रेखा नाबर
लादल्या गेलेल्या संततीसाठी जीवापाड मेहनत करणं खरंच क्लेषदायक. भ्रूणहत्येचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवला नाही. ती फार शिकलेली नव्हती. परंतु सुसंस्कृत होती. तेच संस्कार तिने माझ्यावर केलेत. नुसतीच माता नाही तर महन्माता आहे ती.
मनिषा ती आलिशान वास्तू आपल्या नजरेत साठवून ठेवत होती. तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता. किती देखणी दिसत होती वास्तू! तिची तंद्री भंग पावली, मोटारच्या हॉर्नच्या आवाजाने.
गर्रकन मागे वळून पाहिले तर अण्णासाहेब सहकुटुंब सहपरिवार हजर होते. पत्नी अवंतीबाई, मुलगे अजय, विजय व मुलगी अनिता.
“मंडळी, ही मनिषा. आपल्या बंगल्याची सर्वेसर्वा.”
“वॉव्, बंगला मस्तच झालाय हां मनिषाताई.” अनिताची पसंती.
“एकदम सुपर्ब आहे ही वास्तू! हो ना विजय?”
“हो खरंच. एकदम मनांत भरते.”
“चला. आतून पाहून घेऊ बंगला.” अवंतीबाईंचे फर्मान.
अवंतीबाईंनी काहीही अभिप्राय न दिल्यामुळे मनिषा खट्टू झाली व मागेच राहिली. अण्णासाहेबींनी ते ताडले.
“मनिषा, चल आमच्याबरोबर. तूच तर आमची गाईड.”
“एवढ्याशा घरासाठी गाईड कशाला? अवंतीबाईंच्या शेप्याला न जुमानता अनिताने मनिषाला हाताला धरून आत नेले.
“प्रत्येकाने आपली खोली पाहून घ्या. काही बदल हवे असतील तर मनिषाला सांगा. ती करेल सगळं व्यवस्थित.”
प्रत्येकाने आपल्या खोलीत हव्या असलेल्या बदलाबाबत मनिषाला सूचना दिल्या. तिने त्यांची नोंद केली. अखेर सर्वांनी मास्टर बेडरूममध्ये प्रवेश केला.
“वॉव् अण्णा, काय मस्त झालीये बेडरूम तुमची!” अनिता.
“हो मम्मा, मार्व्हलस् झालीये बेडरूम. आवडली ना तुला!” अजय.
“हो, ठिक आहे.” अवंती.
“अवंती, काही बदल हवे असले तर आत्ताच सांग मनिषाला.”
“आहे तशी चालले मला.”
बेडरूम आवडल्याचा आनंद अवंतीबाईंच्या चेहेर्यावर परावर्तीत होत होता. परंतु पोटातले ओठावर न आणण्याचा त्यांचा शिरस्ता असावा, असे मनिषाला वाटले. मॅडम अण्णासाहेबांसारख्या ’डाऊन टू अर्थ’ नाहीत हे उमजून, तिने त्यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.
“चला, सगळ्यांच्या पसंतीला ही वास्तू आली आहे. मनिषाने स्वतंत्रपणे केलेलं हे पहिलंच काम आहे. शाबास मनिषा. आता वास्तुशांतीचा समारंभ ठरवायला हरकत नाही.”
सगळे अपेक्षेने मनिषाकडे पाहत असताना अवंतीबाईंनी प्रस्ताव मांडला. “आता घरी जाऊनच ठरवू सगळं.”
अण्णासाहेब मनिषाला कुटुंबात सामावून घेऊ पाहत होते. तर अवंतीबाई तिला तांदुळतल्या खड्याप्रमाणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या.
“अण्णासाहेब, बंगला सर्वांच्या पसंतीला उतरलाय. आता माझं इथे काही काम नाही. उद्यापासून मी आले नाही तर चालेल ना?”
“कसं चालेल? अजून वास्तुशांतीचा कार्यक्रम व्हायचा आहे. नंतर कर्वेरोड वरच्या देसाईंच्या बंगल्याचं कामही करायचं आहे.”
“हो. मी उद्या जाऊन भेटेन त्यांना.”
“नाही. मी येणार आहे तुझ्याबरोबर.”
मनिषाची अडकित्त्यांत सुपारी अशी अवस्था झाली होती. वास्तुशांतीचा बेत ठरला. त्याची जोरदार तयारी सुरू झाली. बांधकामाच्या सुरुवातीलाच कलशपूजन व इतर सर्व पूजा यशासांग झाल्यामुळे आता निमंत्रितांसाठी समारंभ होती. सगळे कुटुंबिय बंगल्यावर राहायला आले. कार्यक्रमाच्या वेळी बंगल्याचे नामकरण करण्याचे ठरले. मॅडमच्या आईसुद्धा आल्या होत्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
स्कूटरवरून मित्राला भेटायला गेलेल्या अजयला अपघात झाला व जागेवरच त्याचे निधन झाले. संपूर्ण बंगला शोकसागरात बुडाला. अनिताच्या आग्रहास्तव मनिषा बंगल्यावर राहायला आली. मॅडम दोन दिवस बेशुद्धावस्थेत होत्या. अण्णासाहेब महत् प्रयासाने स्वतःचे दुःख आवरून कुटुंबियांना धीर देत होते. मॅडमच्या आईंना मनिषाचा बंगल्यातील वावर फारसा रुचला नव्हता. मनिषा अगदी कानकोंडी होऊन गेली होती. खडतर भूतकाळ मागे टाकून, उज्वल भविष्याकडे वाटचाल करताना निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिच्या मनात भीतीचे काहूर उठले होते. ’काळ हेच सर्वांवर औषध असते.’ ह्या उक्तीनुसार मॅडम हळूहळू सावरल्या. एका दुपारी महिला मंडळातील दोन मैत्रीणी त्यांना भेटायला आल्या. त्या मनिषाला न्याहाळीत होत्या. शेवटी न राहवून त्यांनी विचारले.
“अनिता, ही मुलगी कोण गं?”
“मुलगी काय? ती आमची मनिषादीदी आहे. संपूर्ण बंगला तिच्या देखरेखीखाली बांधला गेलाय.”
“म्हणजे हिला बांधकामाचं शास्त्र येतं?”
“हो तर. सिव्हिल इंजिनियर आहे ती. बांधकामाचं शास्त्र आहे ते. तिने सर्व परीक्षा दिल्या. प्लॅन काढण्यापासून बंगल्याच्या कामावर सुपरविजन करण्यात तिचा सहभाग होता. शिवाय बंगल्याचं इंटिरियर डेकोरेशन सुद्धा हिनेच केलंय.”
“हो का? हुषार आहे. शिक्षण कुठे झालं? पुण्यातच का?”
“नाही. नाशिकला झालं माझं शिक्षण.”
“अगं बाई, आम्ही दोघी नाशिकच्याच. कुठे राहायचीस तू नाशिकला?”
“स्टँडजवळच्या दातारांच्या वाड्यांत.”
“आमच्या जवळच की. नाव काय म्हणालीस तुझं? ”
छातीतली धडधड वाढतच होती. उत्तर देणं भाग होतं. भूतकाळ भविष्याला खग्रास ग्रहण लावणार असं तिला वाटायला लागलं.
“मनिषा शिवराम नाईक.”
“म्हणजे तू शिवराम नाईकची मुलगी. पण मला चांगलं आठवतंय शिवराम वारला, तेव्हा तुझा जन्म झाला नव्हता.”
“हो. तर. त्यानंतर त्याच्या बायकोला कुठेशी नोकरी लागली. थोडीफार शिकली होती. काही महिने राहिली होती तिथे. अचानक एक दिवस गायबच झाली. तुझा जन्म म्हणजे एक कोडंच आहे बाई. काय म्हणतेस ग सरला?”
“कोडं तर काय? मला नक्की माहिती नाही. उडत उडत आलं कानावर. शिवरामच्या बायकोवर म्हणे कुणी गुंडांनी बलात्कार केला होता. त्यातूनच तुझा जन्म झाला असावा. कोणाचे कुठे आणि काय स्वरुपाचे सबंधं असतात. कल्पनाच करवत नाही.”
इतका वेळ गुमसुम असलेल्या मॅडम कान टवकारून ऐकू लागल्या. असल्या खरपूस बातम्या दुःखावर सुद्धा कडी करतात की काय? त्यांची आईसुद्धा काहीतरी पुटपुटत होती. मनिषाला आपले पोस्टमॉर्टेम होत असल्याचा भास झाला. तिच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली.
‘’खबरदार माझ्या आई-वडिलांची निर्भत्सना कराल तर. समज आल्यावर मला तिने सत्य परिस्थिती सांगितलीय. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन कुणा संभावित वासनापिसाटाने तिला भ्रष्ट केलं. तुमच्यातलाच असणार तो.”
“मनिषा, तोंड सांभाळून बोल.” सरला कडाडली.
“झोंबल्या ना मिरच्या? माझ्या आई-वडिलांवर चिखलफेक करताना जीभ मोकाट सुटली होती ना? आता हकिगत ऐका. ऐकावीच लागेल. त्या घटनेनंतर बाबांच्या मित्राच्या मदतीने ती जागा सोडून आई अनाथाश्रमात गेली. तिथे माझा जन्म झाला. आईला नोकरी आणि राहायला जागा मिळाली. कष्टप्रद परिस्थितीत माझं शिक्षण पुरं केलं तिने. मी सुद्धा शिकवण्या करीत होते. इंजिनियरींगचा खर्च ही साधीसुधी बाब नाहीये. लादल्या गेलेल्या संततीसाठी जीवापाड मेहनत करणं खरंच क्लेषदायक. भ्रूणहत्येचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवला नाही. ती फार शिकलेली नव्हती. परंतु सुसंस्कृत होती. तेच संस्कार तिने माझ्यावर केलेत. नुसतीच माता नाही तर महन्माता आहे ती. तसं आईचं वैवाहिक जीवन खडतरच. लग्नानंतर खूप वर्षापर्यंत मूल नाही. घरात आजी आणि बाहेर तुमच्यासारखे मानभावी शब्दशरांनी घायाळ करीत होते. बाबांचा मृत्यू आणि नंतर तर कडेलोटच. तरीही ती ठाम उभी राहिली, फक्त माझ्यासाठी. क्षणांत आपली वासना शमवून पुरुष मोकळा झाला आणि स्त्री सोसतेय अवहेलना. वा रे पुरुषप्रधान समाज! तुम्ही स्त्रिया असून एका असहाय्य स्त्रीची निर्भत्सना करताय. तिच्या काढून टाकलेल्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला?”
मनिषा भडाभडा बोलत होती आणि सगळे पुतळ्यासारखे बसून ऐकत होते. तिला भावनातिशयाने रडू कोसळले. मॅडमच्या आईने सल्ला दिला.
“अवंती, विकून टाक हा बंगला. असेलही सुंदर तो. पण शापित वास्तू आहे ही. तिच्यावर अशुभाची छाया असणार. म्हमूनच घरात असं आक्रित घडलं. सर्व प्रकारची वाहनं चालवण्यात तरबेज असणारा मुलगा अपघातात दगावतोच कसा? विषाची परीक्षा झाली तितकी पुरे. आणखी काही घडण्याआधी विकून टाकू या हा बंगला.”
मनिषाने डोळे कोरडे केले व शांतपणे ती बोलू लागली.
“आजी, लहान तोंडी मोठा घास घेते. क्षमा करा. लोभसवाणं सुंदर कमळ चिखलाच्या घाणीत उगवतं. तरीही भक्तीभावाने देवाला अर्पण केलं जातच ना? वासनासक्त पुरुष स्त्रीची विटंबना करायला टपलेलेच असतात. ते विसरतात की अशाच एका स्त्रीच्या उदरांत नऊ महिने राहून आपण जन्म घेतलाय. पण स्त्रीने कोरडे ओढणं म्हणजे आपणच आपल्यावर आसूड ओढण्यासारखं आहे. मग काय अर्थ आहे स्त्रीच्या अस्तित्त्वाला? त्या नराधमाला शोधून काढून शिक्षा देण्याची पात्रता आहे कोणाची? फुकाच्या वल्गना काय कामाच्या? माझी आई आणि मी निर्मळच आहोत. पण तुम्हाला आम्ही अपशकुनी वाटतो ना, तर ह्या कुटुंबातल्या कोणालाही माझं नख सुद्धा दिसणार नाही, की मी ह्या बंगल्याकडे फिरकणार सुद्धा नाही.”
तिचा अप्रिय भूतकाळ वर आला होता. वर्तमानकाळावर त्याची सावली पडण्याआधी तिला ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडून भविष्य काळाकडे कूच करण्यासाठी जिद्दीने उभे राहायचे होते. सगळ्यांकडे तिरस्काराची नजर टाकून ती बाहेर पडली व गेटजवळ आली.
“मनिषा, थांब. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी.”
मॅडमचा आवाज ऐकून ती गर्रकन् वळली.
“आता तुम्हाला काय डागण्या द्यायच्यात?”
तेवढ्यात विजय घाईघाईने आता आला.
“ममा, दुःख कमी करणारी बातमी आहे. आपल्या कामशेतच्या जमिनीची केस खूप वर्षं रखडली होती ना, तिचा निकाल आपल्या बाजूने लागला. आता बंगल्याची कॉलनी करायला हरकत नाही.”
त्याने हेतूपुरस्सर मनिषाकडे पाहिले. तिला म्लान चेहेरा व एकूणच जीवघेणी स्तब्धता जाणवून तो खट्टू झाला व आत निघून गेला. मॅडमनी मनिषाच्या प्रश्नास उत्तर दिले.
“मनिषा, मी माझा कर्तासवरता मुलगा गमावला, हे माझं दुर्दैव. त्यात तुझा काहीही दोष नाही. पण आता मला सूनसुद्धा गमवायची नाहीये.”
“आं. काय?” सगळ्यांचा कोरसमध्ये आवाज घुमला.
“होय, अजयचे आणि तुझे सूर जुळत होते ते माझ्या लक्षात आलं होतं. आम्हा दोघांत तसं बोलणंही झालं होतं. माळ ओवता ओवता खळकन् तुटावी तसंच झालं. पण मला अशी कर्तबगार, जिद्दी सून नाही गमवायची. परिस्थितीवर मात करून तू लक्षणीय प्रगती केली आहेस. धन्य तुम्ही मायलेकी. माझ्या विजयची पत्नी होऊन येशील घरात? तो अजयचा जुळाभाऊ आहे.”
हे ऐकून मॅडमच्या आई कडाडल्या.
“अवंती, तुझं डोकं फिरलंय की काय? अरिष्ट ओढवून घेण्याचे भिकेचे डोहाळे लागलेत वाटतं तुला? तिला मागणी घालण्याआधी जावईबापूंशी बोलायचं.”
आतल्या खोलीतून अण्णासाहेब बाहेर आले. मनिषा चपापली.
“सासूबाई, अवंती माझ्या मनातलं बोलली. आतून मी ह्या भिशी भगिनींचं वाक्तांडन ऐकलं. सगळी पार्श्वभूमी मला नीट समजली आहे. प्रगती करू पाहणार्या महिलांना आपण ’दीन’ करून ठेवणार असलो तर स्त्रीपुरुष समानतेला अर्थच राहत नाही; आणि महिला दिन साजरा करण्याचा आपल्याला हक्क सुद्धा राहत नाही. ’स्त्री शक्तीला सलाम’ ही महिला दिनाची फक्त वल्गनाच ठरू नये. पुरुषाच्या पाशवी वृत्तीची शिकार होऊन सुद्धा आपल्या मुलीला शिक्षण, संस्कार देऊन समाजात मानाचं स्थान मिळवून देणार्या महिलेचा गौरव व्हायला पाहिजे. मनिषाचा स्विकार करून आम्ही तो करणार आहोत. अजयचा मृत्यू हा दैवदुर्विलास खराच. पण खूप वर्षं खितपत पडलेली जमीन सुटणं हा दैवयोग नव्हे का? तेव्हा मनिषाच्या आणि तिच्या आईच्या कर्तृत्त्वाला कुर्निसात करून मी अवंतीच्या शब्दांवर शिक्कामोर्तब करतो.”
मॅडमच्या व अनिताच्या चेहेर्यावर समाधानाचे हसू उमटले, अजयच्या निधनानंतर प्रथमच. मॅडमच्या अनपेक्षित मायेने मनिषा अभावितपणे त्यांच्याकडे खेचली गेली. त्यांना कडकडून मिठी मारून म्हणाली, “मॅडम.”
दोघींच्या नयनातून सतत अश्रूधारा वाहत होत्या. मॅडमनी अनितालासुद्धा मिठीत सामावून घेतले.
“मॅडम नाही ममा.”
आपल्या आनंदाश्रूंच्या पडद्यावर तो भावनिक सोहोळा अण्णासाहेब साठवून ठेवित होते. गाडल्या गेलेल्या भूतकाळावर तिच्या भविष्यकाळातील यशाची इमारत उभी राहू पाहत होती.
“नारीने नारीस सावरावे, उंच मानेने जगी वावरावे.”