Close

कथित बॉयफ्रेंडबरोबर श्रद्धा कपूरने शेअर केला पहिला फोटो, अन् नात्यावर केलं शिक्कामोर्तब? (Shraddha Kapoor Seemingly Confirms Dating Rumours With Rahul Mody: “Dil Rakh Le…”)

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी २’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या पहिल्या चित्रपटात श्रद्धाने अभिनेता आदित्य रॉय कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.

श्रद्धा कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगर येथे पार पडलेल्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याला तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली होती. याशिवाय एका फोटोमध्ये श्रद्धाने गळ्यात ‘R’ अक्षर असलेलं पेंडंट घातलं होतं. यावरून अभिनेत्री राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र चालू झाल्या. परंतु, श्रद्धाने याबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं किंवा राहुलबरोबर एकही फोटो शेअर केला नव्हता. अशातच इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुल अन् तिचा एकत्र फोटो शेअर करत श्रद्धाने तिच्या तमाम चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

श्रद्धाने काही तासांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुल मोदीसोबत खास पोज देत काढलेला सेल्फी पोस्ट केला आहे. श्रद्धाने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “दिल रख ले… नींद तो वापस दे दे यार।” आणि पुढे तिने हार्ट आणि हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय राहुलला तिने या पोस्टमध्ये टॅग सुद्धा केलं आहे. श्रद्धाने हा सेल्फी फोटो शेअर करत याला “नींद चुराई मेरी किसने ओ सनम…” हे गाणं देखील लावलं आहे. हा फोटो पाहिल्यावर श्रद्धाने प्रेमाची जाहीर कबुली देत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार श्रद्धाची राहुलसोबत पहिली भेट ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटादरम्यान झाली होती. राहुल या चित्रपटाचा लेखक होता. एकत्र काम करताना दोघांची एकमेकांशी ओळख वाढली आणि ते प्रेमात पडले. राहुलने ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांचेही लेखन केले आहे. तसेच तो सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम करतो. दरम्यान, श्रद्धा कपूर आता लवकरच ‘स्त्री २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या १५ ऑगस्टला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये श्रद्धा कपूरसह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असतील.

Share this article