काही स्वप्नांतून आपणास काही सूचना मिळते, संदेश मिळतो, कशाची तरी चाहूल लागते. पण मला या स्वप्नाचा आजही ना अर्थ समजला आहे, ना त्यातून काही संदेश, संकेत मिळाला आहे.
13 ऑगस्ट 2008ची अपरात्र. वेळ साधारण 2 वाजून 20 मिनिटांची. मी एक स्वप्न पाहिलं. विचित्र आणि भयावह! माझी सवय आहे की, कोणतंही नोंद करण्याजोगं स्वप्न पाहिलं की जाग आल्यावर लगेच टिपून ठेवायचं. कारण
सकाळी उठल्यावर ते नीट, सुसूत्रपणे काहीच स्मरत नाही. जिवाला मात्र उगीचच बेचैनी येते, म्हणूनच मी त्याच वेळी ते टिपून ठेवलं होतं. ते स्वप्न होतं, हे जाग आल्यावरच समजतं. पण स्वप्नात मात्र ते सत्याचाच भास देतं. काही स्वप्नांतून आपणास काही सूचना मिळते, संदेश मिळतो, कशाची तरी चाहूलही लागते. याचा मी खूप अनुभव घेतला आहे. पण मला या स्वप्नाचा आजही ना अर्थ समजला आहे किंवा त्यातून काही संदेश, संकेत मिळाला आहे. ते हे स्वप्न!
मी, माझ्या तीन-चार मैत्रिणींसह प्रभू रामचंद्राच्या मंदिरात चालले होते. रस्ता अनोळखी, लांबलचक, सरळ होता.
मंदिर लांब होतं, तरी आम्ही चालतच निघालो होतो. चालता चालता मी मध्येच थबकले. मी मैत्रिणींना म्हणाले, ‘जरा थांबा, मी आलेच. त्या खालच्या आजींचा आशीर्वाद घेऊन येते.’
त्यांनी विचारलं, “ए… कोण आजी? इथे कोण आहे तुझ्या ओळखीचं? काही नको.” पण तोपर्यंत मी पायर्या उतरायला लागले होते. तिथे रस्त्याच्या कडेला दगडी,
रुंद अशा सत्तावीस पायर्या होत्या. मी त्या उतरून खाली अंगणात आले. हो, तिथे घर होतं. खाली अंगण होतं. अंगणात एक सत्तरीची स्त्री उभी होती. नऊवार लुगडं नेसलेली, केसाचा अंबाडा बांधलेली, हातात काचेच्या बांगड्या घातलेली. मला पाहून म्हणाली, “बरं झालं हो तुम्ही आलात आम्हाला भेटायला. इथं कुण्णी कुण्णी येत नाही हो.”
“हूं.” मी म्हटलं.
मला कळेना की, खाली उतरून या न पाहिलेल्या स्त्रीला भेटावं, असं मला तरी का वाटावं? या बाई कोण? त्यांचा आणि माझा संबंधच काय? त्यांचा आशीर्वाद घ्यायची मला काय गरज? मी इथे का यावं?
त्या बाईंचा तो रडका स्वर ऐकून मलाच वाईट वाटलं. त्यांनी मला आत त्यांच्या घरात नेलं, ते घर जुन्या पद्धतीचं, मातीचं, दगडाचं होतं. भिंती जाड होत्या. भिंतीत मोठं कोनाड होतं. तिथे त्या बाई, त्यांचा नवरा, त्यांचे दोन मोठे मुलगे आणि त्यांच्या सासूबाई, एवढी माणसं होती. एक कामवाली अन् वरकामाला एक मुलगा होता. सगळे एकत्रच राहत होते.
एक मुलगा चाकाच्या खुर्चीवर बसला होता, तर दुसरा एका कोपर्यातून टुकूटुकू पाहत होता. नवरा आणि सासू खाली जाडजूड सतरंजीवर बसले होते. बाईंनी मला आणखी आत नेलं. त्यांच्या मागून अंधारातून जाताना मला भीती वाटत होती. ती अंधारी खोली अडगळीची होती. त्या खोलीमध्ये सारं मोडकंतोडकं सामान होतं. त्यानंतर त्या बाहेर आल्या. त्यांच्या पाठोपाठ मीही बाहेर आले. त्या वेळी मला थोडं मोकळं वाटलं. त्या घरात त्यांचं स्वयंपाक घर मात्र दिसलं नाही किंवा त्यांनी ते दाखवलं नसेल. सगळंच विचित्र. मी पटकन खाली वाकून त्या बाईंना नमस्कार केला आणि वर निघून आले. मैत्रिणींबरोबर चालू लागले. त्या बाई खालून वर पाहत होत्या.
त्या घरात त्या बाईचा वृद्ध नवरा होता. वृद्ध सासू होती. तरी मी फक्त त्या बाईंनाच नमस्कार का केला, माहीत नाही. मी मैत्रिणींबरोबर चालत होते. त्या काय काय बोलत होत्या. काहीतरी विचारत होत्या. तरी मी मात्र त्या घरात त्या बाईतच गुंतले होते.
आम्ही राम मंदिरात पोहोेचलो, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. मनाला खूप शांत वाटलं. त्याच्या पुढे नतमस्तक झाले. त्यांचा आशीर्वाद लाभलाय, असं मला वाटलं, प्रदक्षिणा घालून क्षणभर विसावून आम्ही परत फिरलो.
कसं असतं ना! आपण मंदिरात जातो. परमेश्वराचं दर्शन घेतो. आपण म्हणतो की, “देवळात, खूप गर्दी होती; पण देवाचं दर्शन मात्र खूप चांगलं झालं.”
म्हणजे काय? आपण मंदिरात जाऊन परमेश्वराचं मुखावलोकन करतो. त्याला नजरेत साठवून घेतो. परंतु, त्या मूर्तीतील परमेश्वराला मनात साठवून ठेवत नाही. त्यातील निराकाराशी तादात्म्य पावत नाही. तरी मूर्ती दर्शनाने समाधान पावतो, हे सत्य आहे. असो.
तर आम्ही प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेऊन परत निघालो. परतीचा तोच रस्ता होता. वाट तीच होती. त्याप्रमाणे वाटेत मघाचं घरही लागलं. फरक एवढाच होता की, ते घर मघाशी उजव्या हाताला होतं, तेच आता डाव्या हाताला लागलं होतं.
मला काय झालं माहीत नाही. पुन्हा त्या घराची ओढ कशी लागली तेही माहीत नाही. मी मैत्रिणींना म्हणाले की, “हे पहा, तुम्ही पुढे गेलात तरी चालेल. मी त्या बाईंना भेटणार आहे. तिला कुणीच भेटायला जात नाही. दुःखी
आहे ती.”
त्यावर त्या चिडून म्हणाल्या, “वेडेपणा करू नकोस. संध्याकाळ होऊन गेलीय. घर लांब आहे. उगीच या वेळी खाली उतरू नकोस.”
“अगं वेडेपणा काय त्यात? मघाशी त्या बाईंशी
नीट बोलता नाही आलं, म्हणून मी खाली जातेय. मी सांगितलं ना? तुम्ही खरंच जा. माझ्यासाठी तुमचा खोळंबा नका करू.”
“अगं कोण ती? तुझ्या नात्याची का ओळखीची?”
“अगं. अशीच होते ना ओळख? बिचारी… दोन मुलगे; पण दोन्ही अंध आणि अपंग. येते मी.”
त्यांना पुढे काहीही बोलू न देता एका अनामिक ओढीने मी त्या दगडी पायर्यांवरून खाली पोहोचले. वरून मैत्रिणी मला हाका मारत होत्या.
त्या बाई बाहेर अंगणात बंब पेटवत होत्या. मला
पाहून त्या छान हसल्या, मला बरं वाटलं. त्या म्हणाल्या, “बाई, माझी मुलं खरं तर चांगली धडधाकट होती. हुशार होती, पण त्यांच्यावर कुणीतरी करणी केली आणि त्यांचं हे असं झालं. बाई माझ्या एका मुलाला पायलट व्हायचं होतं; पण नाही जमलं. मग तो एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला लागला. त्याच्या गाडीला अपघात झाला. त्यात त्याचे पाय गेले.” मी त्या खुर्चीतील मुलाकडे पाहिलं.
बाई म्हणाल्या, “मला सांगा, हा करणीचाच प्रताप नव्हे काय? तेव्हापासून हा चाकाच्या खुर्चीवर आहे. एके संध्याकाळी आमच्या इथंच एक मेलेला कावळा येऊन पडला. तो प्रथम माझ्या दुसर्या मुलानं पाहिला.”
“काय कावळा?”
“हो. त्याला पाहताच माझा दुसरा मुलगा अंध झाला.”
“बापरे!”
“मग, ही करणीच नाही का?”
यावर मी काय बोलणार? तरी माझ्या मनात आलंच की, आता संध्याकाळ उलटत आहे, तर या वेळी यांनी बंब का पेटवावा? मला ते जरा विचित्रच वाटलं. एव्हाना बंब धडधडून पेटला होता. त्यातून ज्वाळा वरपर्यंत जात होत्या. मला ते सारं अशुभ, अघोरी वाटत होतं. मला वाटलं मैत्रिणींचं ऐकायला हवं होतं.
बंबात ढलप्या टाकताना बाई म्हणाल्या, “करणीचे मूठभर केस आणि मूठभर टाचण्या अजून घरात पडल्यात.”
“काय घरात?”
त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. त्यांची नजर मला भेसूर वाटली. बंबातून ढलप्या फुटल्याचे फट् फट् आवाज येत होते. ज्वाळांचा लालसर प्रकाश बाईंच्या तोंडावर पडला होता. त्यांचे डोळे भयानक वाटत होते. चेहरा खुनशी वाटत होता. मला आता त्या बाईंचीच भीती वाटू लागली होती.
मी चाचरत विचारलं, “ते सारं घरात का ठेवलंय?”
त्यावर त्यांनी कुत्सित हसत विचारलं, “ते घरात कोण ठेवेल? पण ते पाण्यात कोण सोडणार? घरात आम्ही वृद्ध आणि मुलगे हे असे.”
“हूं.”
“तुम्ही करता हे काम?”
“मी… म… मी?”
“हो. तुम्हीच. का? काय हरकत आहे?”
“नाही, तसं नाही. पण तुम्ही ते सारे जाळून का नाही टाकत या बंबात?”
त्या शांतपणे म्हणाल्या, “केस जळतील हो, पण टाचण्या? त्याचं काय? त्या तापून वितळतील. त्यांचा आकार बदलेल, गोळा होईल; पण त्या नष्ट होणार नाहीत.” त्यांचं बोलणं सत्य आणि सडेतोड होतं.
त्यांनी पुन्हा विचारलं, “सांगा, तुम्ही करताय हे काम?”
“मी? पण तुम्ही कुणाला पैसे देऊन हे काम का नाही करवून घेत?”
त्या त्यांचा मुद्दा न सोडता म्हणाल्या, “मी तेच तर म्हणतेय. मी देते पैसे तुम्हाला, करता हे काम तुम्ही?” त्यांनी माझा मुद्दा माझ्यावरच उलटवला होता. मला वाटलं होतं तेवढी ती बाई सरळ साधी नव्हती, हे माझ्या लक्षात आलं होतं.
मी विचारलं, “मी कसं करणार हे काम? मी तुम्हाला कुठे फारशी ओळखते?”
“त्यात ओळखीपाळखीचा प्रश्न येतोच कुठे?” यावर मी गप्पच. तोच भयानक प्रकार घडला.
धडाडणार्या बंबाच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केलं होतं, घराने पेट घेतला होता. सर्वत्र जाळ, धूर पसरला होता. काही दिसत नव्हतं. त्या अघटित प्रकाराने मी खूप घाबरले. साहजिकच होतं ते.
स्वप्नातही आपण विसरतो की, ते सारं स्वप्न आहे.
त्या घटनेशी आपण एकरूप झालेलो असतो. ती घटना आपण अनुभवत असतो. माझंही तेच झालं. काय करावं, ते मला सुचत नव्हतं. धूर नाकात तोंडात जात होता. गुदमरायला होत होतं. वर पळत सुटावं, हेदेखील सुचत नव्हतं. तोच कानावर मोठ्याने हसण्याचा आवाज आला. तो आवाज त्या बाईचाच होता. त्या क्रूर, खुनशी हसत होत्या. भीतीने माझी घाबरगुंडीच उडाली होती.
आता धूर थोडा कमी झाला होता. मी पाहिलं सारेच त्या दगडी पायर्यांवरून वर पळत होते. तो अपंग मुलगाही धडाधड पायर्या चढत होता. दुसरा अंध मुलगा डोळे मिटून धावत होता. ती वृद्ध सासू तर सर्वांत पुढे होती. म्हातारबाबाही या स्पर्धेत पळत होते. मी मात्र ज्वाळांनी वेढलेल्या घरात सापडले होते. वरून त्या सर्वांच्या भेसूर हसण्याचा आवाज येत होता. मी त्यांना पाहत होते.
मला वर जायचं भानच उरलं नव्हतं.
मी त्या बाईंना सरळ साधी समजत होते. मुद्दाम त्यांच्याकडे त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले होते आणि
या माया नगरीत सापडले होते. दगडी पुतळ्यासारखी मी अचल उभी होते. त्यांची करणी माझ्यावरच उलटली होती.
का उलटवली होती?
जराशानं आग शांत झाली. धूर नाहीसा झाला. घरची माणसं पुन्हा त्यांच्या जागी होती. त्या बाई बंबात सरपण घालत होत्या. त्याच्या ठिणग्या उंच उडत होत्या. कमालच झाली. त्या बाई माझ्याशी मोकळेपणाने बोलत होत्या. काय काय सांगत होत्या. जणू मघाचं स्वप्न(?) होतं. त्यातील एक ठिणगी माझ्या अंगावर उडाली आणि मला जाग आली. स्वप्न संपलं होतं.
जागी झाल्यावरही त्या भयानकतेची दाहकता भय निर्माण करत होती. काय असेल त्या स्वप्नाचा अर्थ? ते स्वप्नच का सत्याचा एक भयावह अनुभव?
अशीच मी एकदा मॉलमध्ये खरेदीसाठी गेले असताना त्या गर्दीत मला एक बाई दिसल्या. त्याच त्या. मी 13 ऑगस्ट 2008च्या स्वप्नात पाहिलेल्या. त्या गर्दीतही मी त्यांना ओळखलं होतं आणि विशेष म्हणजे, त्याही माझ्याकडे पाहून ओळखीचं हसत होत्या. त्यांच्या त्या हसण्याने मला घाम फुटला होता.