-दीपा मंडलिक
शार्दुल-वैभवीच्या लग्नाला तीन वर्ष होऊन गेली. आता आजी होऊन नातवंडाला खेळवावे ही इच्छा वारंवार मनात येत आहे. मात्र त्या दोघांजवळ विषय काढला की उडवून लावतात. विचार करायला वेळच नाही म्हणतात. जगावेगळे असे मी त्यांना काय मागत आहे.
मालतीबाई ….
काल सुमतीवन्स येऊन गेल्यापासून मनाला कशी हुरहूर लागून राहिली आहे. हे डाव अर्ध्यात टाकून गेले. त्यांचं अकाली जाणं, आभाळच कोसळल्यासारखं झालं. पदरात होता फक्त तीन वर्षाचा शार्दुल. हे गेले तेव्हा थोडाफार आधार सुमतीवन्सनीच दिला. बाकीचे सगेसोयरे दुरावत गेले. कुणी अनावधानाने तर कुणी जाणीवपूर्वक. वन्सनीं मात्र संबंध टिकवून ठेवले. शार्दुलला केवढा लळा लावला त्यांनी! खेळणी, ट्रीपला जायला पैसे, नवे कपडे बापावेगळ्या पोराची पुरविता येईल तेव्हढी हौस-मौज पुरविली. तेही अवघड दिवस संपले. शार्दुलनी इंजिनियरिंग करून एम.बी.ए.केलं आणि माझ्या डोक्यावरचे ओझे हलके झाले. खरोखरच माझा शार्दुल खूपच गुणाचा निघाला. दैवाने एका हाताने नेले आणि नशिबाने हजार हातांनी शार्दुलच्या रूपाने दिले. जे सुख, समाधान, ऐश्वर्य भोगण्याचा मी विचारही केला नव्हता ते माझ्या मुलाने, कर्तृत्ववान शार्दुलने माझ्या पायाशी आणून ठेवले. लहानपणीपासूनच पोर कसा जबाबदारीनेच वागला. वडिलांचे छत्र हरविल्यामुळे ज्या आर्थिक झळा बसल्या त्या परत आपल्या आयुष्यात येऊ द्यायच्या नाही या निर्धारानीच त्याने अभ्यास केला. अगदी ठरवून आर्थिक अनिश्चितता दूर करण्यासाठीचं उच्च शिक्षण मेहनतीने घेतले. एकदा ठरविले. मग त्या ध्येयाच्या आड येणार्या वयसुलभ स्वाभाविक इच्छा आकांक्षांवर पाणी सोडले आणि मनातले ध्येय गाठलेच. अशा मुलाचा कोणत्या आईने अभिमान बाळगू नये? नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आपण इच्छा व्यक्त करताच वैभवी नावाचे वैभवच सुस्वरूप सुनेच्या रूपाने घरी आणले. खरंच मी किती भाग्यवान आहे!
शार्दुल-वैभवीच्या लग्नाला तीन वर्ष होऊन गेली. आता आजी होऊन नातवंडाला खेळवावे ही इच्छा वारंवार मनात येत आहे. मात्र त्या दोघांजवळ विषय काढला की उडवून लावतात. विचार करायला वेळच नाही म्हणतात. जगावेगळे असे मी त्यांना काय मागत आहे. मला कबुल आहे त्या दोघांच्या नोकर्या, करिअर महत्त्वाचं आहे, पण किती महत्त्वाचं? इतकं की आपल्याला मूल व्हावं याचा विचार करायलाही त्यांना वेळ मिळू नये? या पिढीचं मला काही कळतच नाही, मूल होऊ देण्याचा विचारच करत नाही म्हणजे लग्नाला अर्थच काय उरतो? लग्नसंस्थेचा उद्देशच विसरत आहेत. मग याला भविष्य काय? आता नवीन नवीन एकमेकांच्या तारुण्यांची ओढ आहे, पण पुढे कुठला धागा त्यांना एकत्र बांधून ठेवणार?
हे गेल्यावर खर्चाशी तोंड मिळवणी करताना खूप ओढाताण झाली. त्यामुळे पैशाचे महत्त्व जाणून आहे. पण आज या परिस्थितीत विचार केल्यावर वाटतं फक्त पैशामागे, यशामागे आयुष्याला पळवत राहण्याचा अतिरेकही वाईटच. घटकाभर शांतपणे आयुष्याच्या टप्प्यावरील वेगवेगळ्या अनुभवात बुडून जाणं हा ही मोठा आनंद आहे. पण हेच त्या दोघांना कळत नाही. आपल्या मनातील नातवाची ओढ सुमतीवन्सनी बोलून दाखविल्यावर अस्वस्थ अपूर्ण वाटायला लागले. शरीरावरील एखाद्या जखमेची वेदना एकट्याने आपण निर्धाराने सहन करू शकतो. पण पाठीवरून हळुवार हात फिरवून कुणी फार दुखतंय का? असं सहानुभूतीनी विचारले की निर्धाराचा बांध फुटून स्वतःचीच आत्यंतिक कीव येऊन अश्रुंचे पूर लोटतात. काहीसं तसंच झालं आहे वन्स येऊन गेल्यापासून.
शेजारची नर्सरीत जाणारी चिमुरडी पूर्वा कधी कधी वाट चुकून खेळायला येते. तेव्हा घर भरून गेल्यासारखं आणि वेळ भारून गेल्यासारखी होते. नकळत रोज पूर्वा येण्याची वाट आपण बघतो. तिने रोज खेळायला यावे असे वाटते. लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच्या मुला, सुनेकडून हक्काचं नातवंड मिळविण्याची अपेक्षा मी केली तर माझं काय चुकलं?
शार्दुल….
आईपण आजकाल खूपच हट्टीपणाने वागतीय. आजी होण्याचा ध्यासच घेतला आहे तिने. खरे तर आताच कुठे जीवन स्थिरस्थावर होतंय. आई तर बघतीच आहे, मी आणि वैभवी किती बिझी असतो. ऑफिसचे जबाबदारीचे काम जबाबदारीने करायचे म्हटल्यावर आठवडाभर स्वतःसाठीही वेळ देता येत नाही. मग एकमेकांना वेळ कुठून देणार? दोघांनी कर्ज काढले आहे म्हणून उच्चभ्रू वस्तीत, सर्व सुविधा असणार्या वसाहतीत, हा अद्ययावत वस्तूंनी सुसज्ज असा फ्लॅट घेता आला. लहानपणी सगळ्या दुय्यम वस्तूंवर समाधान मानावं लागलं होतं. तेव्हाच ठरवले, स्वतः कमवायला लागल्यावर चांगल्यातल्या चांगल्या वस्तूच वापरीन. गाडीच्या बाबतीतही तोच विचार केला. त्याच्यासाठीही कर्ज काढावेच लागले. त्याचेही हप्ते जात आहेत. वैभवीच्या नोकरीची साथ आहे म्हणून बरं आहे.
वैभवी श्रीमंत घरातली. आयुष्यात कॉम्प्रमाईज आजपर्यंत तिला करावेच लागले नाही. समोरच्याशी सहज त्याच्या पातळीवर येऊन संवाद साधण्याची कला तिच्यात आहे. म्हणूनच एम.बी.ए. करत असताना तिच्याशी दाट मैत्री झाली. ठरविले ते शांतपणे, उतावीळ न होता, नियोजनबद्धरित्या मिळवायचं हा तिचा स्वभाव. तिच्या या स्वभावापायीच तर मी तिच्याकडे ओढलो गेलो. मग तिला लग्नासाठी प्रपोज केले, तीही तयार झाली. आम्ही लग्न करायचं ठरविल्यावर आधी चर्चा केली होती. आयुष्याकडून दोघांना असणार्या अपेक्षांची. आपापल्या अपेक्षांच्या आड एकमेकांनी यायच नाही, हे ओघा ओघाने न सांगताच ठरले होते. आपल्या स्वतःला काय हवं आहे याची सविस्तर चर्चा केली. ठरविले आणि लग्नानंतर ते मिळविण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात केली.
आईची विचारसरणी जरा जुन्या वळणाची. तिचा नेहमीच कर्ज काढायला विरोध. काही घ्यायचं ठरलं की एकच पालुपद. “असे कर्ज काढून सण साजरे करण्यात काय अर्थ आहे?” पण तिचा काळ वेगळा होता. आता सगळं बदललं आहे. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट, गाडी. खरं तर या गरजाच, पण कर्जाशिवाय त्या स्वप्न ठरतात. पैसे राखून हे सगळे करायचे म्हटले तर अनेक वर्षांची निश्चिंती. आत्ता ज्या गोष्टी हव्या त्यासाठी अनेक वर्ष वाट पाहायची म्हणजे उमेदीची ऐन वर्ष तडजोडीत काढायची आणि वय झाल्यावर अप्रूप संपलेल्या गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या. यात कसली आलीय एक्साइटमेंट. आत्ता हवं आहे असं वाटतंय तर आत्ताच मिळविले पाहिजे. आईच्या भाषेत सांगायचे झाले तर कर्ज काढायचं नाही म्हटलं तर सणच साजरे करता येणार नाहीत. आताच्या ट्रेण्डनुसार आधी धूमधडाक्यात सण साजरे करावेत आणि नंतर मग हळू हळू फेडत बसावे. आमच्या आयुष्याकडून असणार्या अपेक्षांचे ओझेच सध्या आम्ही वाहतोय. त्यात अपत्याची जबाबदारी आत्तातरी नकोच वाटतीय. ती म्हणजे न संपणारी जबाबदारी. त्यात एकदा अडकलं की सुटका नाही. सध्या जे चालले आहे ते काय वाईट आहे, आईला उगाच घरबसल्या नवनवीन विचार सुचतात. हल्ली तर बोलण्याची सुरुवात कुठूनही झाली तरी त्याचा शेवट मात्र ती तिच्या आजी होण्याच्या इच्छेनेच करते. तिचंही अगदीच चूक आहे असं नाही, पण वैभवी बाळाचा विषयही काढत नाही. या संदर्भात तिच्या विचारांचा आणि निर्णयाचा मी आदर करीन. वैभवीचा विचार केला तर तिचं करीअर आणि नोकरी माझ्या करीअर आणि नोकरीइतकंच महत्त्वाचं आहे. ती एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. केवळ आईची इच्छा म्हणून मी तिच्यावर काहीही लादू शकत नाही. खरं तर आईचा आयुष्याकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे. कुणी कुणाला समजावून घ्यावे हा खरा प्रश्न आहे.
वैभवी …..
ऑफिसचं काम निघाल्याने शार्दुल आणि सासुबाईंबरोबर नाशिकला लग्नाला जाता आले नाही. पण काम कॅन्सल झालं आणि एका अख्ख्या दिवसाचं रिकामपण मिळालं. पण हा निवांत वेळ मिळताच टपून बसल्यागत विचारांची वावटळ मागे लागलीय. आजकाल आडमार्गाने सगळेच माझ्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्याचं लक्षात आणून देतात. सासूबाई आजी होण्याविषयी आधी मोघम बोलायच्या. आता तर आग्रहच करत आहेत.
विचार करायचा झाला तर लहानपणापासून करावा लागेल. माझी आई माझ्या बाबतीत अत्यंत महत्त्वाकांक्षी. मी माझ्या आयुष्यात काय मिळवावे हे तिने आधीच ठरवून टाकलेलं असायचं. ते मिळविण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि मेहनत ती माझ्याकडून अगदी स्ट्रिक्टली करून घ्यायची. म्हणूनच शालेय जीवनात प्रत्येक स्पर्धेत सहभागी झाले तेही जिंकण्याच्या तयारीनिशी. परीक्षेत पहिला क्रमांक कधी सोडला नाही. आयुष्याकडून उत्तमात उत्तम स्वतःसाठी काढून घ्यायची सवय तेव्हापासूनच जडली. नंतर कॉलेज, उच्च शिक्षण ठरवलं तसं मिळवत गेले. मग शार्दुलशी लग्न करून संसार सुरू झाला. ओघाने येणार्या गोष्टींचा विशेष उल्लेख केला जात नाही. तसंच लग्नानंतर मूल होणारच. आयुष्यात सहजप्राप्त गोष्टी आपल्याला करायच्या आहेत असं कोणी ठरवून ठेवत नाही. मी आई होण्याबाबत तसंच झालं आहे. एक एक पायरी तयारीनिशी चढले. पण आई होण्याचा विचार आजपर्यन्त केलाच नाही. मानसिक तयारी नाही. तसा विचार करायला लागले तर सगळंच अवघड वाटून विचारच करावा वाटत नाही. आई होण्याचा निर्णय म्हणजे करीअरच्या शर्यतीतून बाद होणे. आपले बरोबरीचे पुढे निघून जाणार, आपण मात्र आहे त्या जागेवर बसकण मारायची.
आज खरं तर मोकळा वेळ आहे, खुपशा राहून गेलेल्या गोष्टी करू शकत होते. एक दोन चांगले लेख वाचायचे म्हणून जपून ठेवलेत. ते वाचता आले असते, पार्लरमधेही कधीचं जायचं होतं, पण काहीच करावंस वाटत नाही. मूडच नाही, पूर्वाच्या घरी जाऊन आल्यापासून मनात विचारांचं नुसतं काहूर माजले आहे. विचारांचं एक चक्र पूर्ण झालं की परत नव्याने पुन्हा तेच चक्र मनात सुरू. असं मनाला शिणविण्यात काय अर्थ आहे? हे काय होतंय माझे मलाच समजत नाही. कित्ती आनंदी चेहेर्याने आली होती पूर्वा. तिच्या आईने तिच्यासाठी हॉस्पिटलमधून छोटासा भाऊ आणलाय हे सांगताना तिचा चेहरा आनंदाने अगदी फुलून गेला होता. आग्रहानी तिने तिचा भाऊ दाखवायला आपल्याला ओढतच घरी नेले. पूर्वाच्या घरात बाळ असल्याचा विशिष्ट सुगंध भरून राहिला होता. कसं मोहरून गेल्यासारखं झालं त्या सुगंधाने. बाळाच्या खोलीत तर चिमुकल्या झबल्या, दुपट्या, लंगोट नि टोपड्यांचा केवढा पसारा! बाळाजवळ गेलो तेव्हा बाळाचा कुरकुरण्याचा आणि नंतर नाजुक रडण्याचा आवाज, पूर्वाच्या आईने जवळ घेताच क्षणात शांत झालेलं बाळ. किती छान वाटलं हे बघून. काळ्या कुरळया केसांचं, नाजुक, हातभर लांबीचं, गोरंपान बाळ, दुपट्यात गुंडाळलेलं गाठोडच जणू! त्याचे रडताना मिटणारे टपोरे काळेभोर डोळे, नाजुक जिवणी, लाल गुलाबी ओठांची मधेच केलेली उघडझाक, बाळाला बघताच वात्सल्याचा उमाळा उफाळून आला. वाटलं पटकन उचलून त्याला हृदयाशी घट्ट धरावे. त्याला कुरवाळावं, कवटाळावं, त्याचा सुगंध छातीत भरून घ्यावा. या भावना उचंबळून आल्या आणि त्याक्षणी मी माझ्यातील अपरिचित वैभवीला भेटले. त्या क्षणी बाळ हवंच ही इच्छा प्रबळपणे दाटून आली, त्याच क्षणी? त्या क्षणी का? खरं तर आत्ताही मला बाळ हवंच आहे. इतके दिवस या ओढीकडे दुर्लक्ष करीत होते, कधी जाणीवपूर्वक तर कधी अनावधानाने. माझ्या स्त्रीत्वात दडलेल्या मातृत्वाचा अंकुर……तो अंकुर मला फुलविला पाहिजे……..जपला पाहिजे………वाढविला पाहिजे. त्या आतल्या आवाजापुढे आता व्यवहारीक शहाणपण चालायचं नाही. विचारांच्या नादात महत्त्वाचं काम राहूनच गेलं. सोसायटीच्या सेक्रेटरीना मेंटेनन्सचा चेक आजच द्यायला शार्दुलने बजावून सांगितले होते. बाकी फ्लॅटच्या कर्जाच्या हप्त्यांचं तोच बघतो, पण गाडीचं कर्ज आणि रोजचा खर्च भागवतांना माझीही मदत लागतेच. त्यात बाळ येणार म्हणजे होणार्या खर्चाशी तडजोड अशक्य. आज सकाळपासूनच नसते विचार मागे लागलेत. त्यापेक्षा ऑफिसमध्ये गेले असते तर परवडलं असतं. लॅपटॉपवर मेल तरी चेक करावेत. आजचं ऑफिसचं काम कॅन्सल झालं हे सांगण्यासाठी वर्मा सरांनी फोन केला तेव्हाच म्हणाले होते, वैभवी घरी असलात तरी मेल चेक करा. अर्जंट कामासंबंधी महत्त्वाचा मेल तुम्हाला येणार आहे. मेल चेक करायचं लक्षात आलं ते बरं झालं. नवीन मेल आलाच आहे आणि तोही मेन ऑफिसकडून ..आणि… हे काय….. कंपनीच्या अमेरिकेतील प्रोजेक्टसाठी माझी निवड करण्यात आली आहे, वा! हे तर खूपच छान झालं. अमेरिकेतला प्रोजेक्ट म्हणजे करिअरच्या दृष्टीने मोठीच संधी.. पण गोबर्या गालांचे, गोड, गोंडस बाळ…… खरं तर आताच उशीर झालाय, वयाच्या या वळणावर बाळ व्हायला आणखी उशीर परवडणारा नाही, काय करावं?……..अमेरिकेतला प्रोजेक्ट म्हणजे पेमेंटही इथल्यापेक्षा कितीतरी जास्त. तिथे गेले तर इथलं सगळं लोन विनासायास फिटेल. त्या संधीला नकार म्हणजे सगळ्यावरच पाणी. पण बाळ? बाळाला चांगलं भविष्य द्यायचं तर……संधी गमावता कामा नये.
आधी वर्मासरांना फोन करून अमेरीकेचं कळवून थँक्स म्हणायला हवे. मी अमेरिकेत जातीये हे आई-पप्पांनाही कळवायला हवे. शार्दुल आणि सासूबाई येतील इतक्यात. त्यांना आल्यावरच सांगता येईल. अमेरिकेत जाण्याचं माझं कितीतरी दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार म्हणून शार्दुल खुश होईल. त्याला या संधीचं महत्त्व माहीत आहे. मी नसताना तो घरचं सगळं मॅनेज करेलच म्हणा. अगदी सासूबाईंनाही समजावून सांगेल. मेल करून मेन ऑफिसला मी अमेरिकेत जाण्यास उत्सुक आहे हे कळवून टाकावं.