Close

सुगंधा (Short Story: Sugandha)

  • लता वानखेडे
    निशीच्या लक्षात आलं की, सर्व काही डॉक्टरांच्या हातात आहे. तिने ध्रुवला एका चांगल्या डॉक्टरांना दाखविले. त्याच्या या स्थितीवर कोणता तरी उपाय असेल, याची तिला आशा होती. पण शेवटी सर्व काही नियतीच्या हातात असते. आपण सर्व नियतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्या आहोत. जसं नियती नाचवेल तसं आपण नाचायचं.

डिसेंबर महिन्याची गुलाबी थंडी. सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत, गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत निशी बागेत बसली होती. प्राजक्तांच्या फुलांचा बहर, गुलाबी गुलाबांचा दरवळ आसमंतात अजूनच नशा आणीत होता. निशी आज खूप आनंदात होती. तिचे आवडते गीत ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्द रूप आले मुक्या भावनांना’, ती ऐकत होती. तिचेही मन जणू झोपाळ्यावर झुलत होते. ती तारुण्याच्या उंबरठ्यावर होती. राजकुमार येणार आणि विमानात बसवून आपल्याला परदेशी घेऊन जाणार, अशी स्वप्नं रंगवीत होती.
सुमतीबाई आणि सुशीलराव यांची एकुलती एक मुलगी निशी. सुंदर, हुशार अन् लाडकी. सुशीलरावांचा एक छोटासा व्यवसाय होता. याबरोबरच सामाजिक कार्य करण्याची आवडही त्यांना होती.
निशीसाठी दोन-तीन स्थळं त्यांनी पाहिली होती. पण पदवीधर झाल्याशिवाय विवाह करायचा नाही. असं तिचं ठाम मत होतं. हे तिचे शेवटचे वर्ष होते. ती परीक्षेची तयारी करत होती.
‘अग, पण फोटो तरी पाहून घे एकदा. बघ हा मुलगा अमेरिकेत असतो.’ असं म्हणत सुमतीबाईंनी तिच्यासमोर मुलाचा फोटो ठेवला. अमेरिकेचे नाव घेताच निशीने मुलाचा फोटो व बायोडेटा पाहिला. मुलगा खूप सुंदर तर होताच, शिवाय अमेरिकेत इंजिनिअर असल्यामुळे तिचा चेहरा आनंदाने अधिकच फुलला होता.
‘मग काय बोलवू का त्यांना आपल्या घरी?’ या प्रश्‍नावर तिने स्मित करून आपली मूक संमती दर्शविली.
पंधरा दिवसातच निशीचा विवाह ध्रुवसोबत थाटामाटात पार पडला आणि ती विमानाने अमेरिकेला भुर्रकन उडून गेली. तिने ध्रुवसह एका नवीन जीवनात, एका नवीन भूमीवर पाय ठेवला होता. या नवीन भूमीशी, धु्रवशी एकरूप होण्याचा ती प्रयत्न करू लागली. पण ध्रुव तिच्याशी पूर्णपणे समरस होऊ शकत नव्हता. तिच्यापासून अलिप्त राहण्याचा तो प्रयत्न करी. नंतर जे समजलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ध्रुव तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता. वरून संपूर्ण दिसणारा पुरुष आतून असा? नियतीने डाव साधला होता? निशीभोवती संपन्नतेचे सर्व सुख होते. पण या दिखाव्याचा काय फायदा?
निशी हुशार होती. तिने ध्रुवला एका चांगल्या डॉक्टरांना दाखविले. त्याच्या या स्थितीवर कोणता तरी उपाय असेल, याची तिला आशा होती. पण शेवटी सर्व काही नियतीच्या हातात असते. आपण सर्व नियतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्या आहोत. जसं नियती नाचवेल तसं आपण नाचायचं.
निशीच्या सासूच्याही काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. आपल्या मुलाच्या नशीबावर ती अश्रू ढाळीत होती. ध्रुवचा एक मित्र अमर नेहमी घरी यायचा. तो निशीसोबत अधिक बोलायचा. अमर आला की, धु्रव तिथून निघून जायचा. धुवला वाटायचे, निशीने अमरशी विवाह करावा. पण निशीवर असे संस्कार नव्हते. तिचे ध्रुववर मनापासून प्रेम होते. सात जन्मी हाच पती मिळू दे, असं म्हणणार्‍या भूमीतली ती लेक होती. पतीचे अस्तित्व तिच्यासाठी
महत्त्वाचे होते.
तिची परीक्षा घेण्यासाठी म्हणूनच
की काय नियतीने तिच्या जीवनात असे वाकडे फासे टाकले होते.
पाहता पाहता अमेरिकेत येऊन तिला एक वर्ष झाले. अनेक उपचार करून झाले, पण धु्रवबाबत कोणतीच आशा नव्हती. निशी आपल्या मुलाला सोडून जाईल, म्हणून तिच्या सासुने तिचा व्हिसा लपवून ठेवला होता.
‘निशी, एक वर्ष झालंय तुमच्या लग्नाला. आता तरी मला नातू दे.’ तिच्या सासुबाई बोलल्या.
‘मम्मी हे काय बोलत आहात. तुम्हाला माहित आहे नं?’
‘पण मला वंशाचा वारस हवाच.


तू अमरशी…’
‘मम्मी हे तुम्ही काय बोलत आहात? वांझपणाचं शल्य मी आयुष्यभर बाळगेन, पण असलं काही करणार नाही. लाखमोलाची इज्जत गमावल्याचं दुःख घेऊन मी जगू शकणार नाही. सीता पतिव्रता म्हणूनच अग्नीपरीक्षा देऊ शकली. तुम्हीजे बोलत आहात ते अमेरिकेत चालत असेल पण भारतात नाही. आम्हाला आमच्या सुखापेक्षा आई-वडीलांचे संस्कार जास्त प्रिय आहेत. मला हा वाईट मार्ग तुम्ही दाखविला याचंच मला वाईट वाटतंय.’
ती खूप रडली. पण तिला समजून घेणारं कोणीच तेथे नव्हतं. ध्रुव मनाचा खूप चांगला होता. त्याचं निशीवर खूप प्रेम होतं.
‘निशी, हे घे.’ ध्रुवने तिच्यासमोर तिचा व्हिसा टाकला.
‘ध्रुव हे काय आहे?’
‘तुझा व्हिसा. तू भारतात परत जा. मी लवकरच तुला डिव्होर्स देईन. तू दुसरं लग्न कर आणि सुखी संसार कर.’
‘काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी जर बाळाला जन्म देण्यास असमर्थ असते तर तुम्हीसुध्दा हेच केलं असतं का? तुम्ही काळजी करू नका. या नीरस आणि एकाकी जीवनातून बाहेर पडण्याचा मार्ग मला मिळालाय.’
अमेरिकेत आल्यानंतर निशीची भारतीशी ओळख झाली होती.
ती अनाथ मुलांना सांभाळते. तिची स्वयंसेवी संस्थेने अशा अनेक बेघर अनाथ मुलांना त्यांचं विश्‍व मिळवून दिलंय. भारतीच्या संपर्कात आल्यानंतर निशीच्या आशा पल्लवीत झाल्या. योग्य वेळ साधून याबद्दल ती ध्रुवशी बोलणारच होती. पण धु्रवने वेगळा मार्ग निवडायची भाषा केल्यानंतर तिला हे त्याच वेळी सांगावं लागलं. आधी तिला वाटलं धु्रवचा याला विरोध होईल. पण धु्रवने अगदी हसतहसत याला संमती दिली आणि शेवटी तो दिवस उजाडला.
निशी आणि ध्रुव भारतीच्या अनाथश्रमात आले. तिथे कितीतरी सुंदर गोंडस बाळं होती. हसरी, गोड गुलाबाच्या फुलासारखी एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली. तिच्या आगमनाने जणू घरात सगळीकडे आनंदाचा सुगंध पसरला होता. म्हणूनच ती सार्‍यांची सुगंधा झाली आणि धु्रव आणि निशीचं जीवन सुगंधाने न्हाऊन निघालं.

Share this article