- दीपा मंडलिक
कितीही वेळा म्हटलं तरी आदित्य ती जुनी कळकट, आतील सावरीच्या कापसाचा भुगा खोळीच्या छिद्रातून पाडून, रोज गादीला अभिषेक घालणारी उशी टाकून द्यायला तयार होत नव्हता. आधीच अपूर्वा त्या भुगा पाडणार्या उशीला वैतागली होती. आणि आता या घाईच्या वेळेला तिने केलेल्या प्रतापाने चिडून अपूर्वाने तिरीमिरीत ती चक्क प्लॅस्टिकमध्ये भरून कचर्याच्या डब्याला खेटून ठेवून दिली.
फिसमधून आल्याबरोबर कधी नव्हे ते अपूर्वा घरकामाला भिडली. घरभर पडलेला पसारा जो तिला कधीच दिसत नसे, तो आज तिला अगदी डोळ्यात खुपायला लागला. टेबलावर, सोफ्याच्या पायाशी ‘आ’ वासून आपल्याला उचलून घेण्याची वाट पाहत असलेले चहाचे कप, कोंडवाड्यातून सुटका झाल्यागत कप्प्याबाहेर इतस्तः पसरलेले चपला व बुटांचे जोड, जमिनीवर अंग टाकलेली वर्तमानपत्रं, खुर्च्या, टेबल, सोफा, टिपॉय यावर अवैध घुसखोरी करून डेरा जमवणारे दमट कपड्यांचे बोळे… पसार्याने घरात पसरलेले हात-पाय बघून तिला आदित्यचा राग येऊ लागला.
“सकाळी ऑफिससाठी त्याच्यापेक्षा दोन मिनिटं लवकर घर सोडावं लागतं. आवरायला वेळच कुठे असतो मला… पण याला काय होतंय हाताबरोबर दोन मिनिटात पसारा आवरून घ्यायला.”
तिने रागाने पर्स सोफ्यावर भिरकावली. सभोवतालच्या ब्रम्हांडाकडे नजर टाकली आणि मग उसासा सोडत घड्याळाकडे पाहिलं. बरोबर एका तासाने अपूर्वाची मामेबहीण तिचा नवा संसार बघण्याच्या इच्छेने त्यांच्या घरी धाड टाकणार होती. एरवी कोणी येणार असलं, तर आजकालच्या पद्धतीप्रमाणे आदित्य आणि ती त्यांना बाहेरच्या बाहेरच जेवायला घालून घालवून देत असत. पण अमेरिका स्थित मंजू, लग्नाला येऊ शकली नसल्याने खास तिथली भेटवस्तू घेऊन, त्यांनी नुकताच मांडलेला संसार बघायच्या हट्टाने यायला निघाली होती. त्यामुळे तिचं स्वागत घरीच करणं भाग होतं.
एमबीए केलेल्या हुशार अपूर्वाने अगदी स्मार्टली वरवर झाकपाक करत बाहेरील खोली आवरली आणि ती बेडरूम आवरायला गेली. घडी विस्कटलेली पांघरुणं पटापट बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंबून चादर झटकायला घेतली. ती झटकताच भुसभुशीत पावडरचा सडा जमिनीवर पडला. तिच्या कपाळावर आठी आलीच. त्या पावडरला कारणीभूत असणार्या आदित्यच्या उशीकडे तिने रागाने बघितलं. कितीही वेळा म्हटलं तरी आदित्य ती जुनी कळकट, आतील सावरीच्या कापसाचा भुगा खोळीच्या छिद्रातून पाडून, रोज गादीला अभिषेक घालणारी उशी टाकून द्यायला तयार होत नव्हता. आधीच अपूर्वा त्या भुगा पाडणार्या उशीला वैतागली होती. आणि आता या घाईच्या वेळेला तिने केलेल्या प्रतापाने चिडून जाऊन अपूर्वाने तिरीमिरीत ती चक्क प्लॅस्टिकमध्ये भरून कचर्याच्या डब्याला खेटून ठेवून दिली. मंजू वेळेवर आली
आणि गोड गोड बोलून, कौतुकाने न्हात, पाहुणचार झोडून निघूनही गेली. एक संध्याकाळ छान साजरी झाली. अपूर्वाने आदित्यला शहरभर पिटाळून संपूर्ण इंडियात मिळणारे खासम खास पदार्थ तिला खाऊ घालून तृप्त करून सोडलं.
तिला बाय वगैरे करून
आल्यावर निजायची वेळ झाली, तेव्हा आदित्य त्यांच्या नव्या फ्लॅटमधील पसारा दडवायला केलेल्या लाकडी कपाटांची वेगाने उघड्झाप करताना अपूर्वाला दिसला.
“काय रे, काय झालं?” फोनमध्ये डोकं खुपसलेल्या
तिने विचारलं.
“माझी उशी कुठे दिसत नाहीये.”
“कुठली?… ती सावरीच्या कापसाचा भुगा पाडणारी
कळकट उशी?”
“अपूर्वा तिला नावं ठेवायची गरज नाही हं…”
“नावं?… नावं कुठे ठेवतेय मी… मी तर रियालिटी सांगतिये.”
“असू देत… कुठे आहे
माझी उशी?”
“ती जाऊ दे… ही नवी
घे आजपासून…”
“पण माझी नेहमीची उशी कुठे आहे? मला तीच लागते.”
“फेकून दिली मी कचर्यात…” यावर त्याचे आश्चर्यचकित झालेले डोळे आणि रागावलेला चेहेरा
बघून नाही म्हटलं तरी अपूर्वा
जरा चरकली.
“अरे, नुसता सावरीचा भुगा घरभर सांडत होता. आपल्या कामवाल्या निर्मला मावशीही किरकिर करायच्या… म्हणून टाकून दिली. ही सिंथेटिक उशी वापरून बघ… मस्त आहे. साध्या कापसाच्या उशांसारखी वाकडी-तिकडी होत नाही… स्वतःचा आकार अगदी टिकवून ठेवते हं.”
“नाही… माझ्या उशीशिवाय मला झोप नाही येणार… मान आखडते माझी, दाखव कुठे टाकली आहेस?”
“आदित्य, तूही कमालच करतोस हं… अरे आत्ताच नाही का जाता जाता कचरा शूट केला… त्यातच होती ती… आता इतर कचर्याशी आनंदाने झिम्मा-फुगडी घालत असेल तुझी उशी.”
रागाने धुसफुसत आदित्य नवी सिंथेटिकची उशी डोक्याखाली घेऊन त्या रात्री झोपला. पण त्याला झोप कुठची येतीये! सारखा थोड्या-थोड्या वेळाने जागा होऊन उशीला दाबून उलट-सुलट करून झोपायचा प्रयत्न करत होता. उशीने कसं त्यावर विसावलेल्या डोक्याचं वजन आणि आकारासह त्याला सामावून घ्यावं. प्रसंगी थोडं झुकतं घेऊन दबून राहावं… पण ही दोन फूट उंच उशी आपला आकार न बदलण्याच्या तोर्यात सारखं आदित्यच्या डोक्याच्या पडलेल्या दाबाचा उपयोग करून घेत दुप्पट दाबाने त्याचं डोकं बाहेर फेकत होती. उशीकडून रात्रभर चाललेली अवहेलना सहन न होऊन पहाटे-पहाटे त्याने बदला घेत, ती जमिनीवर भिरकावून दिली आणि उठून बसला. त्याचा परिमाण व्हायचा तोच झाला. झोप पूर्ण न झाल्याने दिवसभर ऑफिसमध्ये तो जांभया देत राहिला. ऑफिस वैतागलं, कारण आदित्यकडून ताशी वीस या वेगाने येणार्या जांभयांची लागण अख्ख्या ऑफिसला झाली. आणि त्यामुळे झालं असं की, चहावाल्या तंबीची वर्दळ ऑफिसमध्ये दिवसभर चालू राहिली.
घरी गेल्यावर झोपायच्या वेळेलाच त्याला कालच्या जागरणाची आणि उशीची आठवण झाली. आता रात्र झाल्याने उपयोग नव्हता. ‘उद्या एखादी पातळ कापसाची नवी उशी विकत आणायची’ हा निर्धार करून तो आडवा झाला. ती रात्रही त्याने कुसा बदलत जागेपणीच काढली. नंतर मात्र अगदी आठवणीने कधीही फारसा संबंध येत नसणारं गाद्या-उशांचं दुकान अपूर्वा आणि आदित्यने गुगल सर्चच्या मदतीने शोधून काढलं. ‘उशी’ म्हणताच दारातच एकावर-एक रचलेल्या अडीच-तीन फूट टंम्ब फुगलेल्या सिंथेटिक कापूस भरलेल्या उशांच्या मनोर्याकडे दुकानदाराने बोट दाखवलं. दोघांनीही मान हलवली आणि साध्या कापसाच्या उशीची मागणी केली. त्या वेळी दुकानदारासह मनोर्यातील एकूण-एक उशी त्याच्याकडे तुच्छतेने बघत असल्याचा भास आदित्यला झाला.
“तयार उशी नाही मिळणार… ऑर्डर देऊन बनवून घ्यावी लागेल… आता सगळा रेडीमेड, इम्पोर्टेड जमाना आहे साहेब, देशी कापसाच्या उश्या कोणी वापरत नाहीत.” दुकानदार अनिच्छेने पुटपुटला.
नवर्याच्या होणार्या हालाची जबाबदारी घेत अपूर्वा पुढाकार घेत म्हणाली, “साधारण किती दिवस लागतील बनवायला… म्हणजे काय आहे की, याला ना झोपच लागत… नाहीये रात्रीची?”
थोड्या चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पाहत दुकानदार म्हणाला, “एक हफ्ता तरी लागेल…”
“बापरे एक हफ्ता… लवकर नाही मिळणार का? किंवा एखादी तयार असेल तर बघा ना.”
“असला तर मी कशाला ठेवून घेऊ… विकायलाच बसलोय मी…” बडबडत दुकानदार आत वळला. पाच-सात मिनिटात एक उशी झटकत त्याने बाहेर आणली.
“घ्या… ही गिर्हाइकासाठी बनवली होती… पण तुम्ही घेऊन जा.”
लोकांसाठी बनवलेली उशी आपण कशी न्यायची, या विचारात घुटमळत असणार्या त्या दोघांकडे बघत दुकानदाराने उशी अपूर्वाच्या हातात सरकवत म्हटलं, “सस्तात लावून देतो बहन, घेऊन जा. पाचशे रुपयात देतो.”
“काय… पाचशे रुपये… अहो, यात कापूसच भरला आहे नं की सोनं…” आदित्य किंचाळला. त्यावर त्याचा हात दाबत अपूर्वा कानाशी पुटपुटली, “असू दे रे… तुझ्या झोपेपेक्षा पाचशे रुपये जास्त नाहीत.”
आदित्य सकाळी उठला तेव्हा, ‘उशीपेक्षा दगड बरा’ असं म्हणायची वेळ त्या पाचशे रुपयांच्या कोंबून कापूस भरलेल्या पट्टेरी उशीने त्याच्यावर आणली. मानेतून निघणारी बारीकशी कळ दिवसभर ऑफिसमध्ये त्याला उशीची आठवण करून देत राहिली. त्या दिवशी ऑफिसमध्ये एकाच विषयाचं चर्वित-चर्वण झालं, ते म्हणजे ‘उशी’. चुरस लागल्यागत गत पीडितांचे अनुभव आणि उपाय कथन झाले. कोणाच्या तरी काकूने उंच उशी डोक्याखाली रात्रभर घेतली, त्यामुळे मेंदूला नीट रक्त पुरवठा झाला नाही, म्हणून ती आता सतत हसत असते म्हणे… इथपासून ते मान हलवीत ‘होय’ आणि ‘नाही’ म्हणायची सोयही माझ्या मामांना उशीमुळे राहिली नाही, ते ताठ मानेनेच ‘हो’, ‘नाही’ म्हणतात आणि त्यांच्या या निर्विकारपणामुळे काही लोक त्यांना संत समजून गळ्यात हार घालायला लागले आहेत… इथपर्यंत एक-एक प्रकरण आणि उपप्रकरण ऐकून आदित्य चांगलाच भांबावला.
त्याला धीर देत उत्साही लोकांनी लगेच ‘उश्या पिडीत’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. ग्रुपवरून झालेल्या सूचनांच्या भडिमारानुसार झोपताना आदित्यने कधी चादरीची घडी डोक्याखाली ठेव, तर कधी टॉवेलमध्ये कपडे भरून त्याची घडी डोक्याखाली ठेव, कधी सोफ्याच्या उश्या घे… असले ग्रुपवाल्यांना सुचतील तेवढे उद्योग करून बघितले; पण झोप काही मिळाली नाही. एकाने सुचवली म्हणून त्याने तीन हजार किंमतीची मेमरी फोमची उशी ऑनलाइन मागवून घेतली. ती महागडी असण्याचं कारण… त्या उशीवर असलेले थंडगार कोरफडीच्या लगद्याचं आवरण, डोक्याचं तापमान शरीरापेक्षा दोन अंशाने कमी ठेवत असे, शिवाय डोक्याच्या ठेवणीची मेमरी जपत डोकं टेकवताच तसा आकार त्यातील फोम धारण करत असे. डोक्याला पूर्ण कवेत घेणार्या या वैशिष्ट्यपूर्ण उशीचे अफलातून रिव्ह्यू वाचून अतिशय आशेने आदित्यने ती आल्या रात्रीच डोक्याखाली सरकवली. पण कशाचं काय… कोरफडीच्या गार लगद्याने मारलेल्या घट्ट मिठीने त्याचं डोकं चांगलंच थंड पडलं आणि थोड्याच वेळात त्याला इतक्या मुंग्या आल्या की, ‘उशी नको; पण मुंग्या आवर’, असं म्हणायची वेळ त्याच्यावर आली.
आज ऑफिसमध्ये फार महत्त्वाची मिटिंग होती. कंपनीला बिझनेस मिळवून देणारी बाहेरची मोठी पार्टी येणार होती. दुपारच्या जेवणानंतर त्यासंबंधीची तयारी करण्यासाठी मिटिंग बॉसने बोलावली होती. काम मिळवणं, हा बॉसचा जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने, तो जरा टेंशनमध्ये होता. त्यात मिटिंगला सुरुवात होताच पोटात पडलेलं अन्न आणि मिळालेला विसावा, यांनी आपली कामगिरी चोख बजावली. साठून राहिलेल्या झोपेने आदित्यचा कब्जा घेतला. जीव तोडून बॉस करत असलेल्या सूचना त्याच्या कानापर्यंत येऊन विरू लागल्या. पेंग अनावर होऊन त्याचे डोळे लागले. नंतर किती वेळ झाला कोणास ठाऊक; पण बॉसच्या गर्जनेनेच तो खडबडून जागा झाला. जाग आली, तेव्हा बॉस मेमो देण्याच्या गोष्टी बोलू लागला होता आणि त्याचे कलीग स्तब्ध होऊन त्याच्या तोंडाकडे नजर लावून बसले होते. एक-दोघा उश्या पीडितांनी मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला, तसा बॉस आणखीच चिडून फोन उचलत सेक्रेटरीला मेमो टाइप करून आणायला सांगू लागला. आदित्यचे धाबे चांगलेच दणाणले. झोपेचा अंमल पार पळाला. माफी मागत त्याने कशीतरी बॉसची समजूत घातली. बॉसने उट्ट काढत त्याला आजच्या आज संपवायचं ढीगभर काम दिलं. बिचारा काम संपवून रात्री उशिरा घरी पोहोचला. त्याचा पडलेला चेहेरा आणि लाल झालेले डोळे बघून अपूर्वाचा जीव कासावीस झाला. त्यात आज ऑफिसमध्ये घडलेली हकिकत ऐकून ती कळवळलीच.
जेवण करून बसला असताना एक उशी आपल्याला जीवनात कोणते दिवस दाखवू शकते, याचाच विचार त्याच्या मनात व्यापून राहिला होता. थोड्या तिरीमिरीत आणि रागानेच तो उठला आणि हॉलमधील दिवाणावरील तक्क्या उचलून बेडरूममध्ये आला. ‘च्यायला, काय व्हायचं ते होऊ दे. आज उशीचं नाव काढणार नाही. त्या ऐवजी हा तक्क्याच घेऊन झोपणार!’ या निर्धाराने तक्क्या डोक्याखाली सरकवत तो झोपला. तक्क्याने आपलं काम
यथायोग्य बजावलं.
तो झोपेतून उठून बसला, तेव्हा मानेवर खडा… अंहं खडा नव्हे, नि त्याचा बापही नव्हे, तर खड्याचा खापर… खापर पणजोबा, म्हणजे मोठ्ठे धोंडेराव ठेवल्यागत त्याची अवस्था झाली होती. त्या ओझ्याने छातीवर विसावलेली हनुवटी जागा सोडायला तयार नव्हती. त्यामुळे जमिनीशिवाय कोणाशीही नजर भिडवायची त्याला छाती उरली नव्हती. ऑफिसमध्ये सकाळीच येणार्या पार्टीचं स्वागत त्याला करायचं असल्याने, स्वतःची मान ताठ करण्याच्या भानगडीत न पडता हा मराठी मनुष्य झुकत्या मानेनेच ऑफिसला पोहोचला.
विमानतळावरून बॉस परदेशी पाहुण्यांना घेऊन ऑफिसच्या दाराशी आला, तेव्हा हनुवटी छातीला भिडवून, वटारलेल्या लाल डोळ्यांनी तिरका बघत एका हाताने आदित्य हातातील पुष्पगुच्छ पाहुण्यांच्या समोर करत होता. मानेच्या दुखण्याने चेहर्यावरील हास्य गायब झालं होतं. त्यामुळे तेव्हा तो अगदी थेट रागाने बेभान झालेल्या आणि कधीही चाल करून येईल अशा रेड्यासारखा दिसत होता. दारातच असल्या प्रकारचा माणूस बघून आलेले पाहुणे चार पावलं मागेच सरकले. त्या गडबडीत बुटांचे पाय कचकन एकमेकांच्या पायावर पडले आणि बॉससह सगळेच कळवळले. त्याच दिवशी पाहुणे असेपर्यंत आदित्यला सक्तीच्या रजेवर पाठवून दिलं गेलं. आपला काय दोष आहे, हे न कळल्याने दुखर्या मानेने आणि मनाने चिडचिडत तो घरी आला. येऊन बसतोय, तोच बेल वाजली. बघतो तो सोसायटीचे सेक्रेटरी दोन-चार अनोळखी लोकांसह समोर हजर होते. खाली मानेनेच त्यांचं स्वागत करत आदित्यने त्यांना सोफ्यावर बसण्याची खूण केली. मंडळींनी हातातील एक पत्रक त्याच्या सुपूर्द केलं. हसून त्यातील एका तगड्या गृहस्थाकडे हात करत सेक्रेटरी सांगू लागले, “हे आपले… ते… हे आपल्याकडे 703 मध्ये राहायला आलेले सज्जन. त्यांच्या गावचे पैलवान आहेत. सात वेळा बॉडी बिल्डिंगचा किताब जिंकला आहे त्यांनी. सध्या ते…”
प्रत्येक बोटात जाडजूड अंगठ्या नि कडं घातलेल्या पीळदार हातानेच सेक्रेटरींना थांबण्याचा इशारा करत, “दम घ्या साहेब, मी सांगतो पुढलं.” म्हणत जरब असलेल्या घोगर्या आवाजात त्या सज्जनांनी सांगायला सुरुवात केली, “आपली एक समाजशेवी संस्था आहे. मुक्या प्राण्यांसाठी काम करते. घरात कोणी ससा, कासव, उंदीर असे प्राणी किंवा तोता, मैना, कबुतर, लवबर्ड पाळून त्यांचा छळ केला किंवा कोंबडी, बकरी मारायला घरात आणल्याचा सुगावा लागला, तर त्यांना चांगली समज देण्याचं काम आमची संस्था करते.”
दंडाच्या बेंडकोळ्या वरखाली करत त्यातील दुसरा एक पैलवान सदृश गृहस्थ खुनशी हसत म्हणाला, “त्यांच्या पुनर्वसनाचं कामही आम्ही करतो.”
“साहजिकच आहे म्हणा…
तुम्ही समज दिल्यानंतर त्या
माणसांना पुनर्वसनाची गरज लागणारच,” आदित्य म्हणाला.
“काय थट्टा करताय साहेब. माणसांच्या नाही, आम्ही प्राण्यांच्या पुनर्वसनाच्या गोष्टी सांगतोय. तुमच्या ऐकण्यात-पाहण्यात असला काही प्रकार आला, म्हणजे प्राणी घरात आणल्याचा, तर कळवा. चांगली समज देऊन सपाट करू एकेकाला आणि हो…”
“त्यासाठी पावती फाडा आणि समाजकार्यात मदत करा.” त्यातील एक ओरडला.
समज देऊन सपाट करण्याच्या समाजकार्याला मदत… हा विचार मनात येत असतानाच “ओह सॉरी… सॉरी… या मानदुखीने काही सुधरत नाहीये. काय बोलतोय, ते माझं मलाच कळत नाहीये. माणसांचं पुनर्वसन, नाही मुक्या प्राणी-पक्षांचंच म्हणायचं होतं मला.” एका साध्या कोमल उशीने तोंड, छाती, मान सगळं एक झालेल्या आदित्यने या दणकट माणसांकडून समज मिळण्याच्या दारुण अवस्थेला सामोरी न जाण्यासाठी भीतीने जीभ चावत म्हटलं. त्यातील एक जण पावती पुस्तकासाठी बॅगमधील सामानाची उचक-पाचक करत असताना मुख्य, 702 वाला शोकेसचं निरीक्षण करण्यात गुंतला होता. “साहेब हे कसं काय? म्हणजे, गणेशदेव, बुद्ध, येशू आणि मक्का-मदिनाचा फोटू एकाच फळकुट्यावर… कुस्तीचा फड जमलाय जणू… राग येऊ देऊ नका. उत्सुकता वाटली म्हणून विचारलं.”
“अहो, कुस्तीचा फड नाही, संमेलन आहे ते… आणि राग कसला त्यात. धर्म माणसांनी तयार केलेत. मी माणुसकीचा पुरस्कार करतो, म्हणून सगळ्या धर्मांचा आदर करतो आणि गंमत म्हणजे, आम्ही सगळ्यांचे सण साजरे करतो. म्हणजे, बघा ख्रिसमस… दिवाळी… ईद…”
त्यादरम्यान पावती पुस्तक सापडत नसल्याचं लक्षात येताच, या प्राणी-पक्षी मंडळींना माणुसकीच्या गोष्टी ऐकण्यात रस राहिला नव्हता. आदित्यला मध्येच तोडत, “नंतर पावती पाठवून देतो साहेब. निघतो आम्ही. काळजी घ्या.” या दटावणीच्या सुरात निरोप घेत
मंडळी निघून गेली.
त्याच वेळी अपूर्वा आनंदाने
घरात शिरली. तिच्या हातात बर्याच पिशव्या होत्या. पिशव्या टेकवत उत्साहाने तिने बोलायला सुरुवात केली,
“अरे आदित्य, तुझा मानदुखीचा आणि झोपेचा प्रॉब्लेम आता संपलाच समज… ही बघ तुला खास उशी आणली आहे, कमी जाडीची आणि अगदी वेगळ्या मटेरियलची. गळ्याच्या शपथा घेत
घेत त्या दुकानदाराने, म्हणजे उद्योजकाने ‘ही आयुर्वेदिक उशी
सगळ्या समस्या संपवेल’ असं सांगितलं आहे. त्याचे इतके फायदे सांगितले
त्या खेड्यातून आलेल्या नव उद्योजकाने की, मी माझ्यासाठीही एक उशी घेऊनच टाकली.”
“कुठे भेटला हा नव उद्योजक?” त्यातील एक पातळ उशी हातात घेत, आदित्यने विचारले.
“स्वदेश मेला…”
“अं… काय म्हणालीस…
कोण मेला…”
“उगा थट्टा करू नकोस…
स्वदेशी वस्तूंचा मेळा भरला आहे.
त्यात बर्याच युनिक वस्तू आहेत. त्यातलीच ही एक.”
जेवण झाल्यावर हातात नवी उशी घेऊन आदित्य निजायच्या खोलीत गेला. त्याने पलंगावरील उशांच्या ढिगाकडे पहिलं. डोकं फेकणारी सिंथेटिक उशी, कापसाची दगडी उशी, कोरफडीच्या लगद्याचं आवरण असलेली मेमरी फोमची गारेगार महागडी उशी, सोफ्याची उशी, दिवाणावरचा लोड आणि त्यानंतरची ही स्वदेशी आयुर्वेदिक आशादायक उशी. आज झोप लागणार तर…
उत्साहातच आदित्य उशी डोक्याखाली घेऊन झोपला. पाचच मिनिटात अस्वस्थ होऊन उठला. लाइट लावला, तेव्हा त्याला अपूर्वाच्या चेहर्यावरही अस्वस्थता दिसली. त्याला तसं न दाखवता तिने विचारलं, “काय रे, काय झालं?”
“कसला तरी वास येतोय…”
“भलतंच काय… काही वास
वगैरे येत नाहीये.” लाइट बंद करीत
ती म्हणाली.
नाइलाजाने तो परत पसरला. त्याची चुळबुळ चालूच राहिली. श्वासागणिक वाढत जाणारा एक दर्प खोलीत पसरत असल्याने तो हळूच उठून बसला. शेजारी बघतो तर, अपूर्वा वास सहन करण्यासाठी नाकाला ओढणी लावून झोपायचा प्रयत्न करत होती. त्याने लाइट लावत ओढणी दूर करत म्हटलं, “म्हणजे, तुलाही वास येतोय तर…”
“हो, येतोय वास. तो या उशीतील आयुर्वेदिक जडीबुटीचा आहे. दोन दिवस सवय केली की, त्रास व्हायचा नाही याचा, असं तो उद्योजक म्हणत होता.”
“अपूर्वा, हा वास काही वेगळाच आहे.”
“कुठे काय? मला बाई तू म्हणतोस तसा फार काही वास येत नाहीये. जास्त विचार न करता झोप तू आता… सगळे मनाचे खेळ आहेत तुझ्या… आणि झोप येत नसेल, तर डोळे मिटून मनातल्या मनात मेंढ्या मोज…”
“बरोब्बर… आत्ता लक्षात आलं. हा वास मेंढ्यांचाच आहे. खरं सांग अपूर्वा, तुला नाही वाटत का असं?”
“हो बाबा हो, तुझं बरोबर आहे. ही उशी आपल्या देशी मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवली आहे. मोठ्या समाजकार्याचा भाग आहे हा एक… म्हणजे, दुष्काळग्रस्त मेंढ्यांचं पुनर्वसन करून लोकर जमवली आहे ही. शिवाय शांत झोप लागण्यासाठी त्यात अश्वगंधा वगैरे सतरा वनस्पती घातल्या आहेत. आजची रात्र वापरून बघ ना रे… झोप आता.” तिच्या या विनंतीवजा अजिजी पुढे काही न बोलता त्याने टाल्कम पावडरच्या डब्यातील पावडर्रें वास मारण्यासाठी भसाभसा उशीवर ओतली आणि तो डोळे मिटून पडला.
उशीच्या निर्मितीचं सत्य कळल्यामुळे टाल्कम पावडरच्या धुरळ्या आडूनही आदित्यच्या डोळ्यांसमोर मेंढ्या तरळू लागल्या होत्या. हळूहळू मेंढ्यांची संख्या वाढली आणि त्याचा वास आदित्यला सतावू लागला. थोड्या वेळाने तर आपल्या डोक्याशी कोणी दहा-बारा मेंढ्या बांधल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आपण गोठ्यात पहुडलो आहोत, असा भास त्याला होऊ लागला. असहाय होऊन तो उठला. बघतो तर अपूर्वाही नाक दाबत उठली होती,
“अपूर्वा या दुष्काळग्रस्त मेंढ्यांना या नव उद्योजकांनी अंघोळ घातली होती का कधी… ते तरी विचारायचं असतं गं ही उशी घेण्यापूर्वी…” काही न बोलता दोघांनीही त्या उश्या शक्य तितक्या दूर नेऊन ठेवल्या आणि झोपायच्या प्रयत्नाला लागले.
“आदित्य खरं म्हणजे थोडं चुकलंच. म्हणजे, तो नवउद्योजक म्हणाला होता की, फार वास आला, तर सात-आठ वेळा पाण्यातून काढून खणखणीत उन्हात वाळवा आणि मग उशी वापरा. तसंच करते आता उद्या…”
“अरेरे, तू अंघोळ घालण्यापूर्वीच मी त्या मेंढ्यांना पावडर लावली की…” जांभई देत आदित्य पुटपुटला.
“आदित्य, पुनर्वसित मेंढ्यांना अंघोळ घालणं आणि पावडर लावणं हा विषय उद्या चर्चेला घेऊ… झोप आता…” अपूर्वा.
दुसर्या दिवशी कामवाल्या निर्मला मावशींना सकाळीच दारात उभं राहिलेलं बघून अपूर्वाला फारच आश्चर्य वाटलं. “काय निर्मला मावशी, आज एवढ्या सकाळी कशा? रोज तुम्हाला म्हणते, आम्ही असेपर्यंत काम करून जात जा; तेव्हा वेळ नाही म्हणता… मग आज लवकर कशा?”
“फार विपरीत घडलंय बाई… मी आपली रोजच्या वेळेवर येऊन 202मध्ये चपात्या करायला घेतच होते. तेवढ्यात तो 703मध्ये नवा राहायला आलेला पैलवान, तोच प्राणी-पक्षीवाला… तो त्याच्या जाडजूड मित्रांना घेऊन घरात घुसला आणि…”
“आणि काय… काय केलं त्यांनी?”
“त्यानं काय केलं मला माहीत नाही; पण घाईनेच त्या ताई स्वयंपाकघरात आल्या आणि ‘आज पोळ्या नकोत. जा तू.’ म्हणाल्या. कोणाला सांगू नका ताई, 202 वाल्या दादांना चांगला चोप दिला असं म्हणतात. मला पक्कं माहिती नाही; पण 202च्या साहेबांनी पिंजर्यात घालून आपण बोलू तसं गुलुगुलु बोलणारा एक पोपट मुलासाठी आणला होता म्हणे. तुम्हाला म्हणून सांगते ताई, खेळण्यातला खोटा पोपट होता तो. पण त्या झाडूवाल्या चाप्टर मंदीने ‘202वाल्या साहेबांनी खराच पोपट आणून पिंजर्यात घातलाय’ अशी खोटी चुगली केली… आणि त्याचे 200रुपये मिळाले मेलीला. आमचं नशीबच फुटकं ताई. आम्हाला कोण देतंय काही.”
“म्हणजे, म्हणायचं आहे काय तुम्हाला मावशी?”
“ते जाऊ द्या… पण आता अर्धच काम करून जाते नि मग दुपारून झाडू पोछाला येते हं… आणि ताई, उद्या काम असल ना हो… की सुट्टी घेऊ.”
“का? उद्या काम नसायला
काय झालं?”
“बकरी ईदची सुट्टी आहे ना… सुट्टी असली की, कुणी घरी थांबायला मागत नाही… माझी कामवाली
सगळी घरं फिरायला जाणारेत…
म्हणून विचारलं.”
“आता मी काय बोलू… तुम्ही येणार नाही, म्हणजे आम्हालाही फिरायला जावंच लागणार.”
घरोघरी वापरलेली युक्ती याही घरी यशस्वी झाली, या खुशीतच निर्मला मावशींनी कामं उरकली आणि घर सोडलं. त्यांना उश्या धुवायला द्यायला विसरलो म्हणत चुकचुकत अपूर्वाने त्या उश्या पाण्यात सोडल्या आणि काय सांगता… न्हाणी घरातील मेंढ्या त्यांच्या नामांकित घमघमाटसह इतर खोल्यांच्या कानाकोपर्यात क्षणाचाही विलंब न करता उधळल्या. ऑफिसच्या तयारीत असलेला आदित्यने वैतागून “काय कटकट आहे.” म्हणत आफ्टर शेव्ह लोशन जरा जास्तच फासलं. नाकाला एक हात धरत आणि दुसर्या हातात कळकट पाणी टपकत असलेल्या उशीला कमीत कमी स्पर्श व्हावा, ही काळजी घेत अपूर्वाने बेडरूमची गॅलरी अक्षरशः पळत गाठली.
तिथे वाळत टाकलेल्या उश्यांवर नाराजीने नजर फिरवत आदित्य म्हणाला, “अपूर्वा, ऑफिसला जाताना आज आपली बेडरूम बंदच ठेव. तो उग्र वास इथे कोंडून तरी राहील. संध्याकाळी नील आणि उदय येतील बहुधा… याच भागात एका कार्यक्रमाला येणार, म्हणत होते. असला भयंकर वास आला, तर कोणी क्षणभरही थांबू शकणार नाही या घरात. आल्यापावली पळतील लोक…”
“इतकं काही बोलायला नको हं… उश्या वाळल्या की वास यायचा नाही… बघ, संध्याकाळी आल्यावर तू हे विसरूनदेखील जाशील की, या उशांना वास येत होता म्हणून… पण दार बंदच ठेवूयात आजच्या दिवस.”
संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून परतून कॉलनीच्या गेटमधून आत शिरला, तेव्हा त्याला 703मधला पैलवान आणि त्याची दोस्त मंडळी कोंडाळे करून गप्पा मारताना दिसली. आदित्यची गाडी दिसताच त्यातील एक-दोघांनी हात उंचावून त्याच्या दिशेने यायला सुरुवात केली. तेव्हा निर्मला मावशीने सांगितलेला 202वाल्याला दिलेल्या चोपाचा सकाळचा किस्सा आठवून ‘असल्या फालतू लोकांशी संबंधच नको’ या विचाराने त्यांच्याकडे लक्षच नाही, असं दाखवत त्याने तडक फ्लॅट गाठला. लॅच उघडून आत शिरता झाला आणि दोन सेकंदात त्याला श्वास घेणं अवघड झालं. मेंढ्यांच्या वासाने या नऊ-दहा तासात एकदम उसळी खाल्ली होती. हजारो-लाखोंनी मेंढ्या घरात कोंडल्या आहेत, असा वास त्याच्या नाकाशी झोंबत होता. आता फक्त ‘बॅऽऽअँ बॅऽऽअँ’ या आवाजाचीच काय ती कमी घरात जाणवत होती.
“च्यायला त्या उशांमध्ये काय मेंढ्या भरून दिल्यात की काय…
पण एक बरं झालं नील आणि उदयचं येणं रद्द झालं. नाहीतर या वासात मेलेच असते साले…” तेवढ्यात बेल वाजली. अपूर्वा आली असावी असं वाटलं असताना, दारात निर्मला मावशींना बघून तो गडबडलाच.
“दुपारी पुर्या खोल्या साफ नाही करता आल्या… बेडरूम लॉक होता
ना तुमचा… ते कराया आल्ते…” त्याच्या खांद्यावरून आत शोधक नजर टाकत ती म्हणाली.
दारातच तिचा रस्ता अडवून उभ्या असलेल्या आदित्यने किंचितही न सरकता, “काही गरज नाही… आजच्या दिवस राहू द्या ते काम…
हवं तर उद्या डबल करा.” म्हणत तिला पिटाळून लावलं.
थोडं घुटमळत अनिच्छेनेच ती माघारी वळली. तेवढ्यात अपूर्वा आली. घरात येताच नाकावर रुमाल ठेवतच ती किंचाळली, “आदित्य, काय हा भयंकर मेंढ्यांचा वास… शी… लिफ्टपर्यंत यायला लागलाय तो आता…
पण आज ना त्या मेंढीच्या उश्या विकणार्या नवउद्योजकाला फोन लावून कालचा सगळा वृत्तांत सांगितला बरं का… म्हणाला, काळजी करू नका. आमची माणसं आजच पाठवून देतो आणि उशी वास रहित करून देतो. आणि नाहीच पटलं त्याचं प्रोडक्ट, तर नुकसान भरपाई देतो म्हणालाय. येतील थोड्या वेळाने ती लोकं… पण काय रे ती निर्मला, दुपारी दोनलाच घरी जाते. आज सात वाजले तरी गेटशी रेंगाळत आहे. आणि कोणासोबत होती माहिती आहे का, त्या टारगट 703 आणि त्यांच्या पैलवान कंपूसोबत… आपल्याच फ्लॅटच्या दिशेने हातवारे करत बोलत होती. मला बघून न बघितल्यासारखं केलं शहाणीने.”
आदित्य घटनाक्रम आठवू लागला… पाण्यात घातल्याने त्या दोन उश्यांतून लक्ष मेंढ्या घरात कोंडल्यात असा घमघमाट सुटणं… आपण सर्वधर्मसमभाव पाळणारे असणं आणि दुर्दैवाने उद्या बकरी ईद असणं… कामाला आलेल्या निर्मला मावशींना कधी नव्हे ते बेडरूमला लावलेलं कुलूप खटकणं… त्यांनी या अवेळी प्रामाणिकपणे राहिलेलं काम करायला येणं… आतला अंदाज घेणं… बेडरूमला कुलूप लावल्याची आठवण करणं आणि शेवटी माणसांना चोप देऊन समाजसेवा करणार्या कंपूसोबत त्यांचं असणं…
आदित्यच्या डोक्यात जसजसा प्रकाश पडायला लागला, तसतसा त्याचा चेहेरा काळवंडू लागला. तेवढ्यात लिफ्टची दारं धडाधड बंद केल्याचा आणि त्यापाठोपाठ बेलचा आवाज आला. आदित्यच्या पाचावर धारण बसली. दार उघडायला जात असलेल्या अपूर्वाचा हात पकडत तो म्हणाला, “अपूर्वा, स्वदेश खरोखरच मेला आहे… त्या दुष्काळग्रस्त मेंढ्यांचं पुनर्वसन फार म्हणजे फारच महागात पडणार आहे आपल्याला… तुझा तो नवउद्योजक नुकसान भरपाई द्यायला आला की, त्याला त्या मेंढ्यासोबत माझंही पुनर्वसन करायला सांग…” म्हणत तो सोफ्यावर कोसळला. आता वेगाने बेल वाजत होती आणि त्यासोबत जोरदार थापांनी दार बडवलं जात होतं.
अपूर्वाने घाईने दरवाजा उघडला. समोर 702 आणि पैलवान मंडळी हसत उभी होती. “नमस्कार वहिनी, ही पावती द्यायची राहिली होती. ती द्यायला आलो होतो. पावती पुस्तक नव्हतं ना परवा… आज सकाळपासून प्रत्येकाला भेटून ते देण्याचंच काम चाललं आहे. पावती घेऊन जाण्यासाठी आत्ता खाली साहेबांना हात केला. पण त्यांना घाईचं काम असावं, थांबले नाहीत. नंतर तुमच्याकडे काम करणार्या बाईंनाही ही पावती तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून गळ घातली; पण त्यांनाही घरी जायची घाई आहे म्हणाल्या. मग शेवटी म्हटलं आपणच देऊन यावं. काय मग, बरे आहेत ना आमचे साहेब? काही लागली मदत तर कळवत चला.” विनयाने हात जोडीत मंडळी निघून गेली.
Link Copied