाकू, आजोबांना जरा वेळ लागतो. सॉरी!”
“अगं मग लिफ्ट कशाला थांबवून ठेवायची? दुसर्‍यांचा खोळंबा नाही का होत?” ती उर्मटासारखी माझ्याकडे पाहून आजोबांना घेऊन चालू लागली. जाऊ दे. सगळेच आपल्यासारखे हुशार थोडेच असतात? मी पटकन आत शिरले, लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट थांबताच चटकन बाहेर पडले आणि
धावत जाऊन दरवाजाला चावी लावली! पण मेला दरवाजा उघडेनाच! पुन्हा पुन्हा किल्लीची मुंडी पिरगाळली पण कुलूप उघडायचं काही लक्षण दिसेना!
तेवढ्यात समोरून दामले आजी आल्या. आता ही भोचक भवानी कशाला कडमडलीय इथे?
“काय घोटाळेकाकू? सानेकाकू हव्यात का?”
“सानेकाकू? छे छे. त्या कशाला?”
“नाही म्हणजे, त्यांच्या कुलुपाशी खटपट चाललीय म्हणून विचारलं.”
त्यांच्या घराच्या कुलपाशी? मी झटकन वर पाहिलं. खरंच दारावर त्यांची पाटी! मघाशी त्या देशपांड्यांच्या सुलूनं लिफ्ट आणायला वेळ लावला त्यामुळे माझं बाई डोकंच फिरलं होतं. नाहीतर माझ्यासारखी हुशार, अशी चुकून तिसरा मजला सोडून पाचव्या मजल्यावर येईलच कशाला? त्या रागाच्या भरात मी चुकून तिसर्‍या ऐवजी पाचव्या मजल्याचं बटण दाबलं होतं. हुशार माणसंही चुकतात ना?
“अरे चुकून आले हो इथे.” असं म्हणून सटकले. मागून दामले आजींचा टोमणा ऐकू आलाच. ‘काय वेंधळी आहे ही घोटाळी?’ आणि मग कुत्सितपणे हसण्याचा आवाजही आला! असा संताप आला थेरडीचा. जिथे तिथे नाक खुपसत असते मेली!
पुन्हा लिफ्टसमोर आले, तर आपलं ‘कृपया दार बंद करा’चा गजर चालूच! लिफ्ट तळमजल्यावर होती, पण पुन्हा कुणीतरी दरवाजा अर्धवट बंद करून पळालं होतं! कसे असतात हे लोक? एवढा धांदरटपणा? बेशिस्त? त्याच रागात मी भराभरा खाली उतरून आले. झटकन घरी जाऊन पटकन चावी लावली पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या! वर पाहते तर पांड्यांची पाटी! म्हणजे पुन्हा चुकून तिसर्‍याऐवजी चौथ्या मजल्यावर आले. ही नवीन घरं म्हणजे ना नुसते छापाचे गणपती असतात! सगळे मजले सारखेच! माणसानं चटकन कसं ओळखावं आपलं दार?


पुन्हा लिफ्टच्या नादी न लागता भरभर एक जिना उतरले. घर गाठले. आधी पाटी वाचली. क.रा. घोटाळे. हां, आमचंच घर. पण यांची पण कमालच हां. माणसानं थोडं तरी डोकं चालवावं ना? निदान माझ्यासारख्या हुशार बाईला विचारून तरी पाटी बनवायची ना? आधीच आडनाव घोटाळे. त्यात क. रा. कशाला? त्यापेक्षा सरळ कमलाकर रा. घोटाळे नाही
का लिहिता येत? निदान हे एकदम ‘करा’ तरी टळले असते! येऊ दे त्यांना घरी. आधी ही पाटी घेते बदलून. किल्ली लावून पटकन दरवाजा उघडला आणि धावतच गेले स्वयंपाकघरात! आधी गॅसच्या शेगडीची बटणे पाहिली! ती बंदच होती.
एकदम काळजावरचं ओझं उतरलं. त्या गोरेकाकूंचा अस्सा राग आला! स्वतः गोंधळ घालायचा अन् दुसर्‍यालाही घाबरवायचे! तरी मी म्हणत होतेच की, माझ्यासारखी इतकी दक्ष आणि हुशार अशी विसरेन कशी?
हां पण, त्या काळेबाईंच्या गडबडीत एक मात्र राहिलेच हो! चुकूनच बरं का? सिंकचा नळ जाताना बंद करायचा राहूनच गेला होता! नळ बदाबदा वाहत होता! आता यात माझी काय चूक? अहो, पाणी यायची एक नक्की वेळ तरी कुठे असते? किती वेळा बंद करायचा आणि उघडायचा तो नळ? तरी बरं, माझ्यासारख्या हुशार बाईचं लक्ष असतं म्हणून! नाही तर चोवीस तास गळत बसला असता! एवढ्यात बेल वाजली! आता कोण आलं? दार उघडते. दारात घोटाळे!
“अगं बाई तुम्ही?
एवढ्या लवकर? अगं गाड्या बंद पडल्यात. अजून चोवीस तास लागतील दुरुस्तीला.
मग सरळ घरी आलो.”
घोटाळ्यांना ओट्यावर ठेवलेली भाजीची
पिशवी दिसली. काहीतरी काकडी, गाजरबिजर मिळेल तोंडात टाकायला, म्हणून त्यांनी भराभरा भाजी बाहेर काढली!
“अगं, ही काय भाजी आणलीस का चेष्टा केलीस?”
“अहो काय झालं? ओरडताय काय?”
त्यांनी एका हातात एक मसाल्याची पुडी
आणि दुसर्‍या हातात चार काड्यावाली मेथीची जुडी उचलून माझ्या डोळ्यांसमोर नाचवली!
“हा रामशरण ना बिलकूल बिनडोक! अहो, चुकून एक मोठी मसाल्याची जुडी आणि एक छोटी मेथीची पुडी दे म्हणाले, पण त्याला समजायला नको? सगळं माझ्यासारख्या
हुशार बाईनंच समजून घ्यायचं का?”

Share this article