Close

बालकलाकार म्हणून श्रेया बुगडेने केलेली करिअरची सुरुवात, ड्रामा ज्युनियर्सच्या निमित्ताने आठवले जुने दिवस( Shreya Bugade Stared Her Career As ChildArtist Remember Her Old Memories While Drama Juniors)

श्रेयाने आपल्या नवीन प्रवासाच्या वाटचाली बद्दल व्यक्त होताना सांगितले, "मी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पण एका नवीन रूपात. मी 'ड्रामा ज्युनियर्स' मध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मला लहान मुलांसोबत काम करण्याची खूप सुंदर संधी मिळाली आहे. नवीन टॅलेंट, नवीन उत्साह आणि सर्व चिमुकल्यांबरोबर मज्जा येणार आहे. हे माझ्यासाठी नवीन आव्हान आणि अनुभव असणार आहे. मला आशा आहे की जस आता पर्यंत प्रेक्षकांनी मला प्रेम दिले आहे तसेच ह्या नवीन भूमिकेसाठी ही त्यांचा पाठिंबा मला असणार आहे.

मी स्वतः बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती. लहान मुलांबरोबर काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा आणि आव्हान आहे. त्यांची दिनचर्या सांभाळून त्यांच्यासोबत मूड सेट करून काम करणं एक वेगळा चॅलेंज आहे. मला लहान मुलं खूप आवडतात तर त्यांच्याबरोबर जुळून घेणं माझ्यासाठी कठीण नसेल. त्यांच्या वयाचं होऊन जर त्यांच्या बरोबर मैत्री केली तर ते जास्त ओपन-अप होतील. 'चला हवा येऊ द्या' मधून माझी जी ओळख निर्माण झाली होती ती कायम ठेवत काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न 'ड्रामा ज्युनियर्स' मधून करणार आहे.

एक सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षक आणि स्पर्धकांमधला दुवा जो असणार आहे त्याच काम मी करणार आहे. लहान मुलांचे अत्यंत उत्तम परफॉर्मेन्सस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे असणार आहे. ज्या ऑडिशन्स मी बघितल्या त्यात स्पर्धकांमध्ये एक वेगळीच चमक आणि ऊर्जा दिसतेय. ही मुलं इतर मुलांना फक्त आणि फक्त प्रेरणा देणार आहे. आजच्या तरुण प्रतिभाशाली मुलांवर, सोशल मीडियाचा प्रभाव आहे. ह्या मुलानं मधलं टॅलेंट वाया न जाता उत्तम दर्जेदार परफॉर्मेन्सस मंचावरती प्रदर्शित करणे फार गरजेचं आहे आणि सातत्याने झी मराठी ती कामगिरी वर्षानुवर्षे करत आहे. आमची सर्वात लहान स्पर्धक आहे ती साधारण साडेतीन-चार वर्षाची आहे.

मी जेव्हा कामाला सुरवात केली तेव्हा मी ८ वर्षाची होते. मी त्यांच्यातलीच एक आहे असं मला वाटत, कारण मी ही ह्याच वयात आपल्या कामाची सुरवात केली होती. अर्थात तेव्हा आम्हाला इतक्या सुविधा नव्हत्या आमच्या आणि आमच्या पालकांच्या संघर्षाची पद्धत वेगळी होती. पण काळ बदलला आहे आणि स्पर्धकांच्या कलेला अशी संधी मिळणं खूप महत्वाचं आहे. मी अनेक भाषांमध्ये काम केले आहे आणि त्यातून मी हेच शिकले की नवीन गोष्टी कश्या शिकता येतील आणि त्यांचा वापर पुढच्या कामामध्ये कश्या प्रकारे करता येईल. माझ्या अनुभवामधून मी हेच सांगेन की प्रत्येक वेळेला आपण जेव्हा काम करतो, तेव्हा आपण जागृत असलं पाहिजे.

Share this article