Close

सूड (Short Story: Sood)

  • नीलता
    प्लान तर मस्त केला होता… आता त्याची अंमलबजावणी होत होती. ठरवल्याप्रमाणे यामिनी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. उदय स्वप्न पाहत होता. इकडे सचिनच्या डोक्यातही वेगळाच प्लान ठरत होता. काय होता तो प्लान?… या धंद्यामध्ये मित्रापेक्षा शत्रूच जास्त असतात. त्यामुळे आता इथे नक्की काय घडेल, याचा काही पत्ता नव्हता.

  • त्या दिवशी उदयची पत्नी यामिनी हट्टाने गाडी चालवत होती. त्याने तिला परोपरीने समजावलं की, “यामू तुझी तब्येत ठीक नाही. तू ड्रायव्हिंग करू नकोस.” पण यामिनी ऐकणारी नाही, हे त्याला माहीत होतं. त्याचाच त्याने फायदा घ्यायचं ठरवलं. त्याने एकाला कामाचे पैसे दिले होते… एक हप्ता… कामाची आखणी झाली होती.
    उदय म्हणाला, “हे बघ नरेंद्र, खरं तर मी तुला ओळखत नाही. सुपारीची बातमी तुला कशी लागली, हेही मला माहीत नाही. तू स्वतःच तुझ्या बिनबोभाट कामाची लिस्ट मला ऐकवली आहेस.”
    “मग?”
    “मग काय? माझं काम बिनबोभाट होणं महत्त्वाचं.
    त्या कामाचा एक हप्ता देतोय.”
    “हूं.”
    उदयला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते…
    शत्रूला यामिनीच्या गाडीखाली संपवायचं होतं आणि
    त्या भयंकर प्रकाराने यामिनी मनोरुग्ण बनलीय असं सिद्ध करायचं होतं. त्यासाठी डॉ. सचिनची मदत मिळणार होती. घटस्फोट मिळवायचा आणि मित्र, डॉक्टर सचिनच्या बहिणीशी, हिमांगीशी लग्न करायचं… हा प्लान होता.
    वा! प्लान तर मस्त केला होता… आता त्याची अंमलबजावणी होत होती. ठरवल्याप्रमाणे यामिनी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. उदय स्वप्न पाहत होता. इकडे सचिनच्या डोक्यातही वेगळाच प्लान ठरत होता. काय होता तो प्लान?… या धंद्यामध्ये मित्रापेक्षा शत्रूच जास्त असतात. त्यामुळे आता इथे नक्की काय घडेल, याचा काही पत्ता नव्हता.
    रात्रीची सुनसान वेळ, सुनसान रस्ता… उदय आणि यामिनी एका पार्टीहून घरी जात होते. यामिनीने प्रमाणापेक्षा थोडी जास्तच घेतली होती. कारण उदयने तिला प्यायला भाग पाडले होते. तरी ती भान ठेवून म्हणत होती… “उदय पुरे. आता मी पिणार नाही आणि तूही बस कर. आपल्याला घरी जायचं आहे,
    हे विसरू नकोस.”
    तर उदय म्हणत होता, “डोण्ट वरी डार्लिंग. मी आहे ना?”
    “तरी नको, बस झालं. मला गाडी चालवायची आहे.”
    “आता एकच. आणि गाडी मी चालवीन.”
    असं करत करत स्वतःचं भान राखत तो यामिनीला बेभान करत होता.
    नंतर दोघे निघाले. नेहमीप्रमाणे यामिनीच ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. उदयचे एक काम झाले होते. यामिनी रस्त्यावर लक्ष ठेवून गाडी चालवत होती. पण उदयचे लक्ष मात्र वेगळ्याच ठिकाणी होते. दोघांचे लक्ष्य वेगळे होते.
    ठरलेला रस्ता, ठरलेले ठिकाण,
    ठरलेले वळण आले. क्षणात नाट्य घडणार होते. तो क्षण आला होता.
    यामिनीच्या डोळ्यावर झापड येत होती. हात घामेजत होते. तिने ठरवलं होतं की, हे वळण पार झालं की ड्रायव्हिंग सीटवर उदयला बसायला सांगायचं. आपण आराम करायचा.
    यामिनीची गाडी या स्थितीतही जोरात होती. तिने वेग कमी न करताच डाव्या बाजूला गाडी वळवली. उदय ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता, तोच हा क्षण होता. क्षणात सारे घडणार… आणि क्षणात सारे घडलेच. वळणावर दोन माणसं पायी चालली होती. त्यातील एकाला एकाने ढकलले. तो सरळ गाडी खालीच आला. दुसराही कडमडत मागच्या चाकाखाली आला.
    एकाच गाडीखाली एकदम दोघांचा मृत्यू! अशी ही पहिलीच घटना असावी! त्या प्रकाराने उदयही चक्रावला. सुपारी एकाचीच होती मग हे दोन जण कसे? गाडीच्या दिव्यांच्या प्रखर प्रकाशातही त्यांचे चेहरे नीट समजले नव्हते. त्यातील एक तर शत्रू असणार होता… दुसरा कोण… मारेकरी असेल? नक्की काय घडलं, हे मात्र या क्षणी तोही सांगू शकत नव्हता. तरी त्याला एक बरं वाटलं की, निदान साक्षीदार तरी उरला नाही.
    यामिनीला तर पाठीमागे काय प्रकार घडला ते समजलंच नाही. कारण किंकाळी उमटण्यापूर्वीच तिची गाडी 100-150 फूट पुढे आली होती. गाडी कडेला घेत तिने थांबवली. खाली उतरत ती म्हणाली, “उदय आता गाडी तू चालव. पण पाठीमागे काहीतरी घडलं काय? माझा मेंदू बधिर झालाय. चल आपण पाहू या.”

“हो, यामिनी पाठीमागे दोन जणांच्या अंगावर तू गाडी घातलीस. तरी मी तुला सांगत होतो. पण तू…”
“बापरे! दोन जण! उदय मागे चल. त्यांना ताबडतोब मेडिकल ट्रीटमेंट मिळायला हवी.”
“नको. ते मेले असतील. आपण सरळ घरी जायला हवे. चल बस लवकर… पोलीस केस होईल.”
ती बसली. तिचा मेंदू आता विचार
करू लागला होता… हे असे कसे झाले? आपण एवढे प्यायलो का? पण उदय तर…
सुपारी दिल्यामुळे पोलीस केस
झाली नाही. गाडीची चाके रात्रीच साफ केली गेली. रस्त्यावरील टायरचे निशाण मिटवले गेले. ठरल्या वेळी त्याने नरेंद्रला ठरलेला दुसरा हप्ता दिला होता. उदयला नरेंद्र जरा विचित्रच वाटत होता. उदयने त्याला विचारलेही, “नरेंद्र, काम व्यवस्थित पार पडलेय ना?”
त्यावर त्याने उलट प्रश्‍न केला होता, “का? तुम्हीच तर सार्‍याचे साक्षीदार होतात ना? मग?”
“मी?… मी साक्षीदार?” उदयने घाबरून विचारले. वर म्हणाला, “अरे, केस मिटवायची आहे. तर इथे गुन्हेगार, आरोपी, साक्षीदार वगैरेंचा प्रश्‍नच कुठे येतोय? नाहीच येत
मग? आणि नरेंद्र आता तुझा चेहरा असा का दिसतोय?”
“कसा?”
“आरशात पाहिलं नाहीस का?
बघ, कसा भेसूर दिसतोय ते?”
“साहेब, आरशात पाहायची गरज संपलीय.”
“म्हणजे?”
“ही सारी सुपारीचीच कृपा.”
“म्हणजे?”
“जाऊ द्या ना साहेब. तुमचे काम झालेय ना? मला माझा पुढचा हप्ता द्या. तुम्ही मोकळे… मी मोकळा.”
“हो, देतो. हे घे पैसे. काम नीट झालंय ना? नंतर पोलिसांची कटकट सुरू होणार नाही ना?”
“साहेब, या मामल्यात तुम्ही नवखे आहात. म्हणून असे प्रश्‍न विचारताय. साहेब, एक तर आमच्यावर भरवसा ठेवायचा, नाही तर स्वतःच काम उरकायचं. नाही तर या फंदातच पडायचं नाही.”
“ठीक आहे. पुढचा शेवटचा हप्ता, पुढल्या आठवड्यात. ये तू.”
“हं.” तो गेला.
उदय वैतागला. मनात चिडला. मलाच शहाणपण शिकवतोय! ते काही असलं, तरी त्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्याने दुसर्‍या दिवशी यामिनीला म्हटलं, “मिनी, कालच्या अपघातातील ती दोन्ही माणसं… जागेवरच गेली.”
“काय? ते गेले? उदय तरी मी तुला कालच म्हणत होते ना की त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेऊ या. त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची ताबडतोब गरज होती. हे सारं उदय तुझ्यामुळेच घडलंय. तू माझं ऐकलं असतंस,
तर त्यांचे प्राण वाचले असते.
त्यांच्या मृत्यूला तूच… तूच जबाबदार आहेस. उदय तुझ्या हातून-दोन दोन खून झालेत.”
“यामिनी, उगीच काहीतरी बोलू नकोस. गाडी तर तूच चालवत होतीस.”

“हो, मला मान्य आहे की गाडी मी चालवत होते. माझ्या हातून मोठी चूक झालीय… मोठा गुन्हा घडलाय. पण खून तर नाही झाला. त्यांच्या मृत्यूला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस.”
आता तर हे उलटंच होत होतं. तीच त्याच्या डोक्यावर हॅमरिंग करत होती. तिच्या दृष्टीने तिचं खरं होतं. त्याच्याचमुळे ते मृत्यू पावले होते.
तो खुनी होता. आता तर ती त्याला उघड उघड आव्हान देत होती की,
“तू खुनी आहेस. तू दोन-दोन खून केलेस. अशा खुनी माणसाबरोबर
मी राहू शकत नाही. तुझा काय नेम! तू उद्या माझाही खून करशील… मला घटस्फोट हवाय.”
खरं तर, त्याला तेच तर हवं होतं! त्यासाठी तो तिला मनोरुग्ण ठरवणार होता. आता ही घटस्फोटाची गोष्ट त्याच्या मनासारखी जरी होणार होती, तरी ती त्यासाठी त्यालाच खुनी सिद्ध करणार होती. न जाणो त्यासाठी ती काहीही करेल… केस ओपन करेल. ते त्याला परवडण्यासारखं नव्हतं. त्याला एक खुनी म्हणवून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे त्याचं सारं स्वप्नच पुसलं जाणार होतं. हिमांगीने त्याला स्वीकारलंच नसतं.
यामिनीचा मनस्वी स्वभाव त्याला माहीत होता. प्रत्येक वेळी ती त्यालाच गौण, दुय्यम ठरवत आली होती. तिचा स्वभाव कुणाचेच न ऐकण्याचा, हट्टी होता. त्या स्वभावाचाच तो फायदा उठवणार होता. डॉक्टर सचिन हा त्यांचा फॅमिली मेंबरच होता. शिवाय नामांकित मनोरुग्ण डॉक्टरही होता. तिला मनोरुग्ण ठरवण्यात तो मित्र डॉक्टर सचिनची मदत घेणार होता. पण बाजू त्याच्यावरच उलटण्याची लक्षणं दिसत होती.
तरी तो हार मानणार नव्हता.
मानून चालणार नव्हतं. त्याने यामिनीला सचिनची ट्रीटमेंट सुरू केली. सचिन म्हणाला, “यामिनी,
ती दोन माणसं तुझ्या गाडीखाली आली, हे तर बरोबर?”
“हो, पण…”
“तुझ्या हातून खून झालेत, हेही
खरे.” तो मनोरुग्ण पेशंटशी बोलावं, तसं तिच्याशी मुद्दाम बोलत होता. तिला शब्दात अडकण्याचा प्रयत्न करत होता.
ती म्हणाली, “डॉक्टर, ती दोन माणसं मी गाडी चालवत असताना माझ्या गाडी खाली आली, हे जरी खरं असलं तरी त्यांचा मृत्यू उदयमुळेच झालाय,
हे पक्कं. खुनी तो आहे… मी नाही. शिवाय रस्त्याच्या वळणावर गाडी वळली, तेव्हा प्लानिंग करूनच एकाला दुसर्‍याने गाडी पुढे ढकललं, हे तर स्पष्ट आहे. पण त्याने त्याला, ढकलणार्‍याला धरून ठेवल्यामुळेच तोही गाडी खाली आला. तरीही ते दोघं वाचू शकले असते, पण उदयमुळेच ते मृत्यू पावलेत, हे खरं आहे. म्हणजेच उदय खुनी आहे.”
ती वकिली पॉइंटने आपले मुद्दे बरोबर मांडत होती. वकिलापुढे डॉक्टर फिका पडत होता. तरी डॉक्टर आपला मुद्दा तिच्या गळी उतरवायचा प्रयत्न करत होता. तेव्हा मात्र तिने त्याला खडसावत स्पष्टपणे म्हटलं, “हे पाहा सचिन, मला या प्रकरणात गोवून मनोरुग्ण ठरवायचा हा प्लान आहे… आणि त्यात तुमचाही सहभाग आहे. ही गोष्ट मला माहीत आहे, हे तुम्हाला माहीत नसेल.” यामिनी आपला मुद्दा, मोजून-मापून शब्द वापरून व्यवस्थितपणे मांडत होती. शेवटच्या तिच्या वाक्याने डॉक्टरच हडबडला.
तो गडबडीने म्हणाला, “यामिनी,अगं काही तरीच काय! तुला मनोरुग्ण ठरवायचं कारणच काय? आणि उदयच्या प्लानमध्ये मी?… यामिनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.”
“गैरसमज तुमचा होत असेल, डॉक्टर. त्या दोघांपैकी एक जण हा उदयचा शत्रू असणार, हे तर नक्कीच. त्याच प्रमाणे दुसरा माणूस हा तुमचा
काटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”“माझा काटा? म्हणजे… माझा शत्रू?”
“होय. तुम्ही उदयच्या प्लानमध्ये स्वतःचंही काम उरकून घेतलं…
असंही असेल.”
“नाही यामिनी, असं काही नाही.”
“ते आता कॅमेर्‍यामध्येच स्पष्ट होईल. पण…”
“कॅमेरा? कसला कॅमेरा?”
“तेही त्याच वेळी स्पष्ट होईल. सचिन, मला माहीत होतं की वळणावर हे असं होणार आहे. पण मला माहिती मिळण्यात चूक झाली. नक्की वळण कोणतं ते मला नीट समजलं नाही. ते वळण पार झाल्यावर मी ड्रायव्हिंग सीट उदयला देणार होते. म्हणजे सारं चित्रच बदललं असतं.”
“यामिनी, म्हणजे?” आत येत उदयने विचारले.
शांतपणे यामिनी म्हणाली, “का? उदय तू सुपारी देऊ शकतोस, तर मीही गुप्तहेर ठेवू शकते. हो ना?”
“सुपारी? कसली सुपारी?”
“कसली नाही. कुणाची म्हण?”
“मी कशाला कुणाची सुपारी देऊ?”
“ते तुलाच माहीत… आणि मलाही.”
“उदय, तुम्हा दोघांचा खेळ संपलाय. आणि स्वतःला मनोरुग्ण म्हणून तुम्हीही यातून सुटू शकत नाही. आणि समज उदय, सचिनने तुला यातून सोडविण्यासाठी मनोरुग्ण शाबीत केलंच, तर मला तुझ्यापासून घटस्फोट सहज मिळू शकतो. पण तुझं हिमांगीशी लग्न होणं कठीण होईल आणि तू मनोरुग्ण ठरू शकला नाहीस तर गुन्हेगार, खुनी ठरशील. बघ निर्णय तूच घे.”
“यामिनी उगाच काहीतरी बोलू नकोस. मी… मला…”
“मी… मी… मम करू नकोस. उदय तू एक विसरतोयस… दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा शेवटी स्वतःसाठीच खणलेला असतो. तुझी दोन्हीकडून हारच झाली.”
हा सारा प्रकार एवढा विचित्र बनला होता की, खरंच उदय दोन्ही बाजूने पराभूत झाला होता.
एकदा तो गाडीने कामावरून घरी परतत होता. रात्र वाढली होती. थंडीचा कडाका जाणवत होता. थकव्यामुळे त्याच्या डोळ्यावर झापड येत होती. त्या गावाहून काम उरकून निघता निघताच त्याला उशीर झाला होता. थंडीचे दिवस असल्याने दिवस लवकर मावळत होता. आता त्याचं गाव 50-55 किलोमीटरवर राहिलं होतं.
त्याने त्याची गाडी एका धाब्यासमोर उभी केली. बाकावर तीन ट्रक ड्रायव्हर पंजाबी भाषेत मोठमोठ्याने बोलत चहा पीत होते. त्याने पलीकडचा बाक पकडला. लगेच एक पोरगा मळकट फडक्याने टेबल पुसत समोर आला. त्याने विचारलं, “क्या लोगे साब?”
“एक स्पेशल कडक चाय दो.”
त्याने तेथूनच आरोळी ठोकली,
“एक स्पेशल.”


ते मळके फडके खांद्यावर टाकून तो गेला. त्याच पावली हातात गरम चहाची कपबशी घेऊन आला. त्याने ती टेबलावर ठेवली आणि निर्विकारपणे पुढच्या गिर्‍हाइकाकडे वळला. चहा चांगला होता. गरम होता. त्याला त्याची गरज होती. त्याने चहाचा आस्वाद मनापासून घेतला. तोवर पोरगा परत आला. कपबशी उचलून मळक्याच फडक्याने टेबल पुसत म्हणाला, “दस रुपया साब.”
त्याने वीस रुपये त्याच्या हातावर ठेवत म्हटले, “उपरकी चिल्लर तेरे
पास रखना.”
दहा रुपयाच्या चहाला दहा रुपयांची टीप! पोरगा खूष झाला. त्याने साहेबाला खूष होऊन दहा रुपयांचा सलाम ठोकला. शीळ घालत उदय गाडीत येऊन बसला. खरं तर त्याला गाडीतच चहा मागवता आला असता. पण तेवढेच त्याला पाय मोकळे करायचे होते.
आता त्याच्या गाडीने वेग घेतला होता. अंतर वेगाने पार होत होतं. रस्ता मोकळा होता. गाव… घर जवळ येत होतं. तासाभराचं अंतर उरलं होतं. गारठा फार वाढला होता. दोन वळणं पार केल्यावर सरळ रस्ता लागणार होता. त्यातील एक वळण तेच होतं… ते सुपारीचं वळण!
त्या आठवणीने… त्या कल्पनेने त्याला उगीचच धडधडू लागलं. हाताला घाम सुटला. ब्रेकवरचा पाय लटपटू लागला. त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. त्याने खिडकीची एक काच खाली केली. त्याचं लक्ष सहज समोरच्या आरशात गेलं… मागच्या सीटवर नरेंद्र बसलेला त्याला दिसला. त्याला तो दिसला! नरेंद्र! नरेंद्रला तिथे पाहून त्याला फार चीड आली. ते वळण यायला आणि तो दिसायला एकच गाठ पडली होती. आधीच त्या आठवणीने बेचैन झालेल्या उदयने त्याला वैतागून विचारलं, “तू? तू इथे का आलास?”
खरं तर तो गाडीत कसा आला? हाच प्रश्‍न त्याला पडायला हवा होता.
त्याच्या प्रश्‍नावर नरेंद्र नुसताच हसला. उदय म्हणाला, “उद्या तुला तुझा शेवटचा हप्ता मिळणारच होता ना? एवढा धीर नाही का?”
“मला पैसे नकोत. मी तुला माझ्याबरोबर न्यायला आलोय.”
तो ‘साहेब’ वरून एकदम एकेरीवर आला होता. त्यामुळे उदयला त्याचा आणखीनच राग आला. त्याने विचारलं, “मला कुठे नेणार आहेस? मला नाही कुठे जायचं?”
“समोरचं वळण बघ.”
“माहीत आहे.”
“तेच ते वळण… तुझ्या बायकोमार्फत तू माझ्याकरवी त्याला मारलंस. त्या सचिन डॉक्टरने तिथेच मला संपवलं. तुम्ही दोघांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. मीही तेच करणार आहे.”
“काहीतरी बोलू नकोस.”
“उदय मेलेली माणसं खोटं बोलत नाहीत.”
“का?… काय?… काय म्हणालास? मेलेली?…”
“हो. आता तू आणि तुझा तो डॉक्टर सचिन याच वळणावर… तुझ्याच गाडीखाली मरणार आहात. तो डॉक्टर…”
“नाही, असं होणार नाही.”
तोच ते वळण आलं. एक माणूस, बाईकवाला एकदम मध्ये आला. उदयच्या गाडीचा स्पीड अचानक वाढला. काही समजायच्या आतच त्याची बाईक उदयच्या गाडीखाली आली. हवेत एक भयानक किंकाळी विरली. सारं शांत झालं. उदयच्या कानी शब्द आले… “आता
तुझी पाळी.”
“का… काय? का… का… सॉ…”
उदयच्या गाडीची गती जास्त होतीच. त्यातच तो बाईकवाला मध्येच आल्याने… त्या भयानक प्रकारामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला होता. गाडी वेडीवाकडी भरकटू लागली होती… गाडी धाडकन रस्ता दुभाजकाच्या उंच भिंतीवर आदळली. स्टिअरिंग व्हील त्याच्या छातीत घुसलं. तो गेला! जागीच गेला!
त्याचाच बेफिकीरपणा त्याच्याच जिवावर बेतला. धाब्यावर चहा घेऊन निघाल्यावर त्याने बेल्ट बांधला नव्हता. आता थोडंच अंतर राहिलंय. रस्ताही मोकळा आहे, असा विचार त्याने केला होता आणि नेमकं होऊ नये तेच झालं होतं.
शेवटी काय झालं? सूड कुणी कुणाचा घेतला? केलं तुका आणि झालं माका! असं झालं. तो का गेला? बेल्ट न बांधल्याने? नाही! यामिनीमुळे? माहीत नाही. पण सुडाला सुडाचं उत्तर मिळालं असावं.

Share this article