Close

पायधुनी (Short Story: Paydhuni)

  • कल्पना कोठारे
    स्थापन न झालेला देव, म्हणजे ग्रंथसाहेब ज्या खोलीत होता, तिथे जायचे राहूनच गेले होते. परत उन्हात इतक्या पायर्‍या चढून जायचे? या प्रश्‍नाचे पारडे हलत असतानाच, आनंदाचे पारडे जडच झाले, कारण परत पायधुनीत पाय ठेवायला मिळणार होते. या बालआनंदाला कवटाळीतच माधुरीने सरदारजींच्या देवाचे दर्शन घेतले.

  • सणसणीत ऊन पडले होते. मध्यप्रदेशातील मे महिना! भरीस दुपारचे बारा वाजत आलेले. अशा वेळी ऐतिहासिक स्थळे बघण्याचा मूर्खपणा, ‘टूरिस्ट’ हा प्राणीच करू जाणे! रिंगमास्टरने म्हणजे ड्रायव्हरने विचारले, ‘साब, गुरूद्वारा देखेंगे?’ मानेनेच मूकसंमती देत, आपापले काळे चष्मे, टोप्या, पाण्याच्या बाटल्या सावरीत, गाडीच्या सावलीतून बाहेर येत, मनोहर, माधुरी आणि मुले, भर उन्हात चालू लागली.
    ‘चपला गाडीतच ठेवा हं, नाहीतर तुमचीही ती वटसावित्री होईल.’ मनोहरने चेष्टेने सर्वांना बजावले. एकदा धुळ्यात असताना, वटसावित्रीच्या दिवशी, पूजा आटोपून वडावरून घरी परतताना, माधुरीला अनवाणी, पाय भाजत परतावे लागले होते, कारण वडाजवळ काढून ठेवलेल्या तिच्या चपला, चोरीस गेल्या होत्या. हा प्रसंग कौटुंबिक विनोदच होऊन बसला होता. ‘अनवाणी’ शब्दाऐवजी, ‘वटसावित्री’ शब्द वापरून सगळेच माधुरीची थट्टा करीत. स्वतः माधुरीला मात्र, ती आठवण येताच, काळजाचा ठोकाच चुकल्यासारखे वाटे. चपलांजवळ बसविलेले आपले बाळ चोरीस गेले नाही, म्हणून ती मनोमनी देवाचे आभार मानीत असे.
    आत्ता ते बाळ, आजचा सहा वर्षांचा राजू पुढे पुढे धावत, ताई व बाबांबरोबर गुरुद्वारापर्यंत पोचलाही होता. तापलेल्या जमिनीवर भराभर पाय उचलीत तिनेही त्यांना गाठले. काय आश्‍चर्य! जणू देवच मदतीस धावून आला होता. समोर पांढर्‍या शुभ्र टाइल्सने बांधून काढलेली वाहत्या पाण्याची पट्टी दिसत होती. ‘नाली’ म्हटल्यास, त्या स्वच्छ वाहत्या पाण्याचा अपमानच झाला असता, असे त्या उथळ, अरुंद पट्टीकडे पाहून माधुरीस वाटले. जेमतेम पाऊल मावेल, अशा त्या पाण्याच्या प्रवाहात पाय स्वच्छ करून, शांत मेंदूने देवाला सामोरे जाण्याची ती सरदारी पध्दत, माधुरीला इतकी आवडली की, मनातल्या मनात त्या अरुंद नालीचे ‘पायधुनी’ असे नामकरण तिने करून टाकले. हिंदू देवळाबाहेरील कुंडांचेही असे शुभ्र ‘मिनीकरण’ झाले तर? अर्थात हा प्रश्‍नही तिच्या मनातच राहिला. कारण, ऐकायला जवळ कोणीच नव्हते. मनोहर मुलांसह पायर्‍या चढून दूरवर पोचला होता. नाइलाजाने पायधुनीचा तो सुखद गारवा सोडून ती गुरुद्वाराच्या तप्त पायर्‍या चढू लागली.
    डावीकडे गुरुद्वाराचे अपुरे बांधकाम होते. एका खोलीत, गुरुग्रंथ- साहेबराजवर चवर्‍या ढाळीत काही दाढीवाले बसलेले दिसत होते. तिकडे न जाता मुले उजवीकडील गच्चीवर हुंदडत होती. नुसत्या रंगीबेरंगी टाईल्सनी मढवलेली ती गच्ची माधुरीला मोहवू शकली नाही. नुकत्याच बघून झालेल्या, राजा मानसिंगच्या वाड्याचा आणि भग्नावस्थेतही सुंदर शिल्प भासणार्‍या सासबहू मंदिराचा पगडा अजूनही तिच्या मनावर होता. त्यामुळेच, गुरुद्वाराचे आधुनिक, अर्धवट अवस्थेतील चालू बांधकाम तिला विशेष आकर्षक वाटले नसावे. रंगीबेरंगी फुलपाखरांमागे धावावे, तशी मुले, गच्चीवरील एकेक टाईल बघत पुढे जात होती. ‘तुम्ही पुढे जाऊन या, मी जरा इथेच टेकते.’ असे म्हणून माधुरी एका कट्ट्यावर विसावली. तिची पाऊले एव्हाना सुकली होती. पायधुनीचा थंड गारवा, तिला परत परत आठवत होता.
    तिच्या लहानपणी, अशीच कोमट पावलांनी ती खसतट्टीजवळ उभी असे. तेव्हा ती छोटी ‘माधो’ होती. या उन्हाळ्याचा धाकटा भाऊ शोभेल असा तो विदर्भातील उन्हाळा! बघता, बघता खसतट्टी म्हणजे वाळ्याचा पडदा कोरडा होई. सडा घातल्याप्रमाणे, पेल्याने पडद्यावर वारंवार पाणी शिंपडावे लागे. वाळ्याचा वास, भरभरून हुंगून घेत, छोटी माधो उभी असे. ‘सारखी पाण्यात खेळू नकोस! सर्दी होईल.’ कुठलेतरी मोठे भावंड, शेंडेफळावर खेकसे. मग मात्र माधो घाबरून आत खोलीत जाई.
    ती तट्टीवाली खोली एरव्ही ‘बाळंतिणीची खोली’ म्हणून ओळखली जाई. उन्हाळ्यात मात्र ती काळोखी खोली ‘खेळाची खोली’ असे. माधोच्या सख्ख्या, चुलत मावस, आत्ते, मामे भावंडांच्या सुट्टीत दुपारभर तिथे धुमाकूळ चाले. छोट्या माधोला पत्ते खेळता येत नसले तरी इतरांबरोबर ‘नॉटॅठोम’ (म्हणजे नॉट अ‍ॅट होम) ओरडताना तिला खूप मजा वाटे. सागरगोटे, गंडे, चौरस असे खेळही तिथे रंगत. सर्व खेळांचा राजा म्हणजे ‘ट्रेड’ तर तासन्तास चालत असे. (हल्ली या खेळास मोनोपली, व्यापार अशी गोंडस नावे आहेत.) या बैठ्या खेळाची कार्डे इंग्रजीत असत. तिथेही कच्चे लिंबू म्हणून माधोची लुडबुड असेच. हातातील पत्ते खाली टाकणे किंवा फासे फेकणे ‘नॉटॅठोम’ ओरडणे ही कामे ती मनापासून करीत असे. एकदा दादाच्या ‘पायधुनी माझं पायधुनी माझं’ या ओरड्याने माधो तट्टीपूसन दूर झाली. दादाच्या पाठीवर लोंबकळत तिने ते पिवळ्या पट्टीचे कार्ड हाती धरले. ‘पा-य-धु-नी- बरोबर नं दादा?’ असं तिने विचारताच सारे हसू लागले. कारण कार्ड इंग्रजीत होते. नुकताच श्रीगणेशा झालेल्या माधोचा गालगुच्चा घेत दादा म्हणाला- ‘कानांनी वाचलंस नं शहाणे? पायधुनीचे ते गुळगुळीत कार्ड गालावर घासीत ती तो कागदी नोटांचा खेळ बरंच वेळ बघत राहिली.’
    पुढे एकदा मुंबईच्या ट्रॅम कंडक्टरने ‘पायधुनी, पायधुनी’ असा ओरडा केला तेव्हा माधोने ट्रॅमबाहेर पाहिलं. पण तिला तो परिसर दादाच्या कार्डसारखा वाटलाच नाही. तिच्या चिमुकल्या मानेने वळून बघताना, तिला फक्त एक कारंजे व खूपशी कबुतरे दिसली. विदर्भात न दिसणार्‍या त्या कबुतरांची ती पायधुनी असावी. असेच तिच्या बालमनाला वाटले. ट्रामच्या खडखडाटात ती पायधुनी नाहीशी झाली होती.
    ‘आईऽऽ फोटो काढायचाय लवकर ये.’ ट्रामच्या कर्कश्श आवाजाने माधोची, माधुरी होत ती वर्तमानात परतली. फोटो प्रकरण आटोपून सर्वजण पायर्‍या उतरून परत पाय ओले करून बाहेर पडले. इतक्यात साधूसारख्या दिसणार्‍या एका माणसाने मनोहरला विचारले, ‘साब, साहेबराज देखा नही?’ स्थापन न झालेला देव, म्हणजे ग्रंथसाहेब ज्या खोलीत होता, तिथे जायचे राहूनच गेले होते. परत उन्हात इतक्या पायर्‍या चढून जायचे? या प्रश्‍नाचे पारडे हलत असतानाच, आनंदाचे पारडे जडच झाले, कारण परत पायधुनीत पाय ठेवायला मिळणार होते. या बालआनंदाला कवटाळीतच माधुरीने सरदारजींच्या देवाचे दर्शन घेतले. पोथीवर पैसे टाकतात. तसले इथे काहीच नव्हते. चवरी ढाळणारे हात थांबलेच नाहीत. पंड्यांची भुणभुणही इथे नव्हती. पुजार्‍यांची गडबड नव्हती. भिकार्‍यांची रांगही नव्हती. बाहेरच्या पायधुनीसारखेच इथे निर्मळ, शांत वाटत होते. गुरूग्रंथ साहेबराजांच्या अखंड सेवेसही मनोमन नमस्कार करून, माथा टेकवून माधुरी सर्वांसमवेत गाडीकडे परतली. परतताना पायर्‍या संपताच, पायधुनीने लडिवाळपणे तिला ‘बाय!’ म्हटलेच.
    ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरील पायधुनीचे हे अस्तित्व, स्मृतींच्या अल्बममध्ये चिकटवून माधुरी पुढील प्रवासात गुरफटली होती. ‘आत्या, आमच्याबरोबर पोहायला येणार का?’ भाचीच्या या प्रश्‍नाचे उत्तर माधुरीऐवजी तिच्या भावानेच देऊन टाकले. ‘अगं, तिला तर लहानपणापासूनच पाण्यात खेळायला आवडतं.’ आत्याचा होकार गृहीत धरून, भोपाळच्या ऑलिंपिक साईझ पूलला जाण्याचा बेत ठरला आणि माधुरीला परत एकदा पायधुनी भेटली. ‘आत्या, तुमच्या मुंबईला पण असा फुटबाथ असतो?’ भाची विचारत होती.
    ‘ओह! फुटबाथ म्हणतात का याला?’ माधुरी पुटपुटली. पायधुनीचे हे नवीन नाव म्हणजे आईला ‘ममा’ म्हणण्याइतकेच गोड आहे असे तिला वाटले. मुंबईच्या महापालिकेच्या तरणतलावाबाहेरील फुटबाथ, नेहमीच पाणीविरहित असतात. पोहण्यासाठी तलावात उतरण्याआधी, वाहत्या फुटबाथमध्ये पाय धुवून घ्यायचे- हे तत्त्व भोपाळला मात्र छानच पाळले जाते. ‘इथल्या नवाबी वातावरणाला साजेसाच हा फुटबाथ आहे हं!’ आत्या भाचीला म्हणाली. ती प्रशस्त पायधुनी माधुरीला सुखावून गेली. राजमहाली पायावर पाणी ओतण्यास दासी याव्यात, तशीच या फुटबाथची झुळझुळ होती. गुरुद्वाराबाहेरील चिरपट्टी, भोपाळच्या तरणतलावाचा फुटबाथ असे जर मुंबईतील विवाहप्रसंगी मांडवाबाहेर ठेवता आले तर काय बहार होईल नाही? अर्थात हे सारे मनातील विचार, तिने मनातच दडवले. मात्र मुंबईच्या कोरड्या, अस्वच्छ पायधुनीच्या पार्श्‍वभूमीवर, भोपाळच्या आणखी एका कॉलनीतील तरणतलावाची स्वच्छ पायधुनीही तिला आश्‍चर्यचकित करून गेली.
    प्रवास आटोपून मंडळी मुंबईस परतली. रोजचे धावपळीचे जीवन सुरू झाले होते. मात्र, मुलांच्या शाळा उघडण्यास थोडा अवधी होता. ‘आई, एकदा शेवटचे पोहून यायचे का?’ सुट्टीतील मुलांचा उत्साह बोलून गेलाच. आईच्या होकाराने, मुलांना मुंबईतील तरणतलावाच्या फुटबाथचे घाणेरडेपण खुपलेच नाही. माधुरी पोहणे आटोपल्यावर बसस्टॉपवर उभी होती. इतक्यात पहिल्या पावसाची सर आली व लगेच गेलीही! गारवा व मृद्गंध सुखावून जातो न जातो तोच परत घामाची चिकचिक सुरू झाली. बसेस भरभरून जात होत्या. परंतु नेमकी हवी असणारी बस येत नव्हती. समोरच्या फुटपाथवरील खळग्यात पाणी साचले होते. तिथे झोपडपट्टीतील बच्चे कंपनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत होती. अंगाला पाणीच न लावायला मिळणारे ते बालजीव, त्या गढूळ पायधुनीत रमले होते. त्यांचे ते नैसर्गिक आनंदीपण माधुरीच्या मनावर चित्रासारखे कोरले गेले.
    आजही पहिला पाऊस आला की, माधुरीबाईंना ते दृश्य आठवते. पुलाखालून (नव्हे, पायधुनीतून) बरेच पाणी वाहून गेले आहे. नातवंडाबरोबर पोहताना परदेशातील पायधुन्याही माधुरी आजीने पायाखाली घातल्या आहेत. मात्र अजूनही बृहन्मुंबई महानगरपालिकांच्या तरणतलावाबाहेरील पायधुन्या कोरड्या का? हा प्रश्‍न त्यांना सतावीत असतो. आजही भोपाळ व परदेशचे फुटबाथस आठवून त्या खट्टू होतात. मग सहजच त्या मनोहरपंतांना विचारून जातात, ‘अमृतसर बघायला जाऊया का?’ संमती मिळताच यात्रा कंपनीच्या जाहिरातींचा शोध सुरू होतो. अमृतसरच्या सोनेरी देवळाचे, गुरु ग्रंथसाहेबांचे त्यांना अप्रूप नसतेच! तेथील स्वच्छ पायधुनी बघण्याचीच जास्त ओढ त्यांना असते. कधी एकदा तीत पाय बुडवते. असे त्यांना होऊन जाते.

Share this article