Close

समज-गैरसमज (Short Story: Samaj-Gairsamaj)

  • अनिल माथुर
  • पूर्वी कधी अंजली ही अ‍ॅनाची नेहापेक्षा अधिक चांगली मैत्रीण होती. कॉलेजमध्ये यांचं त्रिकूट सगळ्यांनाच परिचित होतं. तिघी मैत्रिणी खूप मौजमस्ती करायच्या. नंतर त्यांचं काहीतरी बिनसलं नि अंजलीनं त्यांच्यापासून फारकत घेतली.

  • नेहाचं निमंत्रण अ‍ॅनाला मिळालं खरं, पण त्याचा आनंद व्यक्त करावा की शोक, हे तिला कळेनासं झालं. नेहानं तिला एका सरप्राइज पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. अशा पार्ट्या अ‍ॅनाला मनापासून आवडायच्या. पण… नेहानं या पार्टीत अंजलीला आवर्जून बोलावलं असणार, हे तिला पक्कं ठाऊक होतं. अन् तिला तर अंजलीला टाळायचं होतं. पूर्वी कधी अंजली ही तिची नेहापेक्षा अधिक चांगली मैत्रीण होती. कॉलेजमध्ये यांचं त्रिकूट सगळ्यांनाच परिचित होतं. तिघी मैत्रिणी खूप मौजमस्ती करायच्या. नंतर त्यांचं काहीतरी बिनसलं नि अंजलीनं त्यांच्यापासून फारकत घेतली.
    “अ‍ॅना, अगं पार्टीला जायचंय ना तुला आणि तू अजून तयारही नाही झालीस?” मम्मीनं आठवण करून दिली आणि अ‍ॅनाची विचारधारा खंडित झाली. आता आपण गेलो नाही, तर मम्मी प्रश्‍नांची सरबत्ती करेल. या सवाल-जबाबानं अजाणतेपणी जुन्या गोष्टी बाहेर पडतील. ते अ‍ॅनाला नको होतं. अंजलीनं केलेल्या जखमा उघड्या पडतील… नकोच ते. म्हणून अ‍ॅना तयार होण्यासाठी आई समोरूनच आत निघून गेली.
    अ‍ॅनाच्या अपेक्षेप्रमाणे अंजली पार्टीत आधीपासूनच हजर होती. नेहा किचनमध्ये आईला मदत करत होती. त्यामुळे अंजली समोर येताच, अ‍ॅनानं जबरदस्तीनं चेहर्‍यावर क्षीण हास्य आणलं. अंजलीने मात्र अ‍ॅनाला मिठीच मारली… आणि अ‍ॅनाच्या आश्‍चर्याला पारावार राहिला नाही.
    “आज मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. अ‍ॅना, तुला नाही कळणार ते.”
    आपल्याला भेटून अंजलीला हा आनंद झालाय, की अन्य काही कारणांनी, याचा अ‍ॅनाला अंदाज येईना. तेवढ्यात तिचं लक्ष सोफ्यावर बसलेल्या अंजलीच्या वडिलांकडे गेलं. त्यांना पाहून ती चकित झाली. त्यांनी रंगीत कुर्ता-पायजमा घातला होता… ते बर्‍यापैकी नटले होते आणि अधिकच तरुण दिसत होते. अंजलीने त्यांना हाक मारून अ‍ॅनाकडे बोट दाखवलं.
    “अरे व्वा. अ‍ॅना बेटी, ये इकडे ये. बस माझ्यापाशी. काय गं, तू तर आमचं घरच टाकलंस. मी अंजलीला विचारलं होतं. तर ती म्हणाली, तुझी नोकरी नवीन आहे. तेव्हा वेळ मिळत नाही… बरं ते राहू दे. तुझी स्कूटी नीट चालतेय ना? तिची काही तक्रार तर नाही ना?”
    “नाही अंकल, काहीच तक्रार नाही. सगळं ठीक आहे.” अ‍ॅना चाचपडत होती. अंजलीला तिच्या मनःस्थितीची कल्पना आली होती.
    “मी नेहाला किचनमधून बाहेर काढते. तोवर तू पप्पांशी गप्पा मार. ते तुझी फार आठवण काढतात.” असं म्हणून अंजली किचनमध्ये निघून गेली. आणि अ‍ॅना पुन्हा जुन्या आठवणीत रमली…
    अंजलीच्या पप्पांना अ‍ॅनाचा फार लळा होता. अ‍ॅनाच्या मनात तिच्या स्वतःच्या पप्पांच्या काहीच स्मृती नव्हत्या. लहानपणीच त्यांचं छत्र गेलं होतं. अंजलीच्या पप्पांनी दोघींनाही एकत्रच आधी सायकली आणि नंतर स्कूटी चालवायला शिकवली होती. कॉलेजमध्ये एक मुलगा अ‍ॅनाच्या फार मागे लागला होता. त्याच्यामुळे ती खूप हैराण झाली होती. अंजलीनं कधीतरी आपल्या पप्पांना याबद्दल सांगितलं आणि पप्पांनी त्या मुलाला चांगलीच तंबी दिली, तेव्हा तो अ‍ॅनाच्या वाटेला जाईनासा झाला. तिला मात्र हे सगळं नंतरच कळलं होतं. ती त्यांचे आभार मानायला गेली होती… तर त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं होतं, “अगं, मला तू अंजलीसारखीच आहेस. तुला कसलाही त्रास झाला, तर मला निःसंकोच सांगत जा.” आजही याच न्यायाने पप्पा तिला हालहवाल विचारत होते.
    अ‍ॅनाच्या मम्मीनेही अंजलीवर असाच जीव लावला होता. प्रत्येक वेळी घरी आली की, मम्मीने बनवलेले पदार्थ ती अगदी चवीचवीनं खायची. “अ‍ॅना, किती लकी आहेस गं तू! तुझ्या सुगरण आईने केलेले चविष्ट पदार्थ तुला रोज खायला मिळतात. अन् तुमचं घरही किती टापटीप असतं”, असं अंजली बोलली की अ‍ॅना मात्र मनातून सुस्कारे टाकायची. ‘मला तर तूच लकी वाटतेस. कारण तुझ्याकडे सर्व समस्यांवर तोडगा काढणारे पप्पा आहेत’, असं अ‍ॅनाला बोलावसं वाटायचं, पण ती तसं काही बोलायची नाही. आपल्यातील कमीपणाची भावना प्रत्येक माणसाला टोचणी देतच असते. त्यानुसार अ‍ॅनाने आपल्या भावनांना आवर घातला होता. पण अंजलीचं तसं नव्हतं. ती वेगळीच स्वप्न पाहत होती. दोघींमध्ये दुरावा येण्यात हीच स्वप्नं कारणीभूत ठरली होती…
    “हाय अ‍ॅना, कशी आहेस? खूप दिवसांनी भेटतोय आपण. नोकरीच्या रहाटगाडग्यात आपण किती अडकून पडलो, नाही? कॉलेजलाइफच मस्त होतं. ते मजेचे दिवस मी खूप मिस करते यार. पप्पा, तुम्ही बोअर झाला नाहीत ना? किचनमध्ये अजून तयारी चालली आहे. मम्मी आणि अंजली येतीलच एवढ्यात-”
    अ‍ॅना नेहाला अडवू पाहत होती. कारण ती नकळतपणे अंकलना ‘पप्पा’ असं संबोधत होती. पण नेहा आपल्या तंद्रीतच बोलू लागली, “…मी मम्मीला बोलले होते, आपण ही पार्टी एखाद्या हॉटेलमध्ये करू म्हणून. पण तिनं ऐकलंच नाही. घरच्या खाण्याची चवच वेगळी असते. अंजली आणि तुझ्या पप्पांनाही घरचेच पदार्थ आवडतील, असं म्हणून गप्प केलं तिने मला.” डोळे विस्फारून अ‍ॅना पाहत राहिली. ही नकळतपणे अंकलना पप्पा म्हणतेय की… आणखी काही?
    तेवढ्यात एका हातात मोठ्ठा केक आणि दुसर्‍या हातानं नेहाच्या मम्मीचा हात धरून अंजली किचनमधून प्रकटली. “सरप्राइज!” असं ओरडली. गुलाबी साडी नेसलेल्या आण्टीच्या चेहर्‍यावर अ‍ॅनाला गुलाब फुलल्यासारखे दिसले.
    “ओह, केक कापल्यानंतर मम्मी-पप्पांच्या लग्नाबद्दल मी अ‍ॅनाला सांगणार होते. पण लक्षातच राहिलं नाही. मी कधीपासून पप्पा… पप्पा बोलतेय अन् अ‍ॅना माझ्याकडे डोळे विस्फारून पाहतेय. अ‍ॅना, अगं
    मम्मी आणि पप्पांनी कालच कोर्ट मॅरेज केलं.”
    केक कापला गेला… मम्मी-पप्पांनी एकमेकांना त्याचा घास भरवला. अ‍ॅना मात्र पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन हे सारं पाहत होती. अंजलीचा मोबाईल वाजला, तेव्हा ती भानावर आली. अंजलीच्या ताईचा यु.के.हून फोन आला होता. आनंदविभोर होऊन ती ताईला लग्नाचा तपशील देत होती, “हो गं ताई, आम्ही उद्याच्या फ्लाइटने त्यांना रवाना करतोय. आता त्यांचा हनीमून तुम्ही सांभाळून घ्या.”
    लाजत लाजत आण्टी किचनमध्ये निघून गेली. अन् अंजलीही तिच्या मागोमाग मदतीसाठी गेली. हात धुण्यासाठी अंकल उठले, तसा नेहाने अ‍ॅनाकडे मोर्चा वळवला. “ताईला नं, पप्पांची फार काळजी वाटत असे. लग्नानंतर तिचं इंडियात येणं खूपच कमी झालंय. अंजलीचंही लग्न झालं तर पप्पांकडे कोण बघणार? ते अगदीच एकटे होतील. मुलींकडे राहणं त्यांना पसंत नाही. माझ्या पश्‍चात मम्मीचं काय होणार? याची चिंता मलाही वाटत होतीच. अगं, आताही कधी मी बाहेर जेवणार असेन ना, तर ही स्वतःसाठी काहीच बनवत नाही. दूध, नाही तर एखादं फळ खाऊनच दिवस काढते. अशा स्थितीत अंजलीनं माझ्यासमोर या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नाही म्हणण्याचा प्रश्‍नच नव्हता! पण काम सोपं नव्हतं. आम्हा दोघींना आपापल्या मम्मी-पप्पांना हे पटवून द्यायला, किती मिनतवार्‍या कराव्या लागल्या… किती वचनं द्यावी लागली… अटी मानाव्या लागल्या. अखेरीस दोघांनी हो म्हटलं. खरंच अ‍ॅना, आयुष्यात पहिल्यांदाच केवढं बरं वाटलं म्हणून सांगू. बघ अ‍ॅना, पालकांनी मुलांवर कितीही जीव ओवाळून टाकला ना, तरी त्यांचंही खासगी आयुष्य असतंच गं! त्यावर फक्त त्यांचा नि त्यांचाच अधिकार असतो. तसं पाहिलं, तर त्यांचं वयही काही फार झालेलं नाही. शिवाय उतारवयातच प्रत्येकाला जीवनसाथीची खरी गरज अधिक असते. हे लग्न ठरल्यापासूनच मम्मी-पप्पांच्या चेहर्‍यावर जी रौनक आली आहे ना, ती पाहून त्यांना मनातून किती आनंद झालाय, याची कल्पना आली आम्हाला-” एवढं लांबण लावल्यावर नेहाच्या लक्षात आलं की, आपल्यालाही मदतीसाठी किचनमध्ये जायला हवं. बोलणं मध्येच थांबवून ती आत निघून गेली.
    नेहाचं बोलणं ऐकून अ‍ॅनाला भूतकाळ आठवला. हाच प्रस्ताव अंजलीने तिच्यासमोरही ठेवला होता… तेव्हा ती किती उखडली होती. “असा विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा? अन् तो माझ्या पुढ्यात ठेवण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आपल्या मैत्रीचा तू असा गैरफायदा घेशील, अशी कल्पनाही नव्हती मला.” असं बरंच काही तिने अंजलीला सुनावलं होतं. कित्ती वर्षांचे मैत्रीचे बंध तटातट तोडून अ‍ॅना घरी निघून आली होती. खरोखरच तिला आपल्या मम्मीच्या सुखाची पर्वा नव्हती का? ‘तुझा आनंद, सुख कशात आहे? तू काय करू इच्छितेस?’ असं तिने मम्मीला कधी विचारलंच नव्हतं. आपण एवढे स्वार्थी कसे झालो? आपण आता घरी निघून जावं, असं अ‍ॅनाला प्रकर्षानं जाणवू लागलं. खिन्न मनानं ती जेवत राहिली, गप्पागोष्टी करत राहिली. त्या चौघांचेही चेहरे आनंदाने फुलून आले होते. त्यांच्या आनंदाने तिला समाधान लाभत होतं, तरी अपराधीपणाची भावना तिच्या मनात टोचत राहिली.
    घरी आल्यावर ती सुन्नपणे बसून राहिली. “ही सरप्राइज पार्टी कशाबद्दल होती गं?” मम्मीने तिला भानावर आणलं.
    “अंजलीचे पप्पा आणि नेहाच्या मम्मीच्या लग्नाची पार्टी होती”, असं बोलून तिने मम्मीच्या नजरेला नजर भिडवली.
    “फारच चांगलं झालं. दोन घरात सुख-शांती आली.” मम्मीच्या या सहज उत्तरानं अ‍ॅना दुखावलेल्या स्वरात म्हणाली, “अंजलीनं हाच

प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. पण मी तो धुडकावून लावला. मी तुझी अपराधी आहे गं मम्मी.”
“अगं, पण पुन्हा संसारात रमण्यात मला अजिबात रस नाही. मी तर… मी…”
“हं… बोल नं मम्मी”, अपराधीपणाचा भार थोडा हलका झाला, म्हणून अ‍ॅनाचं मन हलकं झालं.
“ते… विश्‍वास अंकल आहेत नं…”
“हं… म्हणजे त्यांच्याशी?…” अ‍ॅनाच्या चेहर्‍यावर नाराजी उमटली. विश्‍वास अंकल म्हणजे अ‍ॅनाच्या आजोबांच्या मित्राचा मुलगा. त्यांचं अ‍ॅनाच्या घरी येणं-जाणं होतं.
“नाही… नाही… तुझा गैरसमज होतोय. अगं त्यांना तर मी लहानपणापासून भाऊ मानलंय… त्यांना असं वाटतंय की मी पुन्हा माझ्या पहिल्या प्रेमात रममाण व्हावं.”
“पहिलं प्रेम?… काय बोलतेस तू मम्मी?… तुझ्या जीवनात पप्पांव्यतिरिक्त आणखी कोणी?…”
“अगं बाई, जरा दम धरशील का? चुकीचे तर्क लढवू नकोस. माझं पहिलं प्रेम म्हणजे, रंगमंच. विश्‍वासना वाटतंय की, लग्नाआधी मी ज्याप्रमाणे नाटकात कामं करायचे, तशी पुन्हा करावीत. त्यांना माझ्या वाढत्या वयाची सबब सांगितली, तर म्हणाले की मला डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी काही पात्रं लिहिली आहेत. ती साकार केली, तर माझी भूमिका महत्त्वाची असेल. अभिनय क्षेत्रात सेवानिवृत्तीचं कोणतंही वय नसतं. किती तरी वयोवृद्ध कलाकार अजूनही कामं करताहेत… तुझ्या पप्पांना माझं नाटकात काम करणं आवडायचं नाही… तू त्यांचंच रक्त आहेस. तरी पण अ‍ॅना… मी पुन्हा नाटकात काम करायला सुरुवात केली, तर तुला आवडेल?…”
“नक्कीच मम्मी… मला खूप आवडेल. खूप आनंद होईल मला. तुला माझी आवड निवड, माझ्या आनंदाची केवढी काळजी आहे गं… अन् मी… सदैव माझ्याच विश्‍वात दंग राहिले… मम्मी…” आईला घट्ट मिठी मारून अ‍ॅना हुंदके देऊन रडू लागली… मम्मीच्याही डोळ्यात पाणी आलं.

Share this article